Wednesday 23 September 2015

गावाकडचं गाणं

माझं गाव ओढ्या वघळीतलं. पावसाळ्यात तुडूंब भरून वाहणारं.............उन्हाळ्यात डोहाडोहातून साचणार. कधी कधी गलितगात्र होऊन ठणठणीत कोरडं पडणारं. आभाळाकड पहात धाय मोकलून रडणारं. 
वस्तीवरची शाळा चवथीपर्यंत. त्यापुढं शिकायचं असेल तर कमीत कमी तीन किलोमीटर चालत जायला हवं आणि शाळा सुटल्यानंतर
पुन्हा तेवढच चालत यायला हवं. उन्हाळ्यात पायात चपला असतीलच याची खात्री  नाहीच पण हिवाळ्यात स्वेटरही मिळणार नाही. उन्हाळ्यात फुफाट्यातले चटके सोसत आणि हिवाळ्यात थंडीत कुडकुडत शाळेत जायला हवं. असाच कधीकाळी मी तिथल्या शाळेत गेलो आहे.
त्यामुळंच गावी गेल्यानंतर अनवाणी पायपीट करत शाळेत जाणारी एवढी एवढीशी मुलं मुली पहिली कि ' सर्व शिक्षा अभियान ' च्या जाहिरातीतल्या ' स्कूल चले हम .......... ' असं म्हणत आनंदानं बागडणाऱ्या मुलांच चित्रं माझ्या  डोळ्यासमोर उभं रहातं ..........आणि शहरातली दारादरात येणाऱ्या स्कूल बसमध्ये बसून शाळेत जाणारी मुलं किती नशीबवान असं वाटू लागतं. 
असो!!!!!!!
तर परवा दिवाळीच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो. सोबत भाऊही होता. त्याची दोन आणि माझी दोन मुलं, आई असे सारे सोबत.
संध्याकाळी शेतातून वस्तीवरच्या घराकडे जायला निघालो. माझे दोन तीन चुलत भाऊ रानातच घर बांधून शेताच्या कडेलाच रहातात. माझी आई चुलतभावाच्या छोट्या मुलाला म्हणाली, " तात्या, चल रे आमच्या सोबत. रहा आजची रात्र आमच्या बरोबर. सकाळी उठून येऊ परत रानात. "
तो तिसरीतला पोरगा. अश्या तश्या कपड्यातला ( म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलाचे असतात तसे कपडे हं ), डोक्याचा चमन केलेला. निघाला आमच्या सोबत. पायात पायताणही नाही. माझ्या नव्याकोऱ्या गाडीत्नच घरी जायचं होतं. त्याला त्याचंही अप्रूप .
आम्ही घरी पोहोचलो.
रात्री गच्च काळोखातही मिणमिणणारा माझं गाव. अंगणात अंथरून टाकून आभाळाखाली चांदण्यात न्हात आम्ही निवांत बसलेलो. मुलांची दंगा मस्ती चाललेली. माझ्या आणि भावाच्या बायकोचा आत चुलीवर स्वयंपाक चाललेला. आई आमच्यातच बसलेली. सुखाला कुरवाळत. ती म्हणाली, " तात्याला छान गाणी येतात हं.  "
मी तर शब्दांचा दास. आईचा शब्द उचलून धरत मीही त्याला आग्रह केला.
झालं !!!!! लगेच ते पोरगं गाणं म्हणू लागल. ते मला इतकं आवडल कि मी लगेच ते माझ्या मोबाईलवर रेकोर्ड करून घेतलं. ते गाणं तुमच्या समोर मांडावस वाटलं. म्हणून हा सारा उपद्व्याप.
आमची शहरातली पोरं ' हम्पी .......डम्पि ' शिकतात ........आणि गावाकडची पोरं ..........!!!!!!!!!!
कोकणात बारा मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. शिक्षणसुद्धा असंच गावागणिक बदलत असावं असं मला वाटलं. हे सारं राहू द्या. ते गाणं तर पहा............

6 comments:

  1. गणेश बिडकर30 September 2015 at 17:34

    ' कोकणात बारा मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. शिक्षणसुद्धा असंच गावागणिक बदलत असावं असं मला वाटलं. ' अगदी खरे , मी ग्रामीण तसेच नागर भागातही शिकविले आणि हा फरक चांगलाच अनुभवला आहे , गणेश बिडकर , प्राथमिक शिक्षक , सांगली

    ReplyDelete
    Replies
    1. आभार गणेशजी. आपण आपल्या व्यवसायाशी अत्यंत प्रामाणिक दिसता.

      Delete
  2. सुरेश लसणे1 October 2015 at 07:46

    नेहमीप्रमाणे अप्रतिम

    ReplyDelete
    Replies
    1. सुरेशजी , अभिप्रायाबद्दल आभार. परंतु माझ्या माहिती प्रमाणे आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलेली दिसते.

      Delete