Thursday, 22 September 2016

मराठा क्रांती मोर्चा ? हि कसली क्रांती ? ( Maratha Kranti Front? Is it revolution?)


Marataha Kranti morcha ?

गेली पंधरा दिवस मिडियात मराठी क्रांती मोर्चाची खूप चर्चा आहे.लाखा लाखाचे आकडे राजकीय व्यासपीठाला हादरे देत आहेत असं भासवलं जात आहे. पण आपल्या झुंडशाहीला क्रांतीच नाव देणारी हि जात पाहिली कि 
कुठे स्वातंत्र्यासाठी क्रांतीची मशाल हातात घेणारे भगतसिंग आणि राजगुरू आणि कुठे आपल्या आरक्षणासाठी छाती बडवणारी हि जात असा प्रश्न पडतो ?

आम्ही समाज म्हणून एक होत नाही..........देश म्हणून एक होत नाही...........सामान्य नागरिक म्हणून एक होत नाही............शेतकरी म्हणून एक होत नाही........आणि माणुस म्हणून तर मुळीच एक होत नाही. पण जात म्हटल कि आम्ही मुठ आवळतो. कशासाठी ? हाती पायी धड असणारे आम्ही हाती कटोरा हातात घेवून आरक्षणाची भिक मागत फिरतो तेव्हा परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणाऱ्या समाजातल्या विकलांग वर्गाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. 

आज या मोर्चाला कोपर्डीच्या घटनेचा मुलामा दिला जातोय. परंतु बलात्कार करणारा कधीही जात पहात नाही. कोपर्डी घटनेचं भांडवल करू पहाणाऱ्या मराठा समाजाने आणि तथा कथित नेत्यांनी माझ्या पुढील प्रश्नाची उत्तरे द्यावीत ? 

१ ) यापूर्वी मराठा समाजातील मुलींवर बलात्कार झाले नाहीत काय ? 

२ )  मराठा समाजातील मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आक्रोश करणारा मराठा समाज इतर समाजातील मुलींवर होणारे बलात्कार समर्थनीय मानतो काय ? 

३ ) आजवर मराठा समाजातील तरुणांनी मराठाच अथवा इतर समाजातील मुलींवर कधीच बलात्कार केला नाही काय ? 

मराठा समाजाने आरक्षण घेऊ नये असे मला मुळीच म्हणायचे नाही. परंतु हे सगळे आजच का ? हे सगळे विरोधी पक्ष सत्तेवर आल्यानंतरच का ? विरोधी पक्ष सत्ते आल्यानंतर अवघ्या दोन वर्षात हे असे आंदोलन उभे रहाणे यात समाज नाही राजकीय डावपेच आहेत असे या समाजाला वाटत नाही का ? राजकारणावर प्रभुत्व असणाऱ्या मराठा समाजाने आजवर इतर समाजांना आरक्षण देताना राजकारण आरक्षणाच्या कक्षेत येवू दिले नाही हे वास्तव नाही का ? हे जाणीवपूर्वक झाले आहे असे आपल्याला वाटत नाही का ? इतर समाजही असेच संघटीत होऊन ढोल बडवू लागले तर काय करायचे ? आरक्षण हे आपल्यापुढील खरे संकट नसून शेतमालाला हमीभाव , बेकारी , महागाई , मोडकळीस आलेली लोकशाही या खऱ्या समस्या आहेत असे आपणास वाटत नाही काय ? विनायक मेटेंना मंत्रीपद मिळाले असते तर असे आंदोलन उभे राहिले असते का ?

आरक्षण मिळाले म्हणून दलित समाजाची सामाजिक पत आणि उंची फारशी वाढली आहे असे मला दिसत नाही. मुंबईपासून प्रत्येक शहरात अस्तित्वात असणाऱ्या झोपडपट्ट्या आणि त्यात बहुसंख्येने असणारा दलित वर्ग हे आरक्षण मिळूनही सामाजिक स्तर वाढत नाही याची साक्ष आहे. भीमनगर , अण्णाभाऊ साठे वसाहत अशी लेबले  चिटकवून घेणाऱ्या आणि छतावर निळे झेंडे मिरवणाऱ्या झोपडपट्ट्या नाहीत असे शहर या देशात सापडणार नाही. त्यामुळेच आरक्षण म्हणजेच प्रगती हा भ्रम मराठाच नव्हे तर सर्वच समाजांनी आणि जातींनी पायदळी तुडवायला हवं.

आरक्षणासाठी केवळ विकलांगता आणि आर्थिक दुर्बलता हे दोनच निकर्ष असायला हवेत. पण त्या निकार्षाचेसुद्धा गैर फायदे घेणारे महाभाग या देशात कमी नाहीत. अपंगत्वाचा खोटा दाखला सादर करून फायदे लाटणाऱ्या शिक्षकांची बातमी याची साक्ष आहे. आणि आर्थिक दृष्ट्या धडधाकट असूनही खोटे उत्पन्नाचे दाखले सादर करून फी माफी मिळवणारे महाभाग आपल्या अवतीभवती कमी नाहीत.

त्यामुळेच आपला स्वार्थ या पलीकडे काहीही न दिसणाऱ्या समाजाकडून असल्या आंदोलनाशिवाय दुसरे काही अपेक्षित नाही. 

आणि सर्वात महत्वाचं - आजवर आणि अजूनही सत्तेत आणि राजकारणात प्रभुत्व असणाऱ्या मराठा नेत्यांना कोणीच काही जाब का विचारात नाही ?


       

3 comments:

  1. Replies
    1. आपण निनावी प्रतिक्रिया द्यावी हि एखाद्या समाजाची दहशत समजायची का ?

      Delete
  2. इथे योगेश नावाच्या एका मित्राची प्रतिक्रिया होती. ति माझ्याकडून चुकून डिलीट झाली. मित्रा मराठा क्रांती मोर्चे खूप शांततेत पार पडले हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.पण जवळ जवळ पंचावन्नहून अधिक वर्षे मराठ्यांच्या हातात सत्ता असताना आरक्षण का नाही लागू केले गेले ? गेल्या २०१४ ला नेमके विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत आरक्षण का लागू केले ? न्यायालयात ते टिकले नाही तर विरोधकांच्या नावाने खडे का फोडले ? आणि आज विरोधक सत्तेत आल्यावर अवघ्या दोन वर्षात मराठा समाजाला जाग कशी आली ? प्रत्येक जिल्ह्यातल्या आंदोलनाला कोट्यावधी रुपये लागले असतील , हे पैसे कोठून आले ? अशा अनेक बाबींचा विचार केला तर या आंदोलनामागे राजकारणच आहे हि बाब कधीच नजरेआड करता येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण मराठा समाजाला जाग यायला एवढी वर्षे का लागली ? एके काळी शिवाजी महाराजांनी , ' मराठा तितुका मेळवावा , अवघा महाराष्ट्र धर्म वाढवावा ' अशी घोषणा केली होती. तेव्हा भारतभर मुघलांची, निजामांची आणि इंग्रजांची सत्ता होती. शिवाय महाराजांना मराठा म्हणताना ' मराठी भाषिक असा भाव अभिप्रेत होता आणि मराठा क्रांती मोर्चा हा केवळ मराठा समाजासाठी उभारला गेलाय. इतर समाजांचाही या मोर्चाला पाठींबा आहे असे म्हणणे हि केवळ एक वल्गना आहे.

    ReplyDelete