Friday 15 July 2016

पुणेरी ते नगरी



Propels in Pune and Ahamadnagar

पुणेरी माणूस काहीसा स्थितप्रज्ञ. शिष्ट म्हणायलाही हरकत नाही. असं असलं तरी तो माणूसघाणा मात्र नक्कीच नाही. पण उगाच कुणाला जाऊन खेटणार नाही आणि कुणाला मर्यादेपेक्षा जास्त जवळ सुद्धा येऊ देणार नाही.

पुणेकरांच्या घरात गेलात कि ते , " चहा घेणार ? " असंच विचारणार. विशेष म्हणजे
त्याच्या प्रश्नात का ? हा प्रश्नवाचक शब्द नसला तरी उच्चारात प्रश्न असतो. तोच पुणेकर तुमच्या घरी आला तर, " चहा घेणार S S S S . " हे अशा काही हेलात बोलणार कि त्याची चहा घ्याची इच्छा आहे हे लक्षात येऊन तुम्ही लगेच किचनला आवाज देणार.

पुणेकर पाणी सुध्दा विचारूनच देणार. पण त्यासाठी , " पाणी घेणार ? " असा प्रश्न न करता फक्त , " पाणी S S S णी S S S णी. " असं उच्चारणार. पण त्याच्या त्या उच्चारलाही एक प्रश्नार्थक झालर असणार. काही असलं तरी पुणेरी माणसासारखा माणूस जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. पुणेरी माणसाला कलेची जाण आहे. पुणेरी माणसाला गरजे इतकी माणुसकी आहे. पुणेरी माणसाला पैशाची हाव नाही. आणि पुणेकरांचा कधी रडीचा डाव नाही.

पुणेरी माणसा एवढा दर्दी माणुस जगात अन्य कुठे सापडणार नाही. त्याला बिस्मिल्ला खानच्या सनईपासुन भिमसेन जोशींच्या आलापापर्यंत सारं काही कळत. त्याला जीएंच्या कथा आवडतात आणि शंकर पाटलांच्या ग्रामीण ढंगातल्या कथाही हवेशा असतात. क्रिकेट तर त्याच्या रक्तात आहेच पण लाॅन टेनिस सुद्धा त्याला जवळच वाटतं. पुणेकरांनी नाटकं कोळून प्यायलीच पण सुरेखा पुणेकरच्या लावणीलाही शिट्ट्या दिल्या.

पुणेरी पाट्या प्रसिद्ध झाल्या त्या पुणेरी माणसाच्या मिश्कील आणि परखड स्वभावामुळे. यावर मी स्वतः अनुभवलेला पुणेरी पाटी हा लेख लिहिला होता.

पुण्यापासून तुम्ही जसजसं दक्षिणेला म्हणजे सातारा , कऱ्हाड , कोल्हापूर या बाजूला जाल तसतशी ती माणसं अधिक एकदिलानं रहातात असं दिसून येतं. तुम्ही पुण्यातल्या सातारा , कोल्हापूरकरांकडे पाहिलंत तर त्यांची एक वेगळी वसाहत असल्याचे लक्षात येईल. या लोकांना एकमेकांविषयी अधिक जिव्हाळा आहे असं दिसेल. त्यांच्यात अधिक घरोबा असल्याचे लक्षात येईल . त्यांच्या भाषेचा एक हेल आहे आणि पुणेरी भाषेच्या नाकावर टिच्चून तो हेल त्यांनी जपला आहे. आणि तो हेल हीच त्यांची प्रमुख ओळख आहे . सातारा सांगलीकरांना काही आवडत नसलं तरी कुस्ती आणि कबड्डीवर त्याचं मनापासून प्रेम आहे. त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज असतात तर दुसऱ्या कोपऱ्यात कोल्हापूरचे शाहू महाराज.

पण पुण्यापासून तुम्ही जसजसे North East अर्थात ईशान्येला म्हणजेच नगर मनमाड या बाजूला जाल तसतशी माणुसकी हरवल्यासारखी वाटते. ( इथं मोठा कंस अपरिहार्य आहे. कारण अलिकडे बऱ्याच जणांना आठ दिशा असतात याचा विसर पडलेला आहे. पूर्व आणि उत्तर यामधली ती ईशान्य . ) हि माणसं फक्त आपल्यापुरता विचार करतात असं दिसून येतं. पुण्यातल्या नागरयांकडे पहा तुम्ही. यांचा कुठला हेल नाही. यांची कुठली ओळख नाही. तो पुणेकर नाही हे लक्षात येतं पण तो नगरी आहे असं सांगता येत नाही.

सातारा , सांगलीकरांमध्ये जसा परस्पर जिव्हाळा दिसुन येतो तसा पुण्यातल्या नागरयांमध्ये दिसून येत नाही. तो त्याच्याच फुगीरपणात रमलेला असतो. त्याच्यासारखा तोच आणि त्याच्यासारखा अन्य दुसरा कोणी नाहीच अशी त्याची भावना असते. दोन नगरकर मांडीला मांडी लाऊन बसलेत असं चित्र अशक्य. त्यांचं कुठलं मंडळ नाही. त्यांचा कुठला अड्डा नाही. नगरकरांचं एकच सूत्र............. मी भला.............. माझं घर भलं आणि माझं काम भलं. अर्थात मी.......... मी........... आणि फक्त मीच. मी नगरकरांना नावं ठेवतोय अथवा कमी लेखतोय असं नव्हे. दोष कुणाचाच नसतो असला तर मातीचा आणि हवा पाण्याचा असतो.

पण यालाहि अपवाद असणारे आमचे काही नगरी मित्र आहेत. त्याविषयी नंतर. अर्थात मीही नगरीच. पुण्यात राहून पुणेकरांचा वाण नाही पण गुण लागलाय.








             

No comments:

Post a Comment