Wednesday, 30 March 2016

Indian cricket : धोनीच मॅन आॅफ द मॅच



खरं म्हणजे मी काही क्रिडा समिक्षक नाही. पण प्रत्येकाला असत तसं क्रिकेटच वेड मलाही आहे. माझ्या क्रिकेट वेडाविषयी नंतर कधीतरी लिहीन. पण आजकाल खेळत नसलो तरी खेळण्याची उर्मी संपलेली नाही. कधीतरी
सोसायटीत खेळणाऱ्या पोरांच्या हातातली बॅट घेतो आणि चार सहा बॉल खेळतोही. पण टिव्हीवर लागलेल्या भारताच्या मॅचेस अगदी समरसून पहातो.

टी ट्वेंटी वर्ल्डकप दरम्यान अनेकदा गावी असायचो. भारताच्या मॅचेस भारताच्या नॅशनल चॅनलने दाखवण्याच सौजन्य दाखविल्यामुळे मला आपल्या मॅचेस पाहता येत होत्या. पण लाईट आकडयाची ( मटक्याचा आकडा नव्हे. आकडयाची लाईट म्हणजे काय हे नागर भागातील वाचकांना कळणारच नाही असे नव्हे. पण ग्रामीण भागातील वाचकांना चांगलेच कळेल. ) ग्राउंड आर्थिंगची. 

माझा गावाकडचा टिव्हीही भारी. त्याला वीज जास्त झाली अथवा कमी झाली तरी अजीर्ण होतं. पटकन डोळे बंद करतो. मग दोन तीन मिनिटं बंदच. मग पुन्हा डोळे उघडतो. आपली पाच वर्षाची वॉरंटी सांभाळण्यासाठी कंपन्या अशा काही खुट्या मारून ठेवतात. 

अशा परिस्थितीतही भारत बांगला देश पूर्ण पाहिली. एकटाच होतो घरात. भारताची फलंदाजी पाहून पराभवाची आपण हरणार अशी मनाशी पक्की खुणगाठ बांधली होती. आणि बांगलादेशनं आमच्या पराभवावर शिक्कामोर्तबही करत आणलं होतं. पण पराभव झाला तरी दुखं करायचं नाही पण शेवटपर्यंत हार मानायची नाही. हे धोनीच तत्व. " प्रतिस्पर्धी संघाला आम्ही कमी लेखत नाही पण आम्ही जिंकण्यासाठी खेळणार आहोत. " असं प्रत्येक संघाचा कर्णधार म्हणत असतो. पण धोनी कायम जिंकण्यासाठीच खेळत असतो. 

भारत - बांगलादेश या सामन्याचा मानकरी आश्विन ठरला असला तरी माझ्या मते धोनीच त्या सामन्याचा खरा मानकरी होता. कारण बांगलादेशची तिसरी विकेट हा सामन्याचा पहिला टर्निंग पॉईंट होता. शब्बीर रहेमान ज्या रितीने स्टंप आउट झाला त्यात त्याची तिळमात्र चुक नव्हती. रैनाने टाकलेला बॉल सुद्धा साधा सरळ होता. आणि तरीही धोनीनं रहेमानला आउट केलं होतं. 

तिथुन पुढंही बांगलादेशनं मॅच क्षणभरही भारताच्या बाजूला झुकू दिली नाही. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या काही षटकात चांगली गोलंदाजी केली. तरीही बांगलादेशनं आपल्याला विजयाचा गंध येऊ दिला नाही. 

६ बॉल ११ रन आणि हातात असणाऱ्या ४ विकेट हे बांगलादेशच्या विजयाचं समीकरण तर भारताला पराभवाच्या खाईत ढकलणार होतंच पण वर्ल्डकपमधून हद्दपार करणारही होतं. 

पण त्या शेवटच्या सहा चेंडूत जे घडलं ते विश्वास न बसावं इतकं अनाकलनीय होतं. शेवटचं षटक टाकणार होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसलेला हार्दिक पांड्या. त्याच्या पहिल्या चेंडूवर केवळ एक धाव निघाली. जरा बरं वाटलं. विजयाच समीकरण झालं ५ चेंडू १० धावा. दुसऱ्या चेंडूवर चौकार. छातीत धडकी भरली. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा चौकार. डोळ्यासमोर अंधार पसरला. बांगलादेशच्या विजयाच समीकरण ३ चेंडू 2 धावा इतकं सोपं झालं. पण मला टिव्ही बंद करावा असं वाटलं नाही. आपलं मरण आपल्याच डोळ्यांनी पाहण्याचं मी ठरवलं आणि काय ............!!!!!

आशिष नेहरा धोनी दोघेही पांड्या सोबत सल्लामसलत करत होते ........!!!!!

चौथ्या चेंडूवर विकेट......... !!!!! 

पाचव्या चेंडूवर विकेट ...........!!!!! 

विजयाच समीकरण ............ १ चेंडू 2 धावा !!!!! विजय अर्थातच बांगलादेशचा गृहीत धरलेला भारताचा नव्हे.   

मनात भावनांचा कल्लोळ उडालेला.

धोनीनं कुठल्या नशेत उजव्या हातातला ग्लोव्हज काढून ठेवलेला कुणास ठाऊक.

बांगलादेशनंही एक धाव घ्यायचीच आणि मॅच सुपर ओव्हर मध्ये न्यायचीच हा निश्चय केलेला. 

पांड्याचा शेवटचा चेंडू . आणि काय झाला ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. चेंडू बॅटला लागला नाही तरी फलंदाज बायची धाव घ्यायला धावले. आणि आधीच उजव्या हातातला ग्लोव्हज काढून ठेवलेल्या धोनीनं शेवटच्या बॉलवर बांगलादेशच्या फलंदाजाला धावबाद केलं. 

जावेद मियाँदादनं भारताच्या विरोधातली शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून जिंकलेली मॅच कोणी कधीच विसरणार नाही. 

पण भारताचा हा बांगलादेश व्रील्विजय हा सर्वकालीन सर्वश्रेष्ठ विजय होय.
असं असुनही धोनी मॅन ऑफ द मॅच न ठरता अश्विन कसा ठरतो कुणास ठाऊक !!!!!

पण मॅन ऑफ द मॅच कोण ठरलं हा प्रश्न महत्वाचा नाहीच. भारताचा विजय महत्वाचा.       

    

                     

2 comments:

  1. Namskar ShendheSaheb,

    Khup divas zale tumche kahi likhan nahi.

    regards.
    Bapu.

    ReplyDelete
    Replies
    1. टेंगळेजी, आपल्यासारखे अनेकजण माझ्या नव्या लिखानाची वाट पहात असतात. आणि आपल्या लिखानाची कुणीतरी वाट पहातंय याहून आनंदाची बाब लेखकासाठी अन्य दुसरी नाही. प्रत्यक्ष विठूच याचक होऊन आपल्या दरी उभा याचे समाधान अवर्णनीय.

      माफ करा पण गेली तीन चार आठवडे कांद्याची काढणी ते वखार करून त्याची साठवणी या कामात पूर्ण व्यस्त होतो. मध्ये एक दोनदा एक दोन दिवसासाठी पुण्यात आलो होतो पण लिहायला सवड नव्हती. आजही आलोय ते आजच्या पुरता. संध्याकाळी पुन्हा गावी जाणार आहे. गावी गेल्यानंतर शेतावर पिसी , नेट या सुविधा माझ्याकडे सध्यातरी उपलब्ध नसतात. त्यामुळे तिकडे असल्यानंतर रिकामा वेळ मिळाला तरी लिहिणे जमत नाही. असो. लिहीन लवकरच.

      Delete