Tuesday 24 March 2020

येस मोदी... ओन्ली यु कॅन



अखेरीस संजय राऊत पचकलाच. काय तर म्हणे, "मोदींनी हा जनता कर्फ्यूचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता." असे भुसनळे आमच्या देशात फार आहेत. ते करत काहीच नाही फक्त भुंकत असतात. 

मोदींनी पुन्हा एकदा जादू केली. एका माणसाच्या शब्दावर देशाने स्वतःला घरात बंद करून घेतलं. माझ्या सोसायटीतून दिवसभरात एकही माणूस बाहेर पडला नाही. आणि कोणी आत सुद्धा आलं नाही. मी दुपारी एक वाजता सोसायटीच्या गच्चीतून सिंहावलोकन केलं. दहा मिनिट रस्ता न्याहळत होतो. तर दोन चार मोटारसायकल, एक कार तेवढी रस्त्यावरून जाताना दिसली. बाकी रस्ता सुनसान.

आम्हाला आरती सुरु झाली कि टाळ्या वाजवायच्या एवढेच माहित. त्यामुळे पाच वाजता टाळ्यांचा कडकडाट होईल, चमचा घेऊन ताट वाजवले जाईल, घराघरात घंटानाद होईल, कुठून तरी शंखनाद ऐकू येईल अशी शक्यता वाटत नव्हती. मी घड्याळाच्या काट्याकडे नजर लावून बसलो होतो. पाच वाजायला दोनचार मिनिटे बाकी असावीत. आणि सकाळ पासून सोसायटीत पसरलेली शांतता भंग पावली. घराघरातून टाळ्यांचे कडकडाट ऐकू येऊ लागले. घंटानाद होऊ लागले, चमचा ताटाचा आवाज होऊ लागला. चार सहा घरातून शंखनाद झाले.

इंदिरा गांधी यांनी देशभर लागू केली आणीबाणी अनेकांना आठवत असेल. त्यानिमित्ताने झालेली धरपकड अनेकांना स्मरत असेल. कायदा हातात घेऊन आणीबाणी लागू करणे फार सोपे होते. परंतु जनतेला विश्वासात घेऊन कायद्याचा कोणताही बडगा न दाखवता देश बंद ठेवण्याची किमया अन्य कोणाला साध्य होईल असे मला नाही वाटत. कारण जनतेने असा उस्फुर्त प्रतिसाद द्यायला जनतेच्या मनात त्या नेत्याविषयी आदर असावा लागतो. ज्याचे ज्याचे चमचे आपापल्या नेत्याचं शेपूट धरत असतात. त्यात नवे ते काय? पण या जनता कर्फ्युमध्ये सहभागी प्रत्येकाला मोदींविषयी नितांत आदर आहे हे आजच्या देशाच्या कृतीतून सिद्ध झाले आहे. तरीही यातल्या कोणालाही १५ लाख मिळालेले नाहीत. कारण पंधरा लाख देण्याचे अमिष मोदींनी दाखविले नव्हते आणि १५ लाख मिळतील म्हणून मोदींना कोणी निवडून दिले नव्हते. मोदी म्हणजे आशावाद. आणि या देशातील जनता तो आशावाद कायम तेवता ठेवतील.

लोकसभा निवडणुकांच्या आधी सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज भासली. मोदींनी ( वास्तवात आपल्या वायुदलाने. पण वायुदल अथवा कोणतंही सैन्य दिशा दिल्याशिवाय निर्णय नाही घेऊ शकत.) ते करून दाखवलं. पण विरोधकांनी पुरावे मागितले. निवडणुका जवळ आल्या म्हणून मुद्दाम ड्रामा केला असे आरोप केले. नशीब कोरोना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त साधून आला नाही. नाहीतर, लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत होता म्हणून मोदींनी मुद्दाम हे कोरोनाचे भूत उभे केले आहे असाही आरोप विरोधकांनी केला असता.

कोरोना जाईलच. परंतु देश अखंड आहे. आणि देशाची मोदींवर श्रद्धा आहे हे आजच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले.

6 comments:

  1. खरे आहे, हे फक्त मोदीच करू शकतात.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

      Delete
  2. खरे आहे आजच्या व्यवस्थेत तर मोदीच हवेत .

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

      Delete
  3. खरे आणि परखड विचार

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

      Delete