Thursday 5 May 2016

Marathi Poem : सयेबाई उठं गं


आज बऱ्याच दिवसांनी लिहितोय. महिनाभर गावी होतो . शेतावर. कांदा काढला , वखार केली , कांदा वखारीत भरला. वखार सील केली. आणि आलो पुण्यात.

जगात सर्वात महाकठीण गोष्ट कोणती ? तर
एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला समजावून घेणं. सासू सुनेचं तर बोलायलाच नको. त्यांचं नातं सापा मुंगसाचं आणि वैर विळ्या भोपळ्याचं. सासू - सुनेचा विषय बाजूला ठेवला तरी जावा - जावाजावांचे , नणंद - भावजयांचे सूर खूप जुळतात असं नव्हे. आईचे आणि लेकीचेही छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळत नाहीत.ज्या घरात एक चूल पण दोन स्त्रिया असतात त्या कामांची वाटणी केल्याशिवाय रहात नाहीत. आणि दोघीही आपलं काम दुसरीवर कसा ढकलता येईल याचाच सर्वाधिक विचार करतात.  


हे सगळं लिहिण्यामागे स्त्रियांवर टिका करणे हा या लेखनाचा हेतू नाही. कारण संसाराचा गाडा खऱ्या अर्थाने स्त्रियाच ओढतात. पुरुषांपेक्षा त्या अधिक धोरणी , व्यवहारी , चतुर आणि हुशार असतात.

तिचं लग्न होतं आणि ती सासरी जाते. तिचं सासर गावाकडच. हिरव्या शिवाराच्या कुशीतलं. कोंबड्याची बांग हाच तिथला गजर. गाय गुरांचा हंबर हा जागर. तिचं सासर म्हणजे सळसळत चैतन्य.

तिला मात्र माहेरची सवय. आईचा सहवास. तिचे लाड. सूर्य चांगला तापेपर्यंत झोपायची. कुठलं काम ना धाम. सासरी गेल्यावर खरं तर झुंजू मुंजू होताच तिनं उठायला हवं होतं. पण तिला जाग येत नाही.पण तिला उठवायचं कुणी ? 

कुठंही गेलं तरी जीवाभावाचं माणुस जोडण्यात स्त्रिया फार पटाईत असत्तात. या गाण्यातली नववधु सुध्दा तशीच. ती सासरी गेल्यानंतर काही तासात तिचं त्याच घरातल्या एका समवयस्क तरुणीशी जीवाभावाचं नातं जोडला जातं ती तिची जिवाभावाची सखी होते. आणि मग त्या मातीच्या संस्कारात वाढलेली ही तिची जिवाभावाची सखी तिला साखर झोपेतून जागं करताना जे गाणं म्हणते. ते गाणं म्हणजे - सयेबाई उठं गं ……

ही गाणं लिहिताना मी अनेक बारकाव्यांचा विचार केला आहे. विश्वास आहे वाचकांना हे गण मनापासून आवडेल.            

   सयेबाई उठं गं ……


सयेबाई उठं गं, कोंबडं आरावलं
थोरल्या जावंनं, जातं गं फिरवलं
दाण्याच्या झाल्या कण्या
कण्याचं पिठं गं
पिठात तान्ह्यानं , आक्षार गिरवलं
सयेबाई उठं गं, कोंबडं आरावलं……… ll १ ll

सयेबाई उठं गं, तांबडं फुटंलं
कपिलीच्या दावणीचं, वासरू सुटंलं
थोरल्या दिरानं ते ,
दावणीला घटंलं
कपिलीच्या ओढीपायी , दावंही तुटंलं
सयेबाई उठं गं, तांबडं फुटंलं……… ll २ ll

सयेबाई उठं गं, पाण्याला जायाचं
घागरीला पाण्यात , सोडून दियाचं
जाऊ दे घागरी
बुडून बुडून
घागरीत जीवन , भरून घीय्याचं
सयेबाई उठं गं, पाण्याला जायाचं……… ll ३ ll

अगं बाई , कोंबडं आरवलय , तुझी थोरली जाऊ उठली आहे. ती दळण दळते आहे. तिचा लहान बाळ उठून त्या पिठात खेलतय. कोंबडं तर तांबडं फुटण्याचा आधी आरवत. कोंबडं आरवल त्याला खूप झाला. आता तर तांबडं फुटलंय. दावणीचं कपिलीच वासरू सुटलंय. तुझ्या दिराने ते पुन्हा दावणीला घालून गायीची धार काढायला सुरवात केली आहे.

आयाबाया पाण्याला निघाल्या आहेत. आपल्यालाही पाण्याला गेलं पाहिजे. घागरीत झुळझुळणार पाणी नव्हे जगण्याची नवी उमेद भरून घेतली पाहिजे.

एवढं सांगूनही ती काही उठत नाही. मग तिची सखी तिला सांगते. पाखरासारखी पाखरं. त्यांनाही आपल्या पोटापाण्याची काळजी आहे. चिमण्या उठून चाऱ्याच्या शोधात दाहीदिशा निघाल्या आहेत. त्या पाखरांच्या चोचीतून आपलं पिक वाचवण्यासाठी शेजारी पाजारी रानात गेले आहेत. त्यांच्या गोफनीचे आवाज येऊ लागले आहेत. आपल्यालाही राखण करण्यासाठी रानात गेलं पाहिजे. हे सांगताना ती सखी म्हणते -
        
सयेबाई उठं गं, चिमण्या उठल्या
चाऱ्याच्या शोधात , दाहीदिशा सुटल्या
राखण कराया
जाऊ दोघी रानात
रानात गोफणी कडाडा फुटल्या
सयेबाई उठं गं, चिमण्या उठल्या……… ll ४ ll

तरीही ती उठत नाही. तेव्हा सासूची आणि नंदेची प्रत्येक सुनेला भीती असते याची जाणीव असलेली तिची सखी .  सासूचा आणि नंदेचा धाक दाखवताना म्हणते -

सयेबाई उठं गं, सासूबाई आराडल्या
रागापायी जात्यात , गारगोट्या भराडल्या
हिला कशी कुणाची
मुळीच नाही भीती गं
चाबकाच्या वादिवाणी, वैन्सही कडाडल्या
सयेबाई उठं गं, सासूबाई आराडल्या……… ll ५ ll

तरीही ती उठत नाही. मग ती उठते कधी तर. तिच्या नवऱ्याच नाव काढल्यावर. तू या घरातली लक्ष्मी आहेस. त्यामुळे तुला सगळ्यात आधी उठलं. आंघोळ करून देवाआधी रायाच दर्शन घ्यायला हवं अशी जाणीव करून दिल्या नंतर. ती जाणीव करून देताना तिची सखी म्हणते -

सयेबाई उठं गं, तूच आधी न्हायाचं
देवाआधी रायाचं, दर्सन घीय्याचं
ठावं आहे मला गं
नवीन नवरी तू
समद्या आधी , तुच गं लक्ष्मी हूय्याचं
सयेबाई उठं गं, तूच आधी न्हायाचं……… ll ६ ll

मग ती नवी नवरी उठते. आणि उठून काय करते. तर संसाराच्या गाड्याला जुपून घेते.अहोरात्र राबत रहाते. राबताना तिच्या पैंजणाचा आणि काकणाचा जो आवाज येतो त्या आवाजानं सगळं घर मंगलमय होऊन जातं. कारण तो नाद म्हणजे प्रथम सूर. ओंकाराहून अधिक पवित्र. सप्तसुराहून अधिक मंगल. तो आवाज म्हणजे घरादाराच चैतन्य.   

स्त्रियांना कामाचा फार कंटाळा असतो. आणि आपलं काम दुसरीवर कसं ढकलता येईल याचाच त्या बारकाईने विचार करत असतात. असं मी प्रारंभीच्या लिखाणात म्हटलं आहे. ' हाडाची काडं झाली गं बाई या संसारासाठी ' असं म्हणणारी स्त्री तर घरोघरी सापडते. पण आपल्या संसारासाठी राबताना स्त्रीच्या हाडाची खरंच काडं होतात का ? मला नाही तसं वाटत. तिच्या संसारासाठी राबताना स्त्री अणु रेणू प्रमाणे झिजते हे मला मान्य आहे. पण अशा रितीने आपल्या संसारासाठी राबताना तिच्या हाडा काडं होत नाही तर मग काय होतं तिच्या हाडाच ? ते सांगताना तिची सखी म्हणते -         

उठून घेई सई गाडयाला जुपून
वाजंतं पैंजणं, वाजंतं काकंणं
राबून सई माझी
अणु रेणू झिजते
झिजून करिते हाडाचं चंदन
वाजंतं पैंजणं, वाजंतं काकंणं
वाजंतं पैंजणं, वाजंतं काकंणं  ………ll ७ ll          



6 comments:

  1. Shendge Saheb,
    Welcome back. Aajchya yugat ashi gosht fakt kane kavita madhe rahilyat. Ajchya sunela vatate ki sasune lavakr uthun mala gharkamat madat karav(swata matra let uthnar ha bhag nirala). Sasula vatate maze adhiche aayushya kashta karnyat gele mi aata rabayche. Shevati gharo ghari matichya chuli. shahr aso vo khedegav donhikade he same aahe.

    regards.
    Bapu Tangal

    ReplyDelete
    Replies
    1. आभार बापुजी. महिनाभर लिहिले नाही. मलाही चुकल्यासारखे वाटत होते. अनेकांनी नवीन लेखन नाही म्हणून घोशा लावला होता. मधल्या काळात लिहिण्यासारखे अनेक विषय होते. पण वेळे अभावी राहून गेले. आता महिनाभर बऱ्यापैकी मोकळा आहे. काही चांगले लेखन होईल ही अशी आशा करू या.

      Delete
  2. सुंदर आणि साधी कविता. इतकं प्रेमाने तिला उठविणारी सखीही मिळणं जरा कठीण आहे. पण तुमच्या कवितेतली अगदी खेड्यातली.. (म्हणजे अजूनही जातं वगैरेवर पीठ दळणारी) युवती या चित्रातली मात्र नाही वाटत. ही तर फारच आधुनिक, पहिल्यांदाच चुली समोर बसली आहे की काय असे वाटते आहे!
    पण कविता मात्र छान उतरली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. या लिखाणावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. आजही ग्रामीण भागाच्या काही कोपऱ्यात हे चित्र पहायला मिळतं. माझ्याच वस्तीवर एका अभियंता असलेल्या तरुणीला मी जात्यावर दळण दळताना पहिलं आहे. गावात विजेवर चालण्या गिरण्या आहेत. पण आठ दिवस वीज नसल्यामुळे तिला या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. असो माझ्या लिखाणातले लेखन महत्वाचे. त्यातली चित्र ही दुय्यम असतात. चित्राला चौकट असते. तशीच ही चित्र म्हणजे माझ्या लिखानाची चौकट असते. त्यांच्यामुळे माझ्या लिखाणाला बाधा येत नसावी. लिखाणातल्या आशयाला खिल बसत नसावी असे वाटते. असो आपले लेखन मात्र का ठप्प झाले आहे कळत नाही.

      Delete
  3. अति सुंदर कविता. पण आशय वादातीत

    ReplyDelete
    Replies
    1. अश्विनिजी , आशय वादातीत म्हणजे काय ? कृपया स्पष्ट करावे.

      Delete