आपल्याकडे खूप पैसे असावेत असं प्रत्येकाला वाटतं. अगदी मलाही. पण कशासाठी ? बऱ्याचदा आपलं आयुष्य सुखकारक करण्यासाठी. मलाही खुप पैसा हवा आहे. पण तो सुखासाठी नव्हे. समाजासाठी काहीतरी करता यायला हवं म्हणून. दहा वर्षापूर्वी आठ दहा लाखात मिळणाऱ्या वन बीएचके घराची किंमत आता २५ - ३०लाख झालीय. खरंच परवडतं असं घर घेणं ? इथं आपण २५-३० लाखाचं घर परवडतं कि नाही असा विचार करतो आणि परवा मी एका गृहस्थांच्या घरात अत्यंत देखणं बाथरूम पाहिलं. काय नव्हतं त्यात. अंघोळीसाठी जेजे हवं ते सारं होतंच, स्टिम बाथची सोय होती. गिझर तर होताच होता. पण टिव्ही होता, इंटरनेट होतं. सारं काही स्वयंचलित. मला फार अप्रूप वाटलं. न राहून त्या गृहस्थांना ' बाथरुमला किती खर्च आला ? ' असं विचारलं.
' फार नाही पंचवीस लाख.' पाच पंचवीस रुपयांचा भाजीपाला आणावा इतक्या सहजतेनं त्यांनी सांगितलं.
मी सुन्न होऊन तिथून बाहेर पडलो. मनात विचार आला. सालं आपण १५ वर्षापूर्वी चार लाखाचा फ्ल्याट कसाबसा कर्ज काढून घेतला. आज तो छोटा वाटतोय पण ४० लाख रुपयांचा मोठा फ्ल्याट घेणं आज आपल्या आवाक्याबाहेरच आहे. आणि इथं २५ लाखांचं नुसतं बाथरूम !
वाटलं काही नाही आपणही खुप पैसा कमवायचा. असंच बाथरूम बांधायचं. पण हा विचार क्षणभरच टिकला.
वाटलं काय करायचंय २५ लाखांचं बाथरूम ? बाथरूम २५ लाखांचं असलं काय आणि ५० लाखांचं असलं काय शेवटची आंघोळ कोणीच घरात घालत नाही.
खरंच माणसाला संपत्तीची एवढी का हाव असते ? कितीही कमावलं तरी कमरेचा करगोटाही सोबत नेता येत नाही हे प्रत्येकाला माहित असतं तरीही माणुस का या मृगजळाच्या मागे लागतो ? बाबा महाराज सातारकरांसारखा प्रवचनकार एका प्रवचनाचे ५० हजार का घेतो ? शरिराला कितीही सुखात ठेवलं अगदी पंचवीस लाखाच्या स्नान गृहात अंघोळ केली तरी त्या शरीरावर मृत्यूची छाया पडल्यावाचून का राहणार आहे. जगण्यासाठी पैसा हवाच हे मान्य. घरात फ्रिज हवा, टिव्ही हवा, सहकुटुंब प्रवास करायला एखादी चारचाकी हवी हेही ठिकच. पण २५ लाखांचं बाथरूम ?
राजाचं राज्य रहात नाही, सावकाराची सावकारकी टिकत नाही, संस्थांनिकांच संस्थान उरत नाही. उरते ती फक्त ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा. उरतात ते केवळ समर्थांचे मनाचे श्लोक. हे सारं शाश्वत. पण हे जे शाश्वत ते अनेकांच्या हाती लागत नाही. हे हाती लागत नाही म्हणून कुणालाही दुखं वाटत नाही.
पण अशाश्वत पैसा हाती लागावा म्हणून आपण जिवाचं रान करतो. असं करू नका मित्रांनो. गरजे इतका पैसा नक्कीच येत असतो कारण ज्यानं चोच दिली आहे तो दाणाही देत असतो.
त्यामुळेच कधी कुणाचं २५ लाखांचं बाथरूम पाहुन कसा का असेना पण पैसा मिळवायचाच असा अट्टहास करू नका. कारण प्रत्येकाची शेवटची अंघोळ घराबाहेरच होत असते हे लक्षात ठेवा.
सर तुम्ही खुपच छान लिहिता. गरज आहे ते हे सारं समाजाच्या गळी उतरण्याची.
ReplyDeleteआपण आपलं काम करावं प्रथमेशजी. तारूण न्यायला परमेश्वर आहेच.
ReplyDeletemstach sir.
ReplyDeleteचिन्मय प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
ReplyDeleteफडतूस विचार.शेंडगे साहेब,तुमच्या सारख्याचे विचार म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट.तुमच्या सारख्याचे विचार हे मराठी माणसांच्या आर्थिक अधोगतीचे लक्षण आहे.स्वतःला संपत्ती निर्माण करायची नसेल तर दुसऱ्याला ती संपत्ती निर्माण करण्यापासून परावृत्त करण्यासारखे विचार मांडू नयेत.२५ लाखाची संपत्ती निर्माण करा,२५ लाखाचं बाथरूम बांधायचं नसेल तर गरीबांसाठी २५ लाखाचं रूग्णालय बांधा,गरीबांची सेवा करा,आणि त्या साठीच संपत्ती निर्माण करा.अत्यंत नकारात्मक विचार.अंगात धमक असते तो योगी वृत्तीने संपत्ती निर्माण करतो आणि ती संपत्ती भोग न घेता समाजासाठी उपयोगात आणतो.
ReplyDeleteबबनजी अत्यंत परखड प्रतिक्रिया दिलीत. राग मुळीच आला नाही. पण आपण लेख पूर्णतः समजावून घेतला नाही याचं वाईट वाटलं. मी माझ्या लेखात सुरवातीलाच ' आपल्याकडे खूप पैसे असावेत असं प्रत्येकाला वाटतं. अगदी मलाही. पण कशासाठी ? बऱ्याचदा आपलं आयुष्य सुखकारक करण्यासाठी. मलाही खुप पैसा हवा आहे. पण तो सुखासाठी नव्हे. समाजासाठी काहीतरी करता यायला हवं म्हणून.' असं म्हटलं आहे.
ReplyDeleteमाझ्या पैसा कमाविण्याला विरोध नाही. तर पैसा कमावून तो चैनीत उडविण्याला विरोध आहे. मी फार मोठा धनदांडगा नाही पण माझ्याकडे जो थोडा फार पैसा आहे त्यातूनच मी पालवी हि संस्था सुरु करून गेली अनेक वर्ष वृक्षा रोपनाचं काम करतो आहे. आजवर विविध ठिकाणी १० हजाराहून अधिक वृक्ष लावले आहेत. आणि सर्वात पहिलं वृक्षा रोपण केलं ते स्मशानभूमीत २०० झाडं लावून. तेव्हा माझ्या मित्रांनी सांगितलं ' अरे तू तुझ्या सामाजिक कामाची सुरवात स्मशानातून करतो आहे हे योग्य नाही. ' त्यावर मी उत्तर दिलं ते एवढंच ' शेवटी मला जिथं जायचं आहे तिथूनच मी माझ्या कामाला सुरवात करतो आहे याहून अधिक चांगलं काहीच असू शकत नाही.
बबनजी, एक झाड लावायला आणि ते वाढीस लागेल याची काळजी घेताना कमीत कमी ५० रुपये खर्च येतो. पण या कामासाठी कोणाकडेही एक छदाम मागितला नाही.मी आणि माझे पाचसहा मित्रं असं आम्ही एकत्रित काम केलं.
बबनजी, मी माझ्या लेखातली आणखी काही विधानं इथं देतोय.
उदा. ' बाबा महाराज सातारकरांसारखा प्रवचनकार एका प्रवचनाचे ५० हजार का घेतो ?'
' जगण्यासाठी पैसा हवाच हे मान्य. घरात फ्रिज हवा, टिव्ही हवा, सहकुटुंब प्रवास करायला एखादी चारचाकी हवी हेही ठिकच. पण २५ लाखांचं बाथरूम ?'
' त्यामुळेच कधी कुणाचं २५ लाखांचं बाथरूम पाहुन कसा का असेना पण पैसा मिळवायचाच असा अट्टहास करू नका. '
ही विधानं लक्षात घेतली तर कदाचित तुमचा गैरसमज झाला नसता. एका प्रश्नाचं उत्तर दयाल बबनजी, शरद पवारांसारखा माणुस समाजसेवेवर किती खर्च करतो हो ?
शिवाय , ' सालं आपण १५ वर्षापूर्वी चार लाखाचा फ्ल्याट कसाबसा कर्ज काढून घेतला. आज तो छोटा वाटतोय पण ४० लाख रुपयांचा मोठा फ्ल्याट घेणं आज आपल्या आवाक्याबाहेरच आहे. आणि इथं २५ लाखांचं नुसतं बाथरूम !' या माझ्या लेखातील विधानामुळे आपण ' तुमच्या सारख्याचे विचार म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट' असे विधान केलेले दिसते. परंतु मी धनदांडगा नसलो तरी माझ्या पदरी २० एकर बागायती शेती आहे. पुण्यात दोन कोटींचा बंगला आहे. दोन फ्ल्याट आहेत. एक दुकानाचा गाळा आहे, २ गुंठ्यांचा एक रिकामा प्लॉट आहे. आमच्या बंधूंनी स्वतः कर्ज काढून सुरु केलेली मराठी माध्यमाची शाळा आज आम्ही चालवतो आहोत. शाळेत ११०० मुलं शिकताहेत. बहीण पुण्यात नगरसेविका आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल बबनजी किंवा मी सांगतोय यावर तुमचा विश्वासही बसणार नाही , पण हि निवडणूकीत विरोधी उमेदवारांनी दिड दिड कोटी खर्च केलेले असताना आम्ही केवळ ५ लाख रुपये खर्च करून विजयी झालो आहोत. हे सर जे कमावलंय ते पोटाला चिमटा घेऊन इतरांचं शोषण करून नव्हे. असो माझे इतरही लेख पहा आणि आपल्या योग्य प्रतिक्रिया देत चला. ' शंभर सावरकर हवेत ' हा लेख तर आवर्जून वाचा.
आपला अहंभाव जपणे ही प्रत्येकाची गरज (तुमच्या-माझ्यासकट) असते. आपण उल्लेख केलेल्या गृहस्थाने इतराना हिणविण्याचा सर्वमान्य मार्ग सोडून पैसा हे साधन स्वीकारले इतकेच.
ReplyDeleteसर तुमचा लेख जितका समर्पक तितकंच तुम्ही बबनला दिलेलं उत्तरही.
ReplyDeleteमनोहरजी , आपला मुद्दा अत्यंत योग्य आहे. पण मानवाचा जन्म हा स्वतःच्या कल्याणासाठी नसून इतरांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळेच २५ लाखांचं बाथरूम असणारा माणूस काळाच्या ओघात पुसला जातो आणि शिवाजी महाराजांचा आजही जयजयकार होतो.
ReplyDeleteअनिलजी मनापासून आभार.
ReplyDelete