Saturday, 25 July 2020

आम्ही साहित्यिक आम्ही कलावंत

 

मित्रहो,
नमस्कार.

मी विजय शेंडगे. आजवर

शिववडा ते शिवथाळी व्हाया शिवसेना : शिवभक्तांना कसे खपते?


परवा माझ्याकडे एक व्हिडीओ आला होता. कोणा स्टेज शो करणाऱ्या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न केला होता. काही शिववादी तरुणांनी त्याचा शोध घेऊन त्याला मार दिला. व्हिडीओ बनवून व्हायरल केला. त्या व्हिडिओची टॅगलाईन होती, 'नडला तर तोडला.' यातून समाजात काय संदेश पोहचला? केवळ मराठा समाजाला शिवाजी महाराजांच्या विषयी आदर आहे का? छत्रपती शिवाजी महाराज हि कोणाची खाजगी मालमत्ता नाही. परंतु तुम्ही छत्रपतींचा जयजयकार केला तर तुम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. नाही तर नाही. असे वातावरण निर्माण केले गेले आहे.

व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. काय चुकलं त्यांचं? ते विधानसभेचं सभागृह नाही. राज्यसभेचं सभागृह आहे. तिथे आज तुम्ही शिवरायांचा जयघोष कराल. उद्या दुसरा महाराणा प्रतापांचा जयघोष करेल, कोणी बसवेश्वरांचा जयघोष करेल कसं चालेल हे? संजय राऊत यांनी उदयनराजेंना छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. त्यांचं कोणी काय वाकडं केलं? का नाही कोणी संजय राऊतांची कॉलर पकडली? का नाही त्यांना टोले टाकले? का नाही त्यांची गाडी अडवली? सामनामध्ये मराठा समाज काम करत नाही का? का नाही त्यांनी काम बंद आंदोलन केलं? साहेबांच्या बरोबर आहेत ना मग सगळं. माफ असे आहे का? 

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, त्यांना आदर्श मानून शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेतलं 'शिव' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांमधलंच 'शिव' आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच मराठी तरुण मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल झाला. शिवाजीतला 'शिव' आणि हिंदुत्वाच्या भगव्याने मराठी तरुणांना भुरळ घातली. बघता बघता शिवसेना फोफावली. ८० % समाजकारण आणि २० % राजकारण म्हणता म्हणता शिवसेनेनं समाजकारण फेकून दिले, हिंदुत्वाला मूठमाती दिली आणि फक्त राजकारण करण्याचा निर्णय घेतला.

मला आठवतं आहे अगदी सुरुवातीला शिवसेनेनं झुणका भाकर केंद्रे सुरु केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु या झुणकाभाकर केंद्रांच्या नावात,  शिव नव्हते. परंतु 'शिव' वडा म्हणत शिवसेनेने वडापाव जनतेसमोर आणला आहे, जेवणाच्या थाळीला 'शिव' थाळी म्हटलं हे कितपत योग्य आहे. यात छत्रपतींच्या प्रतिमेचा, कर्तृत्वाचा अपमान झाला आहे असं कोणालाही वाटले नाही? 'शिवसेना' हे नाव नक्कीच आक्षेपार्ह्य  नाही. परंतु शिववाडा आणि शिवथाळी? हे माझ्या तरी बुद्धीला पटलं नाही.

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास पुरुष आहेत. ते राष्ट्रीय पुरुष आहेत. इंदिरा वडा, राजीव थाळी असे म्हणत त्यांच्या नावाचा कोणी बाजार मांडला नाही. मग वड्यात आणि थाळीत 'शिव' कसं चालू शकेल? वड्यात जोशी चालतील, रोहित चालेल. पण वड्यात 'शिव'? उद्या एखाद्याने महाराजांच्या नावाने वाईन शॉप सुरु  केलं तर चालेल का?

शिवसेना जनतेच्या मुखी रहावी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वडापावच्या गाड्या सुरु करता याव्यात म्हणून शिववडा सुरु केला. 'शिववडा' हे नाव वडापावच्या गाड्यांवर पाहिलं कि कारवाई करण्याची कोणीही हिंमत होऊ नये म्हणून शिव वडा. परंतु वड्यात आणि जेवणाच्या थाळीत छत्रपतींचं नाव आणणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाला काळिमा फासण्यासारखं नाही का? इतरांचं जाऊ द्या हो पण छत्रपतींना दैवत मानतात त्यांना शिव वडा आणि शिव थाळी कशी चालते? 

Thursday, 23 July 2020

सलोनी, यु आर ग्रेट?

image by vijay shendge

सलोनी, आपलं माणूस मरणाच्या दाढेतून परत येतं तेव्हा आनंद होतोच. अशा वेळी त्याला डोळे भरून पहावं. त्याच्यावर डोळ्यातल्या पाण्याचा अभिषेक करावा. त्याला तांब्याभर पाणी द्यावं. त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवून माया करावी. त्याला गच्च मिठीत घ्यावं अशी पद्धत होती. आजवर कॅन्सरचे पेशंट बरे होऊन घरी आले तेव्हा कोणी फुलं उधळल्याचं ऐकिवात नाही. पण अलीकडे हि फुलं उधळण्याची रित आली आहे. सोम्या उधळतो म्हणून गोम्या उधळतो. यमी नाचते म्हणून पमी नाचते. 

पण सलोनी खरंच ग्रेट नाचली आहेस तू. टाईमिंग सुद्धा काय मस्त साधलस! छानच वाटलं पाहून. तुझा आदर्श घेऊन आता रस्तोरस्ती असे नाचे आणि नाच्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. सलोनी मला सांग कसं प्लॅनिंग केलं होतं? म्युझिक कोणतं निवडायचं. स्टाईल कोणती ठेवायची. सगळं आधीच ठरवलं होतं का? आई बाबांची परवानगी घेतली होती का? आणि भाऊ. तो तर सामील होता असं दिसत होतं. बँक स्टेजला आवाज येत होता त्याचा. पण छान वाटलं. समाजाला दिशा दिलीस तू. आणि तुझं कर्तृत्व किती थोर होतं याची तुला कल्पना आली असेलच! अगं चक्क मीडियाने दखल घेतली तुझी. मीडियाचं तसं फार काही विशेष वाटतं नाही. ते नेहमी सवंग गोष्टीच दाखवत असतात. ( सवंग म्हणालो का मी.... सॉरी.... सॉरी.)

हा! तर, मीडियाने तर तुझी दखल घेतलीच. पण यशोमती ठाकूर या मंत्रीणबाईंनी सुद्धा तुला फोन केला. काय भारी वाटलं असेल ना तुला. आमचे नेतेसुद्धा किती जनताभिमुख? हेही ठळकने दिसून आलं. आणि सगळ्याचं टायमिंग किती ग्रेट. तू नाचतेस काय, तुझा व्हिडीओ त्यांच्यापर्यंत पोहचतो काय, त्या तुझा फोन नंबर हुडकून काढतात काय. तुला फोन काय करतात. आणि लगेच हि बातमी मीडियापर्यंत पोहचते काय. काय वेळ साधली सगळ्यांनी. ग्रेट. मीडियाने तुमचा फोन टॅप केला होता कि तुमच्यापैकी कोणी मीडियाला कळवलं होतं? असो. काही असो. पण तुमच्या कुटुंबाने, यशोमती ठाकुरांनी, मीडियाने समाजासमोर एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे.

घरातलं माणूस बरं होऊन आल्यानंतर एवढं. तर तुझं लग्न असेल तेव्हा काय होईल. मला वाटतं तेव्हाही तू अशीच नाचशील. उपस्थित व्हराडी तुझ्यावरून अक्षता ओवाळून टाकण्याऐवजी नोटा उधळतील. मीडिया पिपाणी आणि ताशा लाजवेल. आणि तुला मुलं होतील तेव्हा.... तेव्हा तर काय एखादी मंत्रीणबाई बाळाची बाळुती धुवायला महिनाभर तुझ्या घरी मुक्कामच ठोकेल बहुदा.     

हा लेख व्हायरल होऊन त्या सलोनीपर्यंत पोहचला तर मला मनापासूनआनंद वाटेल. पण त्यापेक्षा समाजाने यातून काही बोध घेतला तर अधिक आनंद होईल.

भाजप राजकीय किड दूर करते आहे. परंतु सामाजिक किड कोणी तरी दूर करायला हवी ना. त्यासाठी मला असे लेख लिहिण्याची गरज वाटते. कुणाला मी कर्मठ वाटेल. परंतु संस्काराची जोपासना करणं हा कर्मठपणा असेल तर, होय आहे मी कर्मठ. 

Wednesday, 22 July 2020

जनहित केवळ तुमच्या मुखात

cartoon edited by vijay shendge

साहेब, शिवरायांचे नाव घेऊन, जनसेवेच्या हेतूने बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांनी सत्तेसाठी कधी अट्टाहास केला नाही. परंतु आपण मात्र बाळासाहेबांची चितेची राख खाली बसू दिली नाही.