Wednesday, 6 January 2016

natsamrat movie : नाटक्या ते नटसम्राट

दहा बारा दिवस झाले. आई माझ्याकडे आली आहे. 

परवा बायको म्हणाली, "आपण सिनेमाला जाऊ. आईंना घेऊन. "  

मलाही तिचा विचार आवडला. आईंन सिनेमा पाहून किती वर्ष झाले स्मरत नाही. मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन तर
तिने सिनेमा नक्कीच पाहिला नव्हता. मीही जगाच्या मागूनच पाहिला. पण मल्टीप्लेक्सचा झगमगाट मी पाहिला होता. आईलाही तो झगमगाट दाखवावा असं वाटलं. पै पै जोडण्यात तिचं आयुष्य गेलेलं. असल्या गोष्टींवर पैसा खर्च करावा हे तिला फारसं पटणारं नव्हतं. तिच्यासमोर प्रस्ताव मांडताच अपेक्षेप्रमाणे ती नको म्हणली. 

आम्ही सगळ्यांनी कशीबशी तिची समजुत काढली. तरी तिनं विचारलंच, " तिकीट किती ? " आठ नऊ लाख रुपये स्वतःच्या नावावर असणारी महिन्याकाठी आठ हजार रुपये व्याज घेणारी आणि महिन्याकाठी आठ हजार रुपये व्याज घेणारी माझी आई तिकीट किती हे विचारात होती. कारण पै पै करून जोडलेल्या प्रत्येक पैची किंमत तिला माहिती होती. 

बाजीराव मस्तानी पहायचं ठरवलं. आईला हिंदी सिनेमा कळणार नव्हता असं नव्हे. पण मराठी सिनेमा जेवढा तिच्या मनात उतरला असता तेवढा हिंदी सिनेमा नक्कीच उतरला नसता. तेवढ्यात नटसम्राट रिलीज झाला. आणि आम्ही तो सिनेमा पहायचं ठरवलं. 

पोरं म्हणाली , " आई , बाबांना घेऊन नटसम्राट नको पाहूस. " 

" का रे ? " इति आमच्या सौ. 

" काही नाही गं. साधा कटयार पहाताना बाबांनी चार बादल्या पाणी गळालय. हा सिनेमा बघुन तर बाबा इतके रडतील कि सिनेमागृहात पूर येईल. बिच्चा SSSSS रे  प्रेक्षक उगाच त्यात वाहून जातील. " 

हा सगळा संवाद कानामागे टाकून आम्ही सिनेमाला जायचं ठरवलं. पण तिघांनी सिनेमाला जायचं कसं हा प्रश्न होता. माझी गाडी भावाकडे होती. सोमवारी तो आणून देणार होता पण तो आलाच नाही. मंगळवारी त्याला फोन केला आणि त्यानं गाडी पोहच केली. आमचं प्रश्न सुटला. गाडी आली नसती तर रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. अर्थात शेअरिंगच्या. स्वतंत्र रिक्षा हा अजुनही माझ्यासाठी खिशाला न झेपणारा विषय आहे.      

आज सकाळी लवकर उठून बायकोनं मुलांचे डबे वैगेरे उरकले. आणि साडेआठला घरातुन बाहेर पडून सकाळच्या शोला हजर झालो. सिनेमा थिएटरचा तो झगमगाट पाहून आई दिपून गेली होती. पोटाला चिमटे घेत आयुष्यभर हौसे मौजेला मुरड घालणाऱ्या माझ्या आईला झो झगमगाट पाहून बरं वाटत होतं.   

माझ्या लहानपणी मला सिनेमात राष्ट्रगीत ऐकल्याचं आठवत नाही. आणि ऐकलं असलं तरी सिनेमा गृहातले रसिक त्यासाठी राष्ट्राभिमानाने उभे राहिल्याचं स्मरत नाही. काही सिनेमाचे ट्रेलर , नीळ लाऊन काचेवरती कोरलेल्या निळ्या जाहिराती दाखवल्या जायच्या. पंधरा पंधरा मिनिटांचा मध्यंतर असायचा. सगळीकडे पानाच्या आणि तंबाखूच्या पिचकाऱ्या असायच्या. सगळ्या थिएटरात लालभडक पिचकारयांचे रंगकाम असायचे. नाकातील केस जळतील असा या साऱ्याचा एक उग्र दर्प असायचा आणि हा सगळा मारा सोसत आम्ही जमेल तसा सिनेमा अनुभवायचा. 

आता सिनेमागृहात असले दर्प अनुभवायला मिळत नाही. मोजके ट्रेलर झाले कि राष्ट्रगीत होतं. सगळेजण राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन उभे रहातात. कुणीही चुकारपणा करत नाही. राष्ट्रगीत संपलं कि कुणीतरी , ' भारत माता की …. ' अशी ललकारी देतं. त्या पाठोपाठ ' जय SSSS ' असा भारतमातेचा जयजयकार सिनेमागृहात घुमतो. आणि सिनेमा सुरु होतो. 

आईला हे सारं नविन होतं. ती भारावून गेली होती. सिनेमा सुरु झाला आणि थोड्याच वेळात माझ्या डोळ्यांना पाझर फुटला.  टपा टपा टिपं गळू लागली. मधूनच मी व्वा ! म्हणत शिरवाडकरांच्या संवादाला दाद देत होतो. मी अजुनही सिनेमा पहाताना रडतो हा काही फारसा कौतुकाचा विषय नाही. पण रडतो हे खरं आहे. मला रडू येण्याचं कारण काय असावं याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं कि सिनेमात दाखवलेल्या माणसाच्या चांगुलपणाचा शोध मी अवती भवती घेत असतो. पण तशी माणसं प्रत्यक्षात भेटत नाहीत म्हणुन मला रडू येत असतं.        

सिनेमा पाहून सिनेमा गृहातून बाहेर पडलो. मल्टीप्लेक्सच्या झगमगाटाचची भूल ओसरली होती. पण आम्ही सगळे अबोल झालो होतो. चेहेरे धीरगंभीर झाले होते. मन अंतर्मुख झालं होतं. आई वडिलांचा सन्मान करावा त्यांना दुख देऊ हे प्रत्येकाला माहित असतं. मलाही माहित होतं. आज त्याची उजळणी झाली होती. 

आई वडिलांचा सन्मान करावा त्यांना दुख देऊ हे प्रत्येकाला माहित असतं. पण तसं कृतीत कितीजण आणतात ? म्हातारपणाचे चटके सोसणारे माझ्या अवती भवती मी अनेक वृद्ध पहातो. म्हातारपणापेक्षा उतरत्या वयात मुलं नातवंडांनी दिलेल्या वागणुकीने ते अधिक खचून गेलेले असतात. अशाच एका एकाकी स्त्रीची अवस्था पाहून - 

अंधाराच्या वातीवरती 
उजेड आता शोधत असते 
तुझ्या जुन्या फोटू मधलं
मधाळ हसू बघत असते   

या ओळींनी माझ्या मनात आकार घेतला होता. शहरात रहाणारी कोटयावधीची मिजास दाखवणारी नातवंड तिला आहेत. आणि गावाकडे शेती पहाणारा हाकेच्या अंतरावर रहाणारा मुलगाही आहे. पण म्हातारी अंधारात असते. दिवस रात्र. चोवीस तास.     

आम्ही घरी आलो. जेवण केलं. मी लिहायला बसलो. आई झोपी गेली. झोपी गेली होती कि डोळे मिटून अंतर्मुख होऊन त्या सिनेमात आपण कुठे होतो याचा विचार करत होती कुणास ठाऊक ! 

सिनेमाविषयी काय लिहू ? मुळात  हिच पोस्ट लांबली आहे. सिनेमाविषयी स्वतंत्र पोस्ट लिहीन. तूर्तास सिनेमा पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि नुसताच पाहू नका तर सिनेमा पाहिल्यानंतर, ' मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या आई - वडीलांना दुखावणार नाही. ' असा वसा घ्या. स्त्रियांनी सासू सासऱ्यांनाहि दुखावणार नाही असा पण करावा. म्हणजे मग विवा शिरवाडकरांचं लेखन आणि नानांचा अभिनय सार्थकी लागला असे म्हणता येईल.   



                .                                         

4 comments:

  1. खुप छान व्यक्त केले आहे विजय सर ! तुम्ही सवेंदनशील आहात म्हणूनच तुम्हाला भिड़ना-या गोष्टींमुळे भावु होता आणि म्हणूनच इतके छान लिहु शकता जे अम्हालाही मनाला भिड़ते आवडते...!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार समिधाजी. खूप दिवसांनी तुमची प्रतिक्रिया मिळाली. कोणाचीही प्रतिक्रिया मी वाचून मान्य केल्याशिवाय इथे दिसू नये असा पर्याय मी स्विकारलेला असल्यामुळे तुमची प्रतिक्रिया मी मंजूर केल्याशिवाय इथे दिसत नाही. त्यामुळेच आपल्यासह सर्व वाचकांनी केवळ प्रतिक्रिया देऊन पब्लिश म्हणावे. आपण प्रतिक्रिया दिल्यानंतर आपणास ' your comment will be appear after authors approval ' असा मेसेज दिसेल.

      Delete
  2. खरच खुप छान वाटले वाचुन , तुमच्या भावनांशी मी सहमत आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. आभार दत्ताजी. प्रत्येकजण या लेखाशी सहमत असेलच. गरज आहे हा विचार प्रत्येकाने घरोघरी पोहचविण्याची आणि कृतीत आणण्याची.

      Delete