Monday 4 May 2015

तू नसतोस तेव्हा

तो तिच्या आयुष्यात येतो. मोरपंखी स्वप्नं घेऊन. ती मेंदीभरल्या हातांनी त्याला सामोरी जाते. तो तिला मिठीत घेतो. त्या क्षणी
ती फुलून येते. अंगाअंगावर रोमच उभे राहतात. तो स्पर्श म्हणजे अंगावरून फिरणारं मोरपीस वाटू लागतं. त्याच्या त्या स्पर्शानं अंगावर फुलं बरसल्याचा भास होतो. स्वतःच्या अस्तिवाचा विसर पडतो.

तो येतो ना आयुष्यात तेव्हा अगदी तेव्हाच आभाळा गवसणी घालण्याचा विश्वास जागा होतो. त्याच्यासोबत चालताना रस्ता संपूच नये कधी असं वाटतं. उन्हाचं सोयरसुतक नसतं आणि सावल्यांचा मोह नसतो. कारण तोच तर असतो तिच्या आयुष्याची सावली. गार …… शांत …… आल्हाददायक……… आयुष्यातल्या उन्हाला थोपवून धरणारी……… खुप दूरवर परतवून लावणारी. तिला विश्वास असतो त्याची सोबत तिच्यापर्यंत पोहचूच देणार नाही आयुष्यातल्या उन्हाच्या झळा.

किती सवय लागली तिला त्याची. कधी मुल होऊन त्याच्या कुशीत शिरून झोपायचं. कधी आई होऊन त्याला कुशीत घ्यायचं. तिला आठवलं लग्नं झाल्यानंतर काही दिवसानी तिनं त्यांच्या बेडरूममधली एक कपाटात ठेऊन दिली. रात्री बेडरूम मध्ये आल्यावर त्यानं आहे ती उशी मानेखाली घेत तिला विचारलं, " तुला उशी नकोय का ? "

" हवीय ना. " ती त्याच्या बेडवर त्याच्या जवळ विसावत म्हणाली.

" मग बेडवरची उशी काढून का ठेवलीस ? "

" कारण आजपासुन मला हि उशी हवी आहे. " म्हणत ती त्याच्या कुशीत शिरली आणि त्याचा हात उशाखाली घेतला. त्यांनतर बेडमध्ये दुसरी उशी आलीच नाही.

तो आयुष्यात आल्यापासून तिला तिचं आयुष्य आभाळ वाटू लागलं चंद्रानं भारलेलं…………तो आयुष्यात आल्यापासून तिला तिचं आयुष्य समुद्र वाटू लागलं फेसाळत्या लाटांच ………… तो आयुष्यात आल्यापासून तिचं आयुष्य रातराणी झालं …………… अखंड दरवळणारं …………तो आयुष्यात आल्यापासून तिचं आयुष्य फुलपाखरू झालं मनासारखं बागडणारं. 

पण तर निखळून पडावा आभाळातून तसा तो दुरावतो तिच्या आयुष्यातुन. ती करते वेचण्याचा प्रयत्न त्याच्या अस्तित्वाचा प्रकाश. पण ती स्वप्नांना बिलगणारी. तिला कळतच नाही प्रकाशाला मुठीत घेता येत नाही. तो नसल्यावर वेढणाऱ्या अंधाराला नाकारता येत नाही. हातात ब्रश असल्याशिवाय चित्र साकारता येत नाही. तिला कळतच नाही कधी निसटला आपल्या हातुन ब्रश ? आता आपल्या आयुष्याचं चित्र कसं पुर्ण करायचं. ब्रश तर नाहीच राहिला आपल्या हाती पण रंग तरी कुठं दिसताहेत अवतीभोवती. आणि हळुहळू तिच्या लक्षात येऊ लागतं आपल्याकडं काहीच नव्हतं आपल्या आयुष्याचं चित्र रेखाटण्यासाठी. तो आला आपल्या आयुष्यात आणि ब्रश झाला …… रंग झाला……. अगदी आपल्याला हवं तसं चित्रसुद्धा तोच झाला. 

पण तो गेला आणि आयुष्याचे रंगच उडाले. आता तिची सावलीसुद्धा तिला नकोशी वाटते. आता तिला तिचं आयुष्य भासु लागतं एखादया निष्पर्ण झाडासारखं………पुन्हा अंकुरण्याची आस हरवलेलं……. हरवलेल्या डोळ्यांनी अवतीभोवती आयुष्याच्या पाचोळ्याकडे पहाणार………. घरट्यासाठी पाखरांनी आपल्या आश्रयाला यावं हि आस हरवेलं. 

आता काहीच नको वाटतं तिला. दारात आलेल्या चिमण्यांना दाणेही टाकावेसे वाटत नाही. भीती वाटते तिला त्या चिमण्या आपल्या टोचून टोचून रक्तबंबाळ करतील याची. 

या सगळ्या भावनांना कवेत घेवू पहाणारी हि कविता - 

तो सोबत होता तेव्हा …… 


तो सोबत होता तेव्हा
शिशिरालाही असायची अंकुरण्याची आस 
वसंतऋतुलाही हवा असायचा चैत्राचा मास 
समुद्राच्या निळाईसारखं आयुष्य होतं
दरवळणाऱ्या क्षणांना ओंजळीत घेतं 

पण तो दूर गेल्यापासून 
ऋतू बसतात सारे रुसून 
फुंकर घातली तरी आयुष्याचा 
गळून जातो मोहर
चांदण्यांना नाक मुरडीत 
खुशाल बसतो चकोर
रंग उडून गेलेल्या चित्रासारख 
आयुष्य फिकट कॉन्व्हास होतं 
सळसळणं विसरलेल्या झाडासारखं 
निपचित पडून रहातं. 

आता दारात आलेल्या चिमण्यांना 
दाणे घालावेसे वाटत नाही 
उजाड झालेल्या आयुष्याला 
पाणी घालावंसं वाटत नाही 

आठवणींच्या पक्षांचीही आता 
उपटून टाकावी वाटतात पिसं 
हवेवरती स्वर झालेलं गाणं पाहुन 
कानात ओतावं वाटतं शिसं.      

डोळे झाकुन प्रकाशाच्या
रानात फिरता येत नाही
चकोराला चांदण्याशिवाय
आणि झुरता येत नाही.  

 
  
  
     

4 comments:

  1. ज्याला स्वतःचे दु:ख कळते, त्याला समोरच्याचे दु:ख समजून घ्यायला जास्त वेळ लागत नाही. माणसांना चिडचिड करताना पाहतो आपण. पण या चीडचीड करण्यामागे त्यांना दुःखाचं न उलघडत असलेलं कारण कारणीभूत असतं. ज्याने स्वत: गमावणं अनुभवलंय ती व्यक्ती समोरच्याकडून सहसा काही हिसकावून घेत नाही... कारण त्यामागचं दु:ख काय असतं हे ती व्यक्ती जाणून असते... 
    इतका समजूतदारपणा प्रत्येक जोडीदारात असला, तर आयुष्य जगण फार सोप्प होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. रणजीतजी, आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलेली दिसते. अत्यंत विचारपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. आपल्यासारख्या रसिक वाचकांचे अभिप्राय मनात नवी उमेद निर्माण करतात. पुन्हा एकदा आभार.

      Delete
  2. Sir आपण मला मार्गदर्शन कराल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. मुरारी जी , आपल्या मेलला उत्तर दिले आहे. आभार.

      Delete