Friday, 1 August 2014

Animal Sex : प्राण्यांची कामभावना

 भादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर दगड भिरकावतात. पण सर्वसाधारणपणे आपण ते दृश्य नजरे आड करून वाट धरतो.


पण मूलतः कविता हा माझा प्रांत सोडून मी एकदम या विषयाकडे का वळलो ? असं एकदम या विषयी लिहिण्याला तसंच कारणही तसंच घडलं. हा विषय अनेकजण खूप चवीने वाचतील. पण वाचकांची कामवासना चाळवण हा या लेखाचा हेतू नाही.


आपण मनुष्य प्राण्याला कितीही श्रेष्ट……..अगदी ईश्वराचा अंश समाजात असलो तरी तो किती स्वार्थी आणि मतलबी आहे हेच या लेखातून दिसून येईल.

कायद्यानं बैल गाड्यांच्या शर्यतीवर बंदी घातली तेव्हा मी माझ्या वर्डप्रेस वरील ' रे घना ' या ब्लॉगवर ‘ बैलगाडा शर्यत ‘ हा लेख लिहिला होता. अशा रितीनं कायद्यानं ग्रामीण जीवनात कुठलीच ढवळाढवळ करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे.

मी मुळात ग्रामीण भागातला. जनावरांची लैगिक जवळीक मी फार जवळून पाहिलेला. त्यांची कामभावना जागी होते तेव्हा त्यांना वेळेचं आणि ठिकाणाचं फारसं भान बाळगावस वाटत नाही. पण तरी ते त्यातला त्यात एकोपा किंवा आडोसा शोधण्याचा प्रयत्न करतात. गाय-बैल, शेळ्या-मेंढ्या, म्हैस-रेडा यांच्यातली कामभावना मी फार जवळून पहिली आहे. ‘

गाईला बैल दाखवायचा ‘  म्हणजे काय करायचं ?  हे मला माहित आहे. गाईला बैल दाखवताना गाईला एका बैलगाडीला किंवा एखाद्या झाडाला बांधतात. कामवासनेने मत्त झालेला बैल गाईच्या जवळ सोडतात. बैल त्याच्या परीने कामभावनेत रंगून जातो. पण गाईला हा असा बळजबरीचा शृंगार नको असतो. ती हा प्रकार नाकारू पहात असते. पण दोरखंडाने जखडून टाकल्यामुळे ती हतबल झालेली असते. त्या क्षणी गाईला तो शृंगार नको असतो पण शेतकऱ्याच्या दृष्टीने तिची गर्भधारणा होणे गरजेचे असते. कारण गाय व्याल्यानंतर त्याच्या घरात दुधाची गंगा वाहणार असते.

अशा रीतीने गाईला बैल, म्हशीला रेडा आणि शेळीला बोकड दाखवताना मी अनेकदा पाहिलं आहे. कुत्र्याची कामक्रीडा जशी हिणकस वाटते तशी या प्राण्यांची कामक्रीडा हिणकस वाटत नाही.

पण मला या कामक्रीडेविषयी लिहायचं नाही. मला लिहायचं ते माणसाच्या स्वार्थी वृत्ती विषयी.

बैलाचे आंड बडवणे म्हणजे काय ? हे मला फार चांगलं माहित आहे. असं केल्यानं त्याची कामभावना लोप पावते. त्याच्यातली सगळी रग इतर कामात उतरते. आणि तो ती कामे अधिक जोमानं करू शकतो. पण मी लहान असताना हे सारं एवढ्या पुरतंच म्हणजे जे प्राणी मेहनतीच्या कामाला वापरावयाचे असतात त्यांच्या कामभावनेचं खच्चीकरण करण्यापुरतंच सीमीत होतं. पण आता ग्रामीण भागातल्या जनतेने पाळीव प्राण्यांच्या कामभावनेचा उपयोग अर्थार्जनासाठी सुरु केलाय.

आमच्या वाड्यापासून कासरा दोन कासरा अंतरावर माझी चुलत बहिण रहाते. तिच्याकडे शेळ्यांची चांगलीच दावण आहे. त्यात दोन चांगले तरणेबांड बोकडही आहेत. या बोकडांना कामभावनेनं मदमस्त होऊन शेळ्यांसोबत झटी घेताना मी अनेकदा पाहिलं आहे.

पण परवा शेतात निघालो तेव्हा पाहिलं. तिच्या दारात एक माळ्याची म्हातारी आली होती. तिच्यासोबत एक शेळी होती. माझ्या लक्षात आलं कि तिनं ती शेळी दाखवायला आणलीय.

” रखमाबाई, शेळी दाखवायचीय.”

” मंग बाध कि ती रिकाम्या खुटीला.”

” न्हाय पर किती घेशील ? “

” काय दुनियेच्या रीतीपासून  येगळं घीईन का ? “

” न्हाय, तरी बोलून असलेलं बरं न्हाय का माझी बाय!”

” काय लै न्हाय घेत मी. शंभराची नोट घेती.”

” का ग ! पन्नास रुपयात न्हाही जमायचं का ! “

” न्हाय बाई. माझा बोकड कसला हाय पघीतला का. नुस्ता माजावर आल्याला हाई. वाळल्या काडीला तोंड लावत न्हायी. माझ्याकडं ना शेती ना वाडी. माळ वाळल्यावर मी कुठून आणायची त्याच्यासाठी हिरवी खादी. पण न्हायी. मी त्याच्यासाठी रोज पाच रुपयाचा घास घेती. म्हणून दिसतोय बोकड तसा तजेलदार. उगंच न्हाई  लोक पर घरागावातून आणि पिपळगावातून घेवून येतेत शेळ्या दाखवायला. “

” घे बाई शंभर तर शंभर. तुझ्या दावणीचं जनावर हाई. मला काय न्हाय म्हणता इन का ? “

तो पर्यंत बोकड आपला शेळीकडे आसुसलेल्या नजरेने पहात होता. कामभावनेने उद्यपीत होऊन नरड्यातून कसले कसले आवाज काढत होता. बोकडाचा रंग पाहून शेळी म्हातारीच्या हातातल्या दाव्याला हिसके मारत होती.

तशातून तिनं कनवटीला खोचलेली नोट काढली. बहिणीच्या हातावर ठेवली.

बहिणीने नोट मागून पुढून निरखून पहिली आणि मग त्या म्हातारीकडे वळून म्हणाली, ” नाणे, बंध शेळी त्या मोकळ्या खुटीला.”

माळ्याच्या म्हातारीने शेळी खुंटीला बांधली. बहिनेने शंभराची नोट कनवटीला खोचली आणि मग तिनं बोकड मोकळा सोडला.

दोघी लगेच जवळच्या झाडाच्या सावलीत बसल्या. हळू हळू त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.  त्यांच्या गप्पांच्या ओघात मला हेही कळून चुकलं कि बोकड , बैल, रेडा, जर्शिसाठी टोणगा अशा वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळ आकारणी केली जाते. त्या दोघी गप्पात बुडून गेल्या होत्या. बोकड रंगात आला होता. शेळी दोरीला हिसके मारत होती.
मी मात्र माणसातल्या व्यवहाराच हे रूप पाहून खजील झालो.

6 comments:

  1. लेख छान झालाय.

    ReplyDelete
    Replies
    1. अनिल प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. वाचकांना लेखन आवडणं हेच सर्वात मोठं समाधान.

      Delete
  2. mansacha Swarthipna tyala winashakde nenar aahe.

    ReplyDelete
    Replies
    1. माणूस अत्यंत हुशार प्राणी आहे. तो समोर येणाऱ्या विनाशातून निश्चित मार्ग काढेल. पण आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही भावना असतात हे माणसानं लक्षात घ्यावं. एवढीच इच्छा.

      Delete
  3. लेखाची सुरूवात तर भारी केली आहे तुम्ही पण शेवट काय झाला त्याचा विचार करतोय. शेवट समजला नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी, अभिप्रायाबद्दल आभार. शेळी आणि बोकडाचे मिलन झाले हा शेवट. पण मला यातुन माणसाच्या मानसिकतेचे दर्शन घडवायचे आहे.

      Delete