Saturday 16 July 2016

ढंमप्या


Dog, Pet Animal

लोकं काय काय नावं ठेवतात नाही आपापल्या कुत्र्यांची. मोती काय ? टायगर काय ? लाल्या काय ? शेरू काय ? आणि त्यांची बडदास्त सुध्दा केवढी असते. अशाच एका कुत्र्याला काखेत घेऊन मिरवणाऱ्या बाईला
मी पुण्यातल्या रस्त्यावर पाहिलं होतं. आणि त्यावर एक प्रदीर्घ विनोदी कविता लिहिली होती आणि त्या कवितेला अनेक पुरस्कारही  मिळाले होते.

माझ्या कुत्र्याचं नावं मात्र ढंमप्या आहे. अगदी पांढराशुभ्र नव्हे पण पांढरा म्हणावा असा रंग. त्या पांढऱ्या रंगावर काही पिवळे चट्टे. खाली पडलेले कान. गावरान कुत्र्यांच्या तुलनेत धिप्पाड म्हणावी अशी अंगकाठी. धडकी भरावी असे सुळे. मजबूत मांड्या. ऐटबाज शेपटी. तसा राजबिंडाच.         

मागे मी चिमण्यांवर एक लेख लिहिला होता. माझ्याकडे एक बैल होता. तोही कुणाच्या छातीत धडकी भरावा असाच. त्याचं नावं ' पठाण '. त्याच्यावरही मी ' माझ्या बैलाची दिवाळी ' आणि ' मी आणि बैल ' हे दोन लेख लिहिले होते. आणि वाचकांना ते फार आवडले होते. माझ्या कुत्र्यापेक्षाही लोक माझ्या बैलाला अधिक घाबरायचे. माझा कुत्रा अगदीच फिरस्ता माणूस दिसला तरच त्याच्या अंगावर भुंकणार. पण माझा बैल मात्र माझ्याशिवाय अन्य कुणीही त्याच्या दावणीकडे येतंय असं दिसलं कि कान टवकारायचा............ डोळे वटारायचा.........खुरांनी जमिन उकरायचा. समोरचा माणूस गर्भगळीत व्हायचा. ' दावं तुटायला किती वेळ लागायचा ' , म्हणत त्याच्यापासून चार हात लांबून जायचा.

मी शेती पहात असलो तरी माझं कुटुंब पुण्यातच असत. गावी मी एकटा. माणसं असतात अवती भोवती पण त्या एकटेपणात मला माणसापेक्षा पशु पक्षांनीच अधिक सोबत केली. आणि ती मला माणसांपेक्षा जास्त शाश्वत वाटली.

ढंमप्या हाही असाच. मला शाश्वत सोबत देणारा. खरंतर त्याला मी पाळलं नव्हतं. माझी शेती कसण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या गड्यांच्या बरोबर तो आला होता. वर्षभराने गडी निघून गेले पण ढंमप्या माझ्याकडेच राहिला.

मी जेवायचो गावातल्या खानावळीत. सकाळी जेवलो कि संध्याकाळचा डबा आणायचो. रात्री जेवायला बसलो कि दारात नसला तरी ढंमप्या नेमका यायचा. माझ्यापासुन काही अंतरावर बसायचा. खरंतर मी त्याला दिवसभर कधीही काहीही खायला द्यायचो नाही. पण मी जेवत असताना त्यानं माझ्याकडे, माझ्या ताटाकडे कधीही वखवखलेल्या , आधाशी नजरेनं पाहिल्याचं मला आठवत नाही. शांत नजरेने पुढच्या पायात डोकं घालून बसायचा. विकतच अन्न त्याच्यासाठी कसं आणि किती आणणार. पण तरीही मी माझ्यातली एक चपाती त्याला टाकायचो. तेवढी खाऊन तो तिथेच बसायचा. माझं जेवण होईपर्यंत. मी हात धुतला कि ' हाड ' न म्हणता घराबाहेर जायचा. दारात राखण करत बसून रहायचा.

मी टाकलेली चपाती संपवून त्याचं माझ्याजवळ बसून रहाणं आणि मी हात धुतल्यानंतर मन खाली घालून निघून जाणं मला नकोसं वाटायचं. मग मी माझी पद्धत बदलायची ठरवलं. त्याला माझं जेवण संपल्यानंतर आणि ताट वाटी धुतल्यानंतर त्याच्या वाट्याची चपाती त्याला टाकायचं ठरवलं.

मी निर्णय घेतल्यानंतरचा पहिला दिवस. संध्याकाळी मी जेवायला बसलो. ढंमप्या आला. नेहमीप्रमाणे पुढच्या पायात मान खुपसून माझ्या जवळ बसला. नजर शांत. मी माझं जेवण उरकलं. त्याच्यासाठीची चपाती बाजूला काढून ठेवली होती. ताट वाटी धुण्यासाठी दाराबाहेर गेलो. हा आतच होता. मी ताट वाटी धुऊन आत आलो. पहातोय तर काय यानं त्याच्यासाठी ठेवलेली चपाती उचलली होती. मी त्याच्यावर जाम भडकलो. आपल्या मुलाच्या श्रीमुखात भडकवाव्यात तशा त्याच्या तोंडावर दोन झापडी मारल्या. तशी त्यानं तोंडातली चपाती सोडली पण पळून न जाता लाडाने माझ्या पायात शिरला. मी त्याच्या पासुन दूर झालो. आपल्या मुलावर रागवावं तसं रागवलो.

" कळत नाही तुला ?........... मी येऊस्तोवर वाट पहाता येत नव्हती तुला ?........... तुझ्यासाठीच ठेवली होती ना ती चपाती ?......... का मी खाणार होतो ? असं टोपल्यातलं उचलून खाण शोभत का तुला ? आपल्या घरात कुणी असं करत का ? लहान नाहीस तू आता. कळायला हव्यात या गोष्टी तुला. असं वागलेलं मला नाही चालणार. "

तो मुकाट मान खाली घालुन पडेल चेहऱ्यानं सारं ऐकून घेत होता. त्यानं तोंडातून सोडलेली चपाती बाजूला पडली होती. पण तो तिच्याकडे पहातही नव्हता. मी त्याच्यापासून दूर झालो. पलंगावर बसलो. मला वाटलं होतं तिथे पडलेली चपाती उचलून तो बाहेर जाईल. पण चपाती तशीच टाकुन तो दाराबाहेर निघाला.

मीच त्याला म्हणालो, " थांब जरा. चाललास कुठे उपाशी पोटी ? "

तसं तो माघारी वळला. पण चपातीकडे न पहाता कुं S S S कुं करत, लोंडा घोळत माझ्याकडे आला. मीही त्याला जवळ घेतलं. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. म्हणालो, " वाईट वाटून घेऊ नकोस. पण असं वागणं चांगलं नाही. आणि बाकी कुणी कसंही वागलं तरी तू चुकून चालणार नाही. "

मग मी पलंगावरून उठलो. त्यानं अर्धवट खाल्लेली चपाती उचलून त्यासमोर धरली. त्यानं ती हळूवार पकडली आणि बाहेर जाऊन शांत चित्तानं खात बसला.

दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तेच. मी जेवायला बसलो. ढंमप्या आला. नेहमीप्रमाणे पुढचे पाय पसरून त्यावर तोंड ठेऊन बसला. नजर शांत. माझं जेवण झालं. त्याच्यासाठी ठेवलेली चपाती तिथेच बाजूला होती. ढंमप्या हालचाल न करता शांत बसून होता. तो काय करतोय हे मला पहायचं होतं. मी चपाती तशीच जागेवर पडून दिली. बाहेर जाऊन थोडी घाईतच ताट वाटी धुतली. ढंमप्या पुन्हा कालच्यासारखाच चपाती उचलून खायला सुरवात करेल असा माझा अंदाज होता.

आत येऊन पहातोय तर काय ढंमप्या जागचा हालला नव्हता आणि त्याच्यासाठी ठेवलेली चपाती मी ठेवल्या जागी तशीच पडून होती. मी त्याला जवळ घेतलं. लाडानं कुरवाळलं. तो मूक होता. पण त्याचे डोळे मात्र खूप काही बोलत होते. जणू , " नाही मी पुन्हा कधीच तसं करणार नाही. पण मला असं रागवत जाऊ नका. यापुढे कायम शहाण्या मुलासारखं वागेन. पण अंतर देऊ नका. " असंच सांगत होते. त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होतं आणि माझ्याही.

मी डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसल्या आणि ती त्याच्याच नावची असलेली चपाती त्याच्या समोर धरली.  ढंमप्यानं ती तोंडात धरली आणि मोठ्या आनंदाने घराबाहेर जाऊन चपाती खात बसला.

 ढंमप्याविषयी लिहायचं म्हटलं तर एखादी कादंबरी होईल. तेवढं कोण वाचत बसणार. पण त्याच्या विषयी आणखी काही किस्से तुम्हाला सांगायलाच हवेत पण ते पुढच्या भागात. ...................... क्रमशः


 

                                                                  

No comments:

Post a Comment