Tuesday 20 September 2016

मनं सैर भैर ( status of mind )

Marathi Poem , Love Poem

सैर भैर मन , sair bhair man


परवा एक पन्नाशीचा मित्र भेटला आणि म्हणाला , " अरे यार , मी प्रेमात पडलोय. खूप सैरभैर झालोय. काय करावं कळत नाही. इत्यादी ......इत्यादी. " माझ्या मनात लगेच चक्र फिरू लागली. विचारांची गर्दी झाली. पन्नाशीचा हा. कडेला आलेला संसार. सुसंस्कृत मुलं. काय गरज होती आपल्याला या वयात प्रेमात पडायची ? हे स्वतःला त्याच्या ठायी समजून माझंच माझ्याशी चाललेलं भांडण. आणि मग -


मनं सैर भैर ,
मनं ...मनं सैर भैर ,
माझे माझ्याशीच,
माझे माझ्याशीच वैर,

मनं सैर भैर ,
मनं ...मनं सैर भैर ,

या ओळींनी आकार घेतला. गुणगुणताना तिला संथ पाण्यासारखी एक धीर गंभीर सुरावट लाभली. पण ते तेवढ्यावरच थांबलं. प्रेमाच्या स्पर्शानं आकाराला आलेल्या या ओळी. पण त्या ओळींचा शेवट कसा झाला हे फार गंमतीशीर आहे.

एक स्त्री बीज आणि एक शुक्राणू यांचं मिलन झालं कि गर्भ धारणा होते. अथवा X - X गुणसूत्र एकत्र आली कि मुलगी होते आणि X - Y गुणसूत्रांचा संयोग झाला कि मुलगा जन्माला येतो हे सांगणं सोपं आहे. तसचं कविता कशी आकाराला येते यावर बोलणं सोपं आहे. पण डोळ्याच्या जागी डोळे आणि नाकाच्या जागी नाकच कसं येतं याची कल्पना करन सुद्धा अवघड आहे. अगदी तसंच कवितेतल्या त्या ओळी अथवा ते शब्द नेमके त्या त्या ठिकाणी कसे येतात हे सांगणं अवघड आहे.

कवितेच्या निर्मिती विषयी मी माझ्या काही लेखातून भाष्य केले आहे पण त्यामुळे ते वाचून कोणी कविता लिहावी इतकी कविता सोपी नाही.

आता याच वरच्या ओळींचंच उदाहरण घ्या ना. प्रेम या विषयातून आकाराला आलेल्या या ओळी. हि कविता वाचली तर एखाद्याला वाटेल कि मी वाईट मनस्थितीत असेन, मनानं पार मोडून पडलेलो असेन, माझा धीर खचलेला असेल , वैगेरे वैगेरे.

पण तसं काही नाही. गावी मस्त पाऊस पडलाय. ओढ्याला पूर आलाय. शेतं हिरवीगार आहेत. शेतात छोट्याश्या पण टुमदार घराचं काम सुरु आहे. शेळीपालन करायचं म्हणून शेड बांधतोय. महिन्याभरात शेडवर पन्नास एक शेळ्या येणार आहेत. शिक्षणानं आणि व्यवसायानं अभियंता असूनही आणि निम्मं अर्ध आयुष्य शहराच्या चाकोरीत काढलेला मी शेतावरच्या हिरवाई रमलो आहे. दुष्काळाच्या झळा लागल्या कि थोडाफार करपतो पण मृगाच्या थेंबात पुन्हा बहरतो.

मग अशी निराशावादी कविता का आली असेल ? मीच जेव्हा या प्रश्नाचं उत्तर शोधू लागतो तेव्हा लक्षात येतं मुखवड्यातल्या शब्दांची आणि त्या ओळींना लाभलेल्या सुरावटीची गरज होती.

आणि मी मुळात निराशावादी नाही. खूप संकटं आली. पण मी मोडून पडलो नाही. पावलो पावली फसवणारी अनेक माणसे भेटली पण मी कधी फसलो नाही आणि कधी कुणाला फसवले नाही. त्यामुळेच माझ्या निराशावादाने सुरवात होणाऱ्या बहुतेक कवितांचा शेवट हा आशावादी आहे. उदाहरणादाखल ' मोडून घरटे चिमणी गेली , ती सोबत नव्हती म्हणुनी , बैलं गोठ्यात कण्हतो , मी स्वप्नंच पेरत जातो अशा कितीतरी कवितांचा शेवट पहाता येईल.

आता हि कविता सुद्धा पहा - 

मनं सैर भैर ,
मनं ...मनं सैर भैर ,
माझे माझ्याशीच,
माझे माझ्याशीच वैर,
मनं सैर भैर ,
मनं ...मनं सैर भैर ,................II धृ II

तरावे मी कसे येथे ,
गळयापरी गाळ ,
बोटभर शिवताना ,
फाटले आभाळ ,
काय करावे रे कसे ,
धरावे मी धैर्य .........

मनं सैर भैर ,
मनं ...मनं सैर भैर ,................II १ II

रंक म्हणू माझा कि मी ,
राव म्हणू माझा ,
गावं म्हणू माझा कि मी ,
देव म्हणू माझा ,
कळेना हो काय योग्य ,
आणि काय गैर

मनं सैर भैर ,
मनं ...मनं सैर भैर ,................II २ II

नीती करावी कि मी  ,
धरावी अनीती ,
नभ घ्यावे कवेला कि ,
मुठीमधे माती ,
जखडलो संकटांनी ,
कसे व्हावे स्वैर,
मनं सैर भैर ,
मनं ...मनं सैर भैर ,................II ३ II

भोवताली साऱ्या माझ्या ,
अंधारल्या दिशा ,
तरी मनी अजूनही ,
प्रकाशाची आशा ,
लांघीन मी अजुनीही ,
जरी कोस तीर,
मनं सैर भैर ,
मनं ...मनं सैर भैर ,................II ४ II






                 
         

      

No comments:

Post a Comment