Monday 22 December 2014

congress, BJP : कॉंग्रेसचा पोरकटपणा

 लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपानं खुप स्वप्नं दाखवली. काळा पैसा हे त्यातलं प्रमुख स्वप्नं. महागाई कमी करू…… रोजगार निर्माण करू अशी आणखी कितीतरी स्वप्नं त्याच रिळात होती. पण अखिलेश सरकारनं प्रचारादरम्यान मोफत ल्यापटॉप वाटण्याची घोषणा केली तशी,
असं ' काही फुकट देऊ ' अशी कुठलीही घोषणा मोदींनी केली नाही. तरीही मतदारांनी भाजपाला न भूतो असं यश दिलं. मी मुद्दाम केवळ न भूतो असाच म्हणतोय. न भविष्यती असं म्हणत नाही. कारण भविष्यात भाजपाला यापेक्षा धिक यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण मोदींनी दाखवलेल्या सगळ्या स्वप्नांची गोळाबेरीज होती ' अच्छे दिन.' पण आज सहा महिन्यानंतर आले का ' अच्छे दिन ?'  असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. खरंच काय झालं ' अच्छे दिन 'चं ? येणार आहेत कि नाहीत ? कि भाजपानं फसवलं मतदारांना ?

मी माझं मत मांडतोय. भाजपा १०० % नाही पण २५ % नक्कीच यशस्वी झालंय. आज ' भाजपानं फसवलंय ' अशी दबक्या आवाजातली कुजबुज सुरु असली तरी ती शंकेची पाल चुकचुकली आहे ती विरोधकांमुळे. वास्तविक पेट्रोलचे भाव सतत उतरत चालले आहेत. ( कृपा आंतरराष्ट्रीय बाजारभाव कमी झाले आहेत असं कुणी सांगू नये. ) कारण आंतरराष्ट्रीय बाजारभाव तुमच्या आंतरराष्ट्रीय धोरणाशी निगडीत असतात. दॉर्च भाव ६८ रुपयांवरून ६२ रुपयांपेक्षा कमी झाला.  सोने सतत उतरले ३१ हजारावरून २६ हजारावर आले. कांदा, बटाटा कधीही चाळीशी, पन्नाशी ओलांडू शकला नाही. पाकिस्तानला सतत दबावाखाली ठेवलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदींचा दबदबा निर्माण झालाय. हि अच्छे दिनची सुरवात आहे.

मुळात ' अच्छे दिन ' हा माझ्या लेखाचा विषय नाही. भाजपा स्वबळावर सत्तेत आली तर काँग्रेसला विरोधीपक्ष अशी मान्यता मिळण्याची मारामार झाली. नियमानुसार विरोधी पक्ष हि उपाधी मिळण्यासाठी त्या त्या सभागृहाच्या १० % जागा जिंकणे गरजेचे असते. त्यानुसार लोकसभेला काँग्रेसचे कमीत कमी ५८ - ५९ खासदार निवडून यायला हवे होते. परंतु काँग्रेसचे केवळ ४४ खासदार विजयी झाले आणि काँग्रेस विरोधी पक्ष हि उपाधी मिळण्यासही पात्र ठरू शकली नाही.

अर्थात त्यामुळे कॉंग्रेस संपली असे म्हणायचे काही कारण नाही. कारण आज स्वबळावर आलेल्या भाजपाचे एकेकाळी केवळ दोन खासदार होते हे विसरून चालणार नाही. असं असलं तरी काँग्रेस आणि भाजपा मध्ये एक फार मोठा फरक आहे. भाजपा एक संघटना आहे तर काँग्रेस एक परंपरा आहे. त्यामुळेच भाजपाला दोनाचे दोनशे करता आले आणि दोनशेहून पावणेतीनशेवर झेप घेता आली. परंतु आता काँग्रेस मधली परंपरा मोडकळीस आली आहे आणि त्या परंपरेत नवचैत्यन्य निर्मार करण्याची ताकद आज न सोनियांकडे आहे ना राहुल गांधींकडे.

बरं विरोधी पक्ष अशी मान्यता नसतानाही काँग्रेसन भाजपाला पहिल्या दिवसापासुन केवळ विरोध केला आहे. पण विरोध करावा अशी कोणतीही गंभीर घटना गेल्या सहा महिन्यात घडल्याचे मला दिसत नाही. पहिल्या आठवड्यात विषय काय तर - स्मृती इराणींची पदवी, नंतर काय तर ……. रेल्वेची भाववाढ, नंतर……….   मोदींचे परदेश दौरे, मधेच ……… झोपडपट्टी वासीयांच्या प्रश्नावरून बुलडोझरला आडवं जाण्याची भूमिका, आता काय तर……… साध्वींच निरंजन ज्योती यांचं विधान.

काय म्हणाल्या त्या ? सगळ्यांना माहिती असेलच पण संदर्भासाठी लिहितो, दिल्लीतल्या एका प्रचार सभेत त्या म्हणाल्या, " तुम्हाला रामजाद्यांचं सरकार हवं कि हरामजाद्यांचं ते तुम्हीच ठरवा. " आता तुम्हीच सांगा संसदेत तीन दिवस अखंड गदारोळ घालण्यासारखं आणि संसदेचं कामकाज बंद पडण्यासारखं काय आहे हो या वाक्यात.

साध्वींनी माफी मागितली……. संसदेचं कामकाज चालू दया अशी मोदींनी विनंती केली. पण ' साध्वींनी राजीनामाच दयावा नाही विरोधक ' ठाम. किती हा पोरकटपणा. उद्धव ठाकरेंनी तर किती मुक्ताफळं उधळली प्रचार करताना. अफजलखानाची फौज काय म्हणाले……. मोदींचा बाप काय काढला. आता केंद्रात स्वबळावर सत्तेत आल्यानंतर भाजपानं काय उद्धव ठाकरेंना अरबी समुद्रात बुडवायचं ? कुठल्या गोष्टी कुठे सोडायच्या याचं भान काँग्रेससारखा सव्वाशे वर्षाची परंपरा सांगणारा पक्ष राखणार नसेल तर दरीच्या तोंडावर उभा आहे असं नक्की समजावं.

खरंतर काँग्रेसनं विरोधाचे असले सगळे पोरकट प्रकार बंद करावेत. वर्ष दोनवर्ष केवळ पहात रहावं. पक्ष बांधणीकडे लक्ष द्यावं. मोदी सरकारचा निम्मा अधिक कालावधी पार पडल्यानंतर एखादं चांगलं प्रकरण शोधावं आणि मग भाजपावर चौखुर  हल्ला करावा. या रणनीती म्हणतात. पण अशी काही रणनिती न आखता काँग्रेस अशी प्रत्येक पावलाला विरोधाची भूमिका घेत बसली तर पाच वर्ष संपता काँग्रेसची दमछाक होईल, कॉंग्रेसच्या नेतृत्वाच पिता आणखी उघडं पडेल आणि पुढच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आजच्यापेक्षा दारूण पराभवाला सामोरं जावं लागेल.       

6 comments:

  1. खरंच, आपण म्हणताय ते खरे आहे. समर्थ विरोधी पक्षाची भूमिका पार पडण्यासाठी काँग्रेसन उभारी घेणं गरजेचं आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तसे व्हायला हवे हे खरे. पण आज तरी तशी चिन्हे दिसत नाहीत.

      Delete
  2. श्रेयस देशपांडे26 December 2014 at 17:00

    आपली भुमिका अत्यंत योग्य आहे.

    ReplyDelete
  3. मस्त लेख
    कांग्रेसच्या डोळ्यात अजंन घालणारा
    वस्तुस्थिती ची जाणीव करून देणारा
    परिस्थिति सुधरावणारा शहाणपण शिकवणारा
    आणि कांग्रेस ने काहिच बोध नाही घेतला तर
    त्याना कोणच वाचवु शकणार नाही

    ReplyDelete
    Replies
    1. रमेशजी, माझ्या ब्लॉगला नियमित भेट देणाऱ्या तुम्ही आज बऱ्याच दिवसांनी भेट दिलीत. काँग्रेसला कधीतरी शहानपण सुचायला हवं.

      Delete