सर्वसाधारणपणे चोरांच्या अतिरेकी आणि वारंवार वावरा संदर्भात ' सुळसुळाट ' हा शब्द वापरला जातो. पण परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी हुकुम सोडला आणि शेपटी पेटलेल्या हनुमानाप्रमाणे वाहतूक हवालदार चौकाचौकात धुमाकूळ घालु लागले. पण हनुमानाला रामाची अयोध्या नव्हे तर रावणाची लंका पेटवून देण्याइतपत भान होतं. तेवढं भान या हातात कोलीत मिळालेल्या माकडांना कसे असणार. ते निघाले सामान्य माणसाचे खिसे पेटवत.
परवा गावाहून आलो. पुणे स्टेशनला उतरलो. स्वारगेटच्या बस थांब्यावर आलो. तर
वाहतुक हवालदाराच्या हातात बकरा दिसला. आपला मोटरसायकल स्वार. गुन्हा काय ? तर रस्ता सापडत नसल्यामुळे तो त्या बसच्या मार्गिकेतून आला होता. बुधवार पेठेत वेश्या जशा मुक्तपणे वावरत असतात तसे इथं रिक्षावाले घिरट्या घालत असतात. कुठूनही कसेही घुसतात. तेव्हा हेच पोलीस बघ्याची भुमिका घेतात.
वाहतुक हवालदाराशी जाम वाद घातला. शेवटी माझ्याकडे खाऊ कि गिळू या आवेशाने बघत त्याने तो बकरा चिरीमिरीशिवाय सोडुन. तसा मी दुसऱ्या हवालदाराकडे वळालो. त्याच्याही मगर मिठीत बकरा होता. हेल्मेट नसलेला. जवळच दहा मिनिटे चालेला माझा तमाशा त्यानं पाहिला होता. मी त्याच्याकडे वळताच त्यानं मला स्पष्ट सांगितलं. साहेब तुम्हाला जे काही सांगायचं ते मंत्र्यांना सांगा. त्यांचा आदेश आहे.
माझ्या सोबत आई होती. तिला मी बसमध्ये बसवले होते. बसचा ड्रायव्हर सीटवर विराजमान झाला आणि मी बसकडे धावलो.
आंबेडकर पुतळा , केईएम, नानापेठ असं करत बस स्वारगेटला आली. पण मी चौकाचौकात अदभूतपूर्व पोलीस बंदोबस्त पहात होतो. जणु कुठूनतरी मंत्र्याचा ताफाच येणार होता.
हे पोलीस करत काय होते ? हेल्मेट नसलेल्या मोटरसायकल स्वारांना बाजूला घेत होते. पावत्या फाडत होते. थोडक्यात काय तर दिवसा ढवळ्या सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारत होते. मधल्या काही चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पण ती मोकळी करायला पोलिसांचा फौजफाटा उपलब्ध नव्हता.
पोलिसांचं खरं काम काय ! तर जनतेचं , जनतेच्या मालमत्तेच आणि कायदा सुव्यवस्थेच रक्षण करण. पण इथं तर दिवसाढवळ्या लूट चालली होती.
पोलिस खात्याची उभारणी जनतेच्या रक्षणासाठी आणि समाज विघातक शक्तींवर , गुंडगिरीवर वाचक ठेवण्यासाठी केली खरी. पण झालं उलटं. गुंड तर भीत नाहीतच पोलिसांना पण सामान्य माणुस मात्र पोलिसांच्या भीतीने अर्धमेला झालाय.
समोर पोलीस दिसला कि सामान्य माणसाच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहतो आणि आता याला कसं चुकवायच एवढाच विचार त्याच्या मनात येतो. कारण एकदा त्याच्या हाती लागल्यानंतर तो येन ना केन प्रकारे आपला लचका तोडणारच याची आपल्याला खात्री असते. लायस्न, गाडीची कागदपत्र, पीयुसी, नंबर प्लेट, तुटलेला इंडिकेटर कशात ना कशात तुम्ही सापडणार असताच.
महिन्याभरापुर्वीची गोष्ट आहे. असाच एक पुण्यातला चौक. तुफान गर्दीचा. त्या चौकातून जाणारा रस्ता बीआरटी मार्ग , इतर वाहतूक, सायकल मार्ग, पादचारीमार्ग अशा पदरात विभागलेला. बीआरटी मार्ग मोकळा ढाकळा. पण सामान्य वाहतुकीच्या मार्गावर मात्र तोबा गर्दी. त्यातूनही मार्ग काढत दुचाकी स्वार पुढे सरकत होते. रिकाम्या असलेल्या सायकल मार्गावरून डायरेक्ट पोलिसाच्या जाळ्यात अडकत होते. पावती फाडली जात होती.
मी माझी गाडी सिग्नलच्या पुढे नेऊन बाजूला लावली. जाळ्यात सापडलेल्या दुचाकी स्वारासमोर टेचात उभे राहून पावती फाडण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसाला म्हणालो , " साहेब , कसली पावती फाडताय हो ? "
" हे सायकल ट्रॅक मधून आलेत. "
" बरं. मग."मी.
" मग काय ? गोष्ट सांगतोय काय ? " तो त्याच्या टिपिकल पोलिसी आवाजात गुरकावला.
" मग काय ? गोष्ट सांगतोय काय ? " तो त्याच्या टिपिकल पोलिसी आवाजात गुरकावला.
" सायकल ट्रॅक मधून मोटरसायकल चालवली कि पावती फाडावी असा नियम आहे का कोठे ? " मी.
" मग काय उगाच पावती फाडतोय का ? "
" दाखवा नियम. " मी.
" तुला नियम दाखवायला तु काय बॅरिस्टर आहेस का ? " अवती भोवती लोक जमले होते. त्यामुळे मला अपमानीत करण्याच्या हेतूने तो एकेरीवर उतरला.
" साहेब, असा संयम सोडू नका. नियम दाखवा मग खुशाल पावती फाडा. सायकल ट्रॅक मधून मोटर सायकल चालवू नये असं कुठे लिहिलंय का ? "
इतका वेळ आमच्याकडे बघुनही न बघितल्या सारखं करणारा दुर उभा असलेला त्याचा साहेब पोलीस इन्स्पेक्टर जवळ आला होता. माझं तत्व त्याच्या कानावर गेलं होतं. कसेतरी पास होत दहावी बारावी अथवा पदवी झालेल्या या माणसांना कायद्यानं बहाल केलेल्या अधिकाराने आपण हतबल झालेलो असतो. त्याशिवाय समोरच्याचं खच्चीकरण कसं करावं याची एक खास अक्कलदाढ यांना असते.
त्यानं एकवार जमा झालेल्या गर्दीकडे बघितलं. नंतर माझ्याकडे बघत म्हणाला, " सुशिक्षित ना तुम्ही ? धु असं कुठेही लिहिलेलं नसतं तरी धुताच ना. मग सायकल ट्रॅक मधून मोटार सायकल चालवू नये हे सांगव लागतं का ? जा घरी जाऊन आपलं काम बघा. "
" साहेब उगाच काही दाखले देऊ नका. आहो चार तासातून एक सायकल जात नाही इथून मग याला सायकल ट्रॅक का म्हणायचं केवळ बोर्ड लावलाय म्हणूनच ना. " गर्दीच्या वेळी गेल्या इथून मोटर सायकली तर काय बिघडणार आहे. "
मी भांडत होतो. पण ज्याला अडवलं होतं तो हातात शंभराची नोट घेऊन उभा होता. तेवढ्यात एक हवालदार आला माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला , " साहेब या इकडं, अहो, आम्हाला काय हौस आहे. प्रत्येक हवालदारान रोज किमान ३० पावत्या फाडल्या पाहिजेत असं आग्रह आहे. काय करायचं आम्ही ? तुम्ही उद्या आयुक्तांना भेटा आणि आमच्या मानेवरच हे जोखड उतरवा. आम्हाला तरी काय मजा वाटतेय का पावत्या फाडायला ? "
की बोलणार ! गप्प बसलो. आयुक्तांना भेटायचं. पण कधी जमेल कोणास ठाऊक ?
पण मी आयुक्तांनाच काय मंत्र्यांना भेटूनही हा अत्याचार थांबेल असे नाही. त्यासाठी जनतेनेच जागरूक व्हायला हवे. विखुरलेल्या हातांना मुठीचे रूप यायला हवे.


बापरे! तुमचेही धाडस च म्हणायला हवे..पोलीसांशी हुज्जत घालणे काही सोपे काम नाही. पण खरेच, सायकल ट्रॅक मधून बाईक्स पळवायला नकोच ना? गर्दीच्या वेळी एकदा सूट दिली तर मग तो नियमच बनून जाईल. ’असे’ नियम मात्र लोक चांगले पाळतात!
ReplyDeleteज्या सायकल ट्रॅकमधून तासाभरात एखादी सायकल जात असेल त्याला सायकल ट्रॅक का म्हणायचे. शिवाय हा सायकल ट्रॅक हि अखंड नाही. जमेल तिथं केला जमेल तिथं नाही. काय याचा उपयोग ?
Delete