Monday, 11 August 2014

Pet animal : बैल आणि मी

Indian Bull
‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला हवं. म्हणजे शेतकरी आपल्या जनावरांची किती काळजी घेतो हे त्यांना कळेल. हा माझा लेख वाचला तरी शेतकरी आणि त्यांची जनावरं यांच्यात किती स्नेह असतो ते सगळ्यांच्याच लक्षात येईल.

मी इंजिनीअरींगला असतानाची गोष्ट.
आम्हाला शेती कामासाठी एक बैल कमी पडत होता म्हणून आम्ही एक नवा बैल विकत आणायचं ठरवलं. चुलत्यांसोबत मी काष्टीच्या जनावरांच्या बाजारात गेलो. तिथून आम्ही चांगला उंचापुरा, खिल्लारी जातीचा बैल विकत घेतला. त्याची शिंगही लांबलचक आणि अणकुचीदार. माझं तेव्हाचं वय विशीच. त्याचं नाव मी राजा ठेवलं.

गावाकडची जनावर शेतकऱ्यांच्या सहवासात वावरणारी. नेहमी धोतर, सादरा आणि पटका पाहणारी. त्यांना शहरी पेहरावाची प्यांट शर्टची सवय नसते. सहाजिकच ते शहरी माणसाला जवळ फिरकू देत नाहीत.

पण राजानं मला स्विकारलं. त्याला वैरण टाकणं , पाणी पाजणं , पेंड घालणं , हि काम मीच करायचो. त्याला नांगराला, औताला, बैलगाडीला जुंपण्याच कामही मलाच कराव लागायचं.

त्याचं आणि माझ एवढ मेतकुट जमलं कि तो माझ्याशिवाय कुणालाही हात लावू देईना. अगदी माझ्या चुलत्यांनाही. माझे चुलते त्याला वैरण घालायला गेले कि त्याने शिंग उगरलच म्हणून समजावं. पण माझ्या त्याच्यात कुठलं नातं निर्माण झालं होतं कुणास ठाऊक. मी त्याच्या अवती भवती बिनधास्त वावरायचो .

आमच्याकडे संध्याकाळी बैलांना गव्हाची कणीक खाऊ घालायची परंपरा होती. पण राजाला कणीक खाऊ घालायचं कामही मलाच करावं लागायचं. मीही अगदी पोटच्या  मुलाला आईनं भरवाव तसं त्याला भरवायचो. त्याच्या पुढ्यात बसायचो. कणकेचे बारीक मुठीएवढे गोळे करायचो. आणि अगदी त्याच्या मुखात घास द्यायचो. त्याच्या रखरखीत जिभेचा स्पर्श मला मोरपिसासारखा वाटायचा.

मी तसा शहरातच लहानाचा मोठा झालेलो. गावाशी माझं नातं सुट्टी पुरतंच. शाळा असो अथवा सुट्टी असो पण आईचा ओरडून घसा बसेपर्यंत मी काही अंथरुणातून  बाहेर निघायचं नाव घेत नसायचो. आणि रात्री एकदा अंथरुणात झोकून दिल्यानंतर सकाळी सूर्य चांगला हातभर वरती येई पर्येंत उठायचो नाही. हि सगळी झोप अगदी गाढ असायची. इतकी कि कुंभकर्णानही आम्हाला लवून मुजरा करावा.

पण इथं राजाच्या सहवासात माझ्या झोपेतला गाढपणा कुठं हरवला कुणास ठाऊक.  गावाकडे मला राजाची काळजी असायची. माझ्या चुलत्यांना आम्ही आण्णा म्हणायचो. त्यांना राजा जवळपासही फिरकू द्यायचा नाही. मग त्याला रात्री दोन वाजता, पहाटे पाच वाजता वैरण टाकण्याचं काम कोण करणार ? सहाजिकच राजासाठी रात्री अपरात्री उठण्याची वेळही माझ्यावरच आली. इतके दिवस अखंड गाढ झोपेची सवय. पण इथं राजासाठी मी ठरल्यावेळी न चुकता उठायचो. कोणीही आवाज दयावा लागायचा नाही. पण जाग आल्यावर घड्याळात पाहिलं तर बरोबर रात्रीचे दोन किवा पहाटेचे पाच वाजलेले असायचे.

आठ महिन्यात मला नौकरी मिळाली आणि मी पुन्हा पुण्यात परतलो. राजाला कुणास ठाऊक, कशी पण भनक लागली होती. त्याचे डोळे भरून आलेले होते. त्याच्यातला उत्साह मावळला होता. पुढ्यातली वैरण तो दातातही धरत नव्हता.

माझी अवस्थाही त्याच्यासारखीच झालेली. त्याची आणि माझी भेट मी पुन्हा मोठ्या सुट्टीवर आल्यावरच होणार होती. मी त्याला जड अंतकरणानं वैरण घातली आणि पाणी पाजलं. निघायच्या आदल्या दिवशी त्याला तेलात माळून कणीक खाऊ घालायला गेलो पण पठ्ठ्यानं एक घास शिवला नाही. त्या रात्री मीही जेवलो नाही.
दुसऱ्या दिवशी मी पहाटेच निघलो, कुणास ठाऊक कसं पण मी दूर निघाल्याच त्याला कळलं होतं. मी घराबाहेर पाउल टाकताच तो गोठ्यात चटदिशी उभा राहिला. दावणीला जोर देऊ लागला. त्याची तडफड बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मनात कालवाकालव झाली. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गळ्यात पडून मुसमुसून रडलो. पाय निघत नव्हता तरी निघालो. शहरात आलो नौकरीत रमलो. एक यंत्र झालो.

बऱ्याच महिन्यानंतर गावाकडे आलो.  पहातोय तर राजा दावणीला नाही.

आण्णांना विचारलं तर म्हणाले,” आरं, तू गेलास आणि बाईलीचं कुणालाबी हात लावू दिईना. वैरण आमी लांबूनच घालयचो, आणि पाणी सुदिक लांबूनच दावायचो. पण दावणीतून सोडून कामाला जुपायाची काय आमची हिम्मत हुईना. आखरी त्याच्या मूळ मालकाला सांगावा धाडला. घेतल्या किमतीला दोन हजार
Indian Bull
रुपय खोट खावून दिवून टाकला.” माझे हातापायात त्राण उरलं नाही. डोळे भरून आले. पण रिकाम्या दावणीकड पाहण्याशिवाय माझ्या हाती काहीच उरलं नव्हतं. कितीतरी वेळ मी सुन्न होऊन उभा होतो.   

त्यानंतर कितीतरी वर्ष सुट्टीला गावी गेलो कि राजाच्या रिकाम्या दावणीकड मी पहायचो आणि त्याच्या माझ्यातलं एक नातं माझ्या मनात गजबजून यायचं.

8 comments:

  1. अत्यंत भावपूर्ण. डोळ्यात पाणी आले.

    ReplyDelete
  2. भारती, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. इतर पोस्टही वाचाव्यात. त्याही आवडतील अशी आशा बाळगतो.

    ReplyDelete
  3. Bhartiy shetkari ani bail yancha nat ajhi tsch atut ahe.

    ReplyDelete
  4. आनंदा प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. तुम्ही म्हणता ते खरे आहे. पण न्यायाधीशांना आणि शहरातल्या प्राण्यांचा खूप कळवळा असल्याचं दाखवणाऱ्या संघटनांना हे कसं कळणार.

    ReplyDelete
  5. अनघा चव्हाण2 September 2014 at 15:16

    खुपच छान लेख.

    ReplyDelete
  6. अनघा प्रतिक्रियेबद्दल मनापसून आभार. इतर लेखही वाचावेत. तुमच्या प्रतिक्रिया मला लिखाणासाठी अधिक बळ देतात हे कायम लक्षात ठेवा आणि अधिकाधिक प्रतिक्रिया आणि सूचना देत चला.

    ReplyDelete
  7. संग्राम थिटे6 September 2014 at 16:49

    आपल्या मुलांवर करावं तितकंच प्रेम शेतकरी त्याच्या दावणीवर करतो. पण यंत्रात सापडलेल्या मंडळींना ते कसं कळणार.

    ReplyDelete
  8. संग्रामजी प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार. तुम्ही हाडाचे शेतकरी दिसता. आपण आपल्या जनावरांवर किती प्रेम करतो हे जगाला कळण्यासाठी आपणच जागर करायला हवा.

    ReplyDelete