Tuesday 14 April 2015

मुली पळून का जातात ?

परवा गावाहुन आलो. आणि आल्या आल्या बायकोने बातमी दिली, ' आहो, आमक्या आमक्याची आमकी पळून गेली ना. ' मुलगी जवळची. परिचीताची. सुस्वरूप. घरदार सुशिक्षित……. सुसंस्कृत.

' मुलगा काय करतो ? ' माझा प्रश्न.

' काही नाही हो. कुठेतरी मोबाईल दुरुस्तीची टपरी आहे. मुलगा काळा कुळकुळीत आहे. शिवाय
खालच्या जातीतला. ' बायकोनं माहिती पुरवली.

आणि मग माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं. मुली पळुन का जातात ? वर्ष सहा महिन्यापूर्वी ज्या मुलाचा परिचय झालेला असतो तो मुलगा जन्मदात्या आई वडिलांपेक्षा जवळचा कसा वाटतो ? घरदार सोडुन एखाद्या मुलाबरोबर निघून जाताना मुली नेमकं काय पहातात ?

एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर पळुन जाण्याची माझ्या माहितीतली हि काही पहिली घटना नव्हती. पण ते आज माझ्या आसपास घडलं होतं. आणि म्हणुन मला याविषयी लिहिण्याची गरज वाटली.

आजकाल टिव्ही, सिनेमे यासारख्या माध्यमांनी प्रेमाचा पार बाजार करून टाकला आहे. वयात आल्यानंतर प्रेमात पडणं हि एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. प्रेमात पडताना कोणताही मुलगा बऱ्याच मुलगी किती सुंदर आहे तेच पहातो. पण मुली काय पहातात ? त्या मुलाचं घरदार. त्याचं शिक्षण. त्याची संपत्ती, त्याचं रूप नेमकं काय पहातात ? कि यातलं काहीच पहात नाहीत आणि केवळ प्रेम या एका शब्दाच्या बुडबुडयावर विश्वास ठेवतात.

ज्यांनी आपल्याला जन्म दिला, अठरा वीस वर्ष ज्या आई वडिलांनी आपलं संगोपन केलं त्यांच्यापेक्षा काही महिन्यापुर्वी , अथवा काही वर्षापुर्वी परिचय झालेल्या मुलावर मुली विश्वास ठेवतातच कसा ? कि आई वडिलांच्या प्रेमापेक्षा आपल्या प्रियकराच्या  ' मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. तू माझ्या आयुष्यात आली नाहीस तर मी आत्महत्या करीन. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला खूप जपेन. तुला काही कमी पडून देणार नाही. ' या असल्या शब्दांची भुरळ पडते. कितीही प्रेम असु दे पण आपल्या आई वडिलांना अंधारात ठेऊन मुलींना एका क्षणात आपलं घरदार सोडावसं वाटतच कसं ?

चुकतं कुणाचं आई वडीलांचं कि मुलांचं ? नक्कीच मुलांचं. आई वडीलांचं चुकत असेलही, ते  आपल्या मुलीला अधिक बंधनात ठेऊ पहात असतील. पण ते जे काही करताहेत ते आपल्या भल्यासाठी याची जाणीव मुलींना का नसावी. जग कितीही पुढं गेलं तरी स्त्री हि सेक्सच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेली वस्तु आहे हि समाजाची भुमिका कधीच बदलणार नाही. आपल्यापेक्षा पन्नास वर्ष पुढे असलेल्या अमेरिकेतही स्त्रियांविषयीच्या या भुमिकेत फारसा फरक पडलेला नाही. मुलं मुलींना जाळ्यात ओढतातच. पण मुलींनी विचार करायला नको का ?

ओढ , आकर्षण, प्रेम हे सारं ठिक पण आपल्या जन्मदात्यांना विश्वासात घ्यायला नको का ?

आई - वडीलांचंही चुकत असेल. ते आपल्या मुलांना विश्वासात घेत नसतील. पण आई - वडिलांनी मुलांना विश्वासात घ्यायचं म्हणजे काय करायचं ? अर्थात असं एकदम सोळाव्या वर्षी मुलांना विश्वासात घेणं शक्य नसतं. तारुण्याच्या पत्येक पायरीवर मुलांचा आपल्यावरील विश्वास वृंधिगत व्हावा म्हणुन आई वडिलांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे काय करायला हवं ?

अलिकडे आई बाबा दोघेही आपापल्या करिअर मध्ये अडकलेले असतात. पण माझी पत्नी पदवीधर असुनही आणि त्या वेळी म्हणजे वीस वर्षापुर्वी तिला बँकेतल्या नौकरीची ऑफर आलेली असतानाही मी तिला तो जॉब करू नये असे सुचविले. तिने ते  मान्य केले. कधी कधी मुलं विचारतात, " आई बाबा तुमचं करिअर काय ?'

तेव्हा मी त्यांना सांगतो, " तुमचं करिअर घडवणं . हेच आमचं करिअर. "

आज आम्ही आमचा हेतु बऱ्याच प्रमाणात सध्या केलाय असे वाटते.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मुलांकडून चुका होतच असतात. त्यावेळी त्यांच्यावर न रागवता,  न चिडता, त्यांना मारहाण अथवा कोणत्याही प्रकारची शिक्षा न करता त्यांच्या चुका समजावुन घ्यायला हव्यात. त्यांच्या वागण्याचे परिणाम समजावून सांगायला हवेत. आपण त्यांच्या आयुष्याच्या भल्यासाठी क्साविचार करतो आहोत ते पटवून दयायला हवं. पण आपण असं न करता मुलांना रागवत राहिलोत, शिक्षा करत राहिलोत तर आई बाबा आपले शत्रू आहेत अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होते. आणि एकदा का अशी भावना मुलांच्या मनात निर्माण झाली कि आई - बाबा आणि मुलांमध्ये एक लपंडाव सुरु होतो. मुलं आई - बाबांशी खोटं बोलु लागतात.

पण आई - बाबा आपले मित्र आहेत. ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत समजावुन घेतील अशी भावना मुलांच्या मनात निर्माण झाली तर मुलं आई बाबांचा विश्वासघात कधीही करणार नाहीत. अगदी मी माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. जेव्हा माझ्या मोठया मुलाने कॉलेजच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं त्या क्षणी मी त्याला , " हे बघ बेटा, कधी एखादया मुलीविषयी तुझ्या मनात प्रेमभाव निर्माण होतोय असं वाटला तर खूप गुंतण्या आधी आम्हाला सांगायचं. त्या मुलीशी आमचा परिचय करून दयायचा. आमच्या परीनं आम्ही चौकशी करू. आणि आम्ही होकार दिला तरच पुढे व्हायचं. अर्थात कुणावर प्रेम करत असताना आपलं करिअर, आपलं भविष्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यायची.'

आज माझा मुलगा अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात आहे. शेवटची परीक्षा राहिली आहे. महिन्याभरात अंतिम परीक्षा आहे. चार वर्षात त्याला अनेक मित्र मैत्रिणी भेटल्यां. मोठा ग्रुप आहे त्याचा. सणासुदीला मुलं - मुली घरी येतात. आमच्याशी मोकळेपणानं बोलतात. त्याच्याविषयी काही तक्रारी सांगतात. त्यात गंमतीचा भाग अधिक असतो.

पण माझा मुलगा मला सांगतो, ' नाही हो बाबा. मी कुणाच्या प्रेमात वैगेरे पडत नसतो. आणि तसं काही असलंच तर मी तुम्हाला नक्की सांगीन . '

आपण कितीही नाही म्हणालो तरी मुला - मुली मध्ये भेद आहेच.'आणि त्यामुळेच मुलांएवढीच मुलींचीही काळजी घ्यायला हवी.

मुला मुलींनीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपले आई वडील केवळ आपल्या भल्याचाच विचार करत असतात. आणि आपल्या आयुष्याची त्यांना जेवढी काळजी आहे तेवढी अन्य कोणालाच असणार नाही.

या लेखासाठी चित्र शोधत असताना, एका चित्रावर एक वाक्य होतं ते वाचल्यानंतर मला हा शेवटचा मुद्दा लिहावासा वाटला. ते वाक्य होतं, ' Let's run away to the place where love first found us.', ' अर्थात सर्वात आधी जिथे आपल्याला प्रेम सापडेल तिथे आपण निघुन जाऊ. ' पण मुल जन्माला येतं तेव्हा ज्या ठिकाणी आईला पान्हा फुटो तिथंच प्रेमाचा उगम असतो ' हे तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहचताना लक्षात का येत नाही. 

आई मी पहातेय इथं
कधीपासुन त्याची वाट
पण तुझी आठवण माझी
सोडत नाही पाठ

पुढं पाऊल टाकावं का ?
आई काही कळत नाही
अंधारात सुद्धा सोबतीची
तुझी सावली ढळत नाही

घरातुन निघताना आई
लागते मला ठेच
येता नाव तुझं ओठावर
पडतो मला पेच

काय करावं पुढं आता
टाकावं का पाऊल
येईल का सोबतीला
आई तुझी चाहुल.

नाहीच जात आई पुन्हा
येते मी फिरून
माझं  प्रेम मी ओवाळुन
टाकीन तुझ्यावरून.












 


                   

                                                        

14 comments:

  1. " तुमचं करिअर घडवणं . हेच आमचं करिअर. " hats off !!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार सर. मीच कशाला, सगळेच आई-वडील आपल्या मुलांच्या भवितव्यासाठीच धडपडत असतात. पण खूप थोड्या मुलांना याची जाणीव असते.

      Delete
  2. छान आहे कविता. पण कसं असतं की मुलींना लहानपणापासूनच हे माहिती असतं की आपल्याला आपल्या आईबाबांना सोडून दुसरीकडे राहायला जायचं आहे. मग जायचं तर आहेच तर ती व्यक्ती आपल्या मनासारखी का असू नये? आपल्याकडे जर मातृसत्ताक पद्धत असती आणि मुली कायम आपल्याच घरी राहत असत्या आणि मुलगा सासरी गेला असता तर मला नाही वाटत कोणतीच मुलगी पळून गेली असती…

    ReplyDelete
    Replies
    1. चला आता तुम्ही माझा ब्लॉग वाचुन नियमितपणे अभिप्राय दयाल असे गृहीत धरायला हरकत नाही. आपण अत्यंत योग्य मत मांडलेत. पण मुलींनी मनासारखा जोडीदार निवडायला माझी मुळीच हरकत नाही. पण ते करताना आई - बाबांचा विचार घ्यावा असे मला म्हणायचे आहे. कारण आई वडिलांना अंधारात ठेऊन आपल्या प्रियकराबरोबर निघून जाणाऱ्या मुली बहुदा १५ ते १८ - १९ या वयाच्या असतात. आणि हे वय भुलण्याचे असते. म्हणुनच पुढील आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात.

      Delete
    2. मग Boys पळून गेले असते.

      Delete
    3. विनायकजी , आपण इंद्रधनू या उद्देशून लिहिलेले दिसते. पण आपली प्रतिक्रिया मोठी गंमतीशीर आहे.

      Delete
  3. Thanks friend. Pl be in touch.

    ReplyDelete
  4. शुभम रणपिसे18 April 2015 at 13:25

    आज पहिल्यांदाच तुमचा ब्लॉग वाचला. अत्यंत संस्कारपुर्ण लेखन.

    ReplyDelete
    Replies
    1. शुभमजी, अभिप्रायाबद्दल आभार. पहिल्यांदाच ब्लॉगला भेट देऊनही अभिप्राय नोंदविण्याचे सौजन्य दाखवलेत त्याबद्दल अत्यंत ऋणी आहेऽअत नियमित भेट दयायल हि अपेक्षा.

      Delete
  5. Great Line.
    " मुला मुलींनीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपले आई वडील केवळ आपल्या भल्याचाच विचार करत असतात. आणि आपल्या आयुष्याची त्यांना जेवढी काळजी आहे तेवढी अन्य कोणालाच असणार नाही."

    ReplyDelete
    Replies
    1. विनायकजी , आपली अभिप्रायाबद्दल मनापासुन आभार.

      Delete
  6. अप्रतिम ब्लॉग
    आज मला ही हाच प्रश्न पडला होता की मुली का पळून जातात नेमकी चूक कोणाची असते
    ब्लॉग वाचून छान वाटलं सर

    ReplyDelete
  7. अप्रतिम ब्लॉग
    आज मला ही हाच प्रश्न पडला होता की मुली का पळून जातात नेमकी चूक कोणाची असते
    ब्लॉग वाचून छान वाटलं सर

    ReplyDelete
    Replies
    1. आपली अभिप्रायाबद्दल मनापासुन आभार.

      Delete