Wednesday 10 June 2015

हरवलेला मोबाईल , सापडलेली माणसे


परवा आईला गावाहुन एसटीत बसवुन दिलं. तिचा मोबाईल पिशवीच्या तळाशी होता. मीच तिला तो पिशवीतुन काढून हातात ठेवण्याचा सल्ला दिला. कारण तिला घेण्यासाठी माझे मामा दौंडच्या स्टन्डवर येणार होते. पिशवीच्या तळाशी असलेला मोबाईलची
रिंग वाजल्याचे तिला कळाले नसते. किंवा कळले असते तरी प्रवासात पिशवीतून मोबाईल काढताना तिची धांदल उडाली असती. तासाभराने मला आईच्या फोनवरून फोन आला. पण लगेच कट झाला. मला वाटलं, ' चला आई सुखरूप पोहोचली. ' 


दुसऱ्यांदा पुन्हा फोन आला. आवाज एका अपरिचित गृहस्थांचा. " हा फोन कुणाचा आहे ? "

" माझ्या आईचा. " मी.

" पण तुमच्या आईकडून हा मोबाईल एसटीत पडलेला होता. तो आम्हाला सापडलाय. " समोरच्या व्यक्तीचं नाव विचारण्याचं भान मला राहिलं नाही.

" साहेब एक काम करा. हा मोबाईल  तुमच्याकडेच ठेवा. मी तुमच्याकडे येऊन घेवून जाईन. " मी.

" नाही. सापडलेला मोबाईल मी माझ्याकडे ठेवत नाही." समोरचे गृहस्थ मला काहीसे शिष्ट वाटले.

" मग कसे करायचे ? मी.

" मी हा मोबाईल कंडक्टर देतो. ते ठरवतील काय करायचं ते. "

कंडक्टरने मोबाईल बारामती डेपोला झांबरे नावाच्या गृहस्थांकडे ठेवला. मी वेळोवेळी फोन करतच होतो. झांबरेंचा संपर्क घेतला. त्यांच्याशी बोललो. " झांबरेसाहेब मी फोन घ्यायला रविवारी आलो तर चालेल का ? " मी.

" रविवारी माझी सुट्टी असते." झांबरे.

" ठिक आहे. मग सोमवारी आलो तर चालेल. "

" हो चालेल ना. पण तुम्ही कोठे असता. "

" पुण्यात. "

" मग रविवारी मी पुण्यात येणार आहे. तेव्हा मी तुम्हाला फोन घरपोच करू शकतो. " माझ्या मनात आले, ' किती हा चांगुलपणा. '

"  झांबरेसाहेब, आपल्या सहकार्याच्या भूमिकेबद्दल खूप खूप आभारी. पण मी नगरला आहे. त्यामुळे तुम्ही पुण्यात आलात तरी मी पुण्यात नसेन. शिवाय मी तुम्हलाखुप तसदी देऊ इच्छित नाही. तेव्हा मीच आपणाकडे सोमवारी येतो "

" ठीक आहे. "

हे सगळं होईस्तोवर मला एक एसएमएस आला. त्यात माझा मोबाईल माझ्या ताब्यात मिळाल्यानंतर फोन करून तसे कळविण्याची कळविण्याची विनंती केली होती.

रविवारी रात्री मी मामांकडे गेलो. सोमवारी सकाळी मामांची गाडी घेऊन बारामती गाठली.  झांबरेसाहेबांचा शोध घेतला. पंचावन्नच्या आसपासचे गृहस्थ. निर्मळ आणि सात्विक चेहरा. खुपच छान आणि सुस्वाभावी होते. त्यांनी फोन माझ्या ताब्यात दिला. मी हजार पाचशेची नोट त्यांच्या समोर धरू शकलो असतो. पण माझे ते कृत्य म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणाला दिलेली शिवी ठरली असती. त्यामुळे आभारादाखल मी त्यांना केवळ चहा पाजला. आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. आणि पुन्हा एकदा झांबरे साहेबांचे आभार मनात मी निघालो.  

फोन तर मिळाला होता. माझे काम झाले होते. पण ज्यांना माझा फोन सापडला होता. आणि फोन ताब्यात मिळाल्यानंतर फोन करून कळविण्याची ज्यांनी विनंती केली होती त्यांना फोन केला नसता तर मी कृतघ्न ठरलो असतो. म्हणुन त्या गृहस्थांना फोन केला. त्यांचे आभार मानले. तर त्यांनी मला घरी येण्याची विनंती केली. मला घेण्यासाठी स्टेन्डवर येण्याची तयारी दाखवली. पण मी काही तीन पावले जमीन मागणारा , आणि दोन पावलात जमीन आणि आकाश व्यापुन तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवणारा वामन नव्हतो. मी त्यांना त्यांचे नाव विचारले. पत्ता विचारला. आणि पत्ता शोधत त्यांच्या घरी पोहचलो.

दोघेच पती - पत्नी घरात होते. प्रसन्न चेहऱ्याने माझं स्वागत झालं. पाण्याचा ग्लास आला. मागोमाग वाफाळत्या चहाचा कप.

त्यांचं नाव अजय दरेकर. पेशानं प्राध्यापक. इकॉनॉमिक्स हा त्यांचा विषय.. त्यांच्या बारामती जवळील सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाविषयी ते भरभरून बोलत होते. अर्थशास्त्र हा त्यांचा विषय असला तरी  त्यांचं व्यक्तिमत्व खुप सोशल असावं असं मला त्यांच्या बोलण्यातुन जाणवत होतं. आणि ते खरंच होतं. ते भारत ज्ञानविज्ञान समुदाय या संस्थेचे सक्रिय सभासद होते. संस्थेविषयी सुद्धा खुप भरभरून बोलत होते. शेती, शिक्षण, महिला सबलीकरण, बालआरोग्य या क्षेत्रात भरीव काम करणारी हि संस्था. 

त्यांची पत्नी स्वाती दरेकर. त्या दिपस्तंभ करिअर अॅकडमीच्या संचालिका. या अॅकडमीविषयीसुद्धा त्यांची मानसिकता खूप वेगळी. ' निव्वळ मुलांना शिकवणं हा हेतू नाही म्हणाले आमच्या अॅकडमीचा. शिक्षण द्यायचंच पण त्याच बरोबर मुलं घडवायची हि आमची खरी भुमिका. 

ऐकीकडे शिक्षणाचं बाजारीकरण करणारे राजकर्ते कुठे आणि दुसरीकडे मुलांना घडविण्याची इच्छा बाळगणारे हे पती - पत्नी कुठे. 

मला घाई होती. पुन्हा दौंडला जाऊन पुण्याला पोहचायचं होतं. पावणेबाराची ट्रेन पकडायची असा माझा मानस होता. पण कसलं काय. त्या देव माणसांच्या सहवासात मी माझं अस्तित्व हरवून बसलो. आमच्या खूप गप्पा झाल्या. माझ्या कविता, ब्लॉग याविषयी चर्चा झाली. दोघांनी मला चार जुलैची तारिख देऊन त्यांच्या संस्थेत व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं. 

त्यांना जेव्हा मोबाईल सापडला तेव्हा ' हा मोबाईल कोणाचा ? ' अशी एसटीतल्या उपस्थित प्रवाशांना विचारणा करताच माझ्या मोबाईलवर हक्क सांगणारे उपटसुंभसुद्धा त्यांना भेटले. तसेच ' माझ्याकडे द्या तो मोबाईल मी पोहोच करतो ज्याचा त्याला ' असे सांगत माझा मोबाईल गिळू पहाणारी आसामी सुद्धा त्यांना भेटली. 

पण स्वतः दरेकर पती - पत्नी , एसटी कंडक्टर दिक्षित, बारामती आगाराचे कंट्रोलर झांबरे या जगावेगळ्या माणसांमुळे मला माझा मोबाईल परत मिळाला.

मोबाईल हरवल्याचं फारसं दुखः झालं नसतं. पण हि चांगली माणसे सापडल्याचा खूप आनंद झाला होता.

घरा- घरात शिवाजी जन्माला यावा हि आजच्या काळाची गरज नाही. कारण आज आपल्याला मोगलांशी, निजामाशी लढायचं नाही.

पण दरेकरांसारखी माणसे घरा - घरात जन्माला यायला हवीत. कारण वाट चुकलेला समाज पुन्हा वाटेवर आणायचा असेल तर तरुणांना घडवू पहाणाऱ्या दरेकरांसारख्या माणसांची समाजाला फार गरज आहे.
        

4 comments:

  1. खूप छान ! सर समाजातील असे मोती जपलेच पाहिजे .परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो .

    ReplyDelete
    Replies
    1. मयुरेशजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनपुर्वक आभार.

      Delete
  2. खूप सुंदर आणि शेवट तर खूपच अर्थपूर्ण.

    ReplyDelete
    Replies
    1. ललितजी अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

      Delete