Friday 17 April 2015

हरलं कोण ? राणे कि शिवसेना ?

( तळाचं व्यंगचित्र नक्की पहा . )

नुकतीच तासगावची आणि वांद्र्याची पोट निवडणुक पार पडली. एखाद्या नेत्याच्या मृत्युनं रिकाम्या झालेल्या जागेवर त्या नेत्याच्या पत्नीला अथवा मुलांना उभं करायचं हा आता ट्रेंड झालाय. इतर राजकीय पक्षांनीही त्या उमेदवाराच्या विरोधात उमेद्वार न देत आपल्याला दिवंगत नेत्याविषयी किती सहानभूती आहे याचं प्रदर्शन करायचं. पण
तासगावला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठींबा नसताना स्वप्नील पाटील सुमन पाटलांच्या विरोधात उतरले. तर वांद्र्यात दस्तुरखुद्द नारायण राणे यांनी तृप्ती सावंत यांना शह देण्याचा प्रयत्न केला. स्वप्नील पाटील आणि नारायण राणे हे पराभुत होणारच होते. तसंच झालं स्वप्नील पाटलांचा पराभवाकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही. पण नारायण राणेंच्या पराभवानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटल्या. न्युज च्यानलवर राणेंच्या पराभवासंदर्भात चर्चासत्रे रंगली. सोशल मिडीयावर राणेंना खिजवू पहाणाऱ्या पोस्टच पिक आलं. आमचा समाज प्रवाहाबरोबर पोहत जातो. त्यामुळे अवतीभवती जो सूर दिसेल तोच सूर आमचा समाज लावून धरतो. त्यामुळेच आमच्या समाजाची तुलना मला कोल्ह्याशी करावीशी वाटते. एक कोल्हा ओरडला कि बाकीच्यांनी त्याच्या सुरत सूर मिसळलाच. पण खरंच राणे पराभुत झाले का ? हरलं कोण ? राणे कि शिवसेना ? यावर निपक्षपातीपणे कोणीच बोलायला तयार नाही.

नारायण राणे पराभूत होताच ओवेसीच्या विरोधात ब्र न काढणाऱ्या उद्धव ठाकरेंना आपण वाघ असल्याची जाणीव झाली. आणि ओवेसी बोलत असताना मुग गिळून गप्प बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना वाचा फुटली. शिवसैनिक तर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणाऱ्या शिवाजी महाराजांच्या आवेशात वावरू लागले. पण आपण आपल्याच पाठीवर थाप मारून घेत आहोत हे उद्धव ठाकरेंनाच कळत नव्हत तर त्यांच्या तथाकथित मावळ्यांना कसे कळणार. 

मी राणेंचा समर्थक नाही. परंतु बाळा सावंतांच्या मृत्युनंतर त्या ठिकाणी तृप्ती सावंतांच्या बाजुने सहानभुतीची मोठी लाट असणार याची नारायण राणेंना पूर्ण जाणीव होती. आपण पराभूत होणार हेही त्यांना माहित असणार. तरीही हि जागा लढवायचा त्यांनी निर्णय घेतला. राणे पराभूत झाले पण त्यांनी त्यांची ताकद दाखवुन दिली. थोडीथीडकी नव्हे जवळ जवळ ३४ हजार मते मिळवली. राणेंनीच कशाला रहेबर खान या MIM  च्या उमेद्वारानेही १५ हजार मते मिळवली. त्याहुन महत्वाचं म्हणजे नोटाला ८१९ मते मिळाली. हि सर्व आकडेवारी हे स्पष्ट करते कि तिथं सहानुभूतीची लाट नसती तर शिवसेनेचा पराभव ठरलेला होता. 

राणे खुप निस्वार्थी आहेत. असे मला मुळीच म्हणायचे नाही. इतकेच कशाला मागच्या चार सहा महिन्यांपासून मी नारायण राणेंच्या तोंडी विकासाची भाषा एकतोय. राणे वर्षानु वर्ष सत्तेत आहेत. आणि ते सांगतात त्यानुसार त्यांनी कोकणाचा विकास केला आहे तर मग ते जनतेला का कळत नाही. ' मी विकास केला ' , ' मी विकास केला. ' असे राणेंना त्रिवार ओरडून का सांगावे लागते. मी कोकणचा शैक्षणिक विकास केला असे राणे सांगतात. त्यांनी कोकणचा शैक्षणिक विकास केला म्हणजे काय केले ? तर खाजगी शाळा - कॉलेजेस सुरु केली. त्यातुन स्वतःचे खिसे भरले आणि बेकारांची संख्या वाढवली. 

म्हणजेच राणेंनी खुप दिवे लावले आहेत असे नाही. असे असतानाही आणि सहानुभुतीची लाट तृप्ती सावंतांच्या सोबत असतानाही राणे तृप्ती सावंतांना लढत देतात. ३४ हजाराच्या आसपास मते घेतात. त्यामुळेच ' आमचा विजय निश्चित होता.' , ' हा शिवसैनिकांच्या निष्ठेचा विजय.' , ' हा शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांचा विजय . 'असल्या वल्गना करत बसण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आत्म परीक्षण करायला हवं. अन्यथा येत्या काळात शिवसेनेची मनसे होईल हे नक्की.         

खरंतर सहानभुतीची लाट केवळ एखादया मतदार संघापुर्ती नव्हे संपुर्ण देशभर काम करते. हे आम्ही इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्युनंतर पुरेपुर अनुभवलं आहे. कारण अशा रितीने मत देऊन आपण आपली सहानभुती व्यक्त केली कि आपण फार मोठं पुण्य केलं असं आमच्या समाजाला वाटतं. पण देश सहानुभुतिवर नव्हे तर सक्षम नेतृत्वर चालतो हे आमच्या जनतेला कधी कळणार कुणास ठाऊक.        



8 comments:

  1. मयुर माने.18 April 2015 at 09:31

    सर राणेंच्या संदर्भात लेख लिहुन तुमचे लेखन पुर्वग्रह दुषित नाही हे तुम्ही सिध्द केलेत.

    ReplyDelete
  2. सर या आणि मागील लेखावरून स्पष्ट होत की तुमच्या लेखनकलेचा वापर उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लिहिण्यासाठी होतो आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी अभिप्रायाबद्दल आभार. चला क्षणभर तुमचा आरोप मी मान्य करतो. पण मला एका प्रश्नाचे उत्तर दया,' उद्धव ठाकरेंचं राजकारण धोरणात्मक आहे असे आपणास वाटते ? '

      Delete
  3. लिखाण एकतर्फी वाटते त्यात उद्धव द्वेष अधिक ....... असो ज्याची त्याची आवड .......एक म्हण सांगतो अर्थ शब्दशः घेवू नये ...... म्हण - हाथी चले अपनी चाल ..कुत्ते भौके दस हजार.......

    ReplyDelete
    Replies
    1. नुपुरजी अभिप्रायाबद्दल आभार. मी उद्धव ठाकरेंचा द्वेष करण्याचे काही कारण नाही. लोकसभेच्या निवडणुकांपासून उद्धव ठाकरे कसे वागताहेत ते पहा. कोणत्या गोष्टीसाठी उद्धव ठाकरेंची पाठ थोपटावी ते आपण सांगा. मुंबईचं नाईट लाईफ यात सर्वसामान्य जनतेचं कोणतं हित आहे ? मोदींच्या, अमित शहांच्या विरोधात अद्वातद्वा बोलणारे आणि पदोपदी दंड थोपटणारे उद्धव ठाकरे ओवेसीच्या विरोधात का काही बोलत नाहीत. मी शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे. आणि नुसता कार्यकर्ता नव्हे अत्यंत सक्रीय आहे. शिवसेनेतल राजकारण किती गढुळ झालाय याची आपल्याला जाणीव नाही. वर्षानुवर्षे खासदार असलेल्या गजानन बाबर यांचे तिकीट कापले जाते आणि दुसऱ्या पक्षातुन शिवसेनेत आलेल्या केवळ नगरसेवक असलेल्या श्रीरंग बारणे या गृहस्थाला तिकीट दिले जाते. का ? कारण त्याने तिकिटासाठी दहा कोटी रुपये मोजलेले असतात. अशी एक न दोन शेकड्याने उदाहरणे सांगता येतील. अर्थात आपण म्हणता तसे , ' हत्ती चले आपनी चाल …' हेही खरेच आहे. पण हे सारे मी उद्धव ठाकरेंसाठी लिहित नाही. जनतेने शहाणे व्हावे हि इच्छा.

      Delete
    2. बाबर यांचे वय ७६ होते म्हणजे ते टर्म पूर्ण करे परेंत ८१ वर्षाचे झाले असते
      बाबर इतकी वर्ष शिवसेना एक हाती सांभाळत असताना देखील म्हणावा तसा पक्ष वाढला नाही कारण बाबर यांचे इतर पक्षाशी असलेले मैत्री पूर्ण साम्भंद
      बाबर मागच्या वेळेस खासदारकी लक्ष्मन जगताप यांच्या मुले जिंकले होते हे सत्य आहे
      बाबरना पक्षाने व्यवस्थित सन्मान दिला होता
      आणि जर का बाबर एवढे कट्टर शिवसैनिक होते तर लगेचच मनसे मध्ये कशे काय गेले

      Delete
    3. आदित्यजी अभिप्रायाबद्दल आभार. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वय किती आहे ? पक्ष वाढला नाही हे आपले निरीक्षण योग्यच आहे. पण पक्ष वाढण्यासाठी पक्षप्रमुखांची भुमिकाही तेवढीच महत्वाची आहे. बाबरांचे इतर पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध होते हेही मान्य. पण त्यामुळे पक्षाचा ऱ्हास झाला नाही. आपला पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचा पुरेसा अभ्यास आहे असे दिसते. पिंपरी चिंचवडमधील शिवसेने अंतर्गत घडणाऱ्या इतर घडामोडींविषयी आपण आपले मत मांडलेत तर बरे होईल.

      Delete