Tuesday, 24 June 2014

Boards In Pune : पुणेरी पाटी


( खालची पाटी आवर्जून पहा आणि जागे व्हा. )

पुणेरी पाटी या विषयावर वर्तमान पत्रातून स्वतंत्र कॉलम झळकलेले आहेतच. परंतु या विषयी एखादी स्वतंत्र वेबसाईट चालावी, किंवा एखाद्याला हा विषय घेवून पीएचडी करावीशी वाटावी एवढी पुणेरी पाटीची ख्याती आहे.

मीही अशा अनेक पाट्या वर्तमानपत्रातून वाचल्या आहेत. पण प्रत्यक्ष पुण्यात राहूनही गेल्या चाळीस वर्षात फारच मोजक्या पाट्या माझ्या नजरेस पडलेल्या आहेत. पण पुर्वी जसे पावलोपावली कॉईन बॉक्स दिसायचे तशा या पुणेरी पाट्या मला फारश्या दिसल्या नाहीत. कदाचित सदाशिव पेठेत माझं फारसं जाणं – येणं नसल्यामुळेही अशा पाट्या माझ्या कधी नजरेस पडल्या नसाव्यात.


त्यामुळेच पुणेरी पाट्या हे एखाद्याच्या मनातल्या कल्पनांचं भूत असावं आणि कुणी दखल घ्याव्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात या पाट्या अस्तित्वातच नसाव्यात असं मला वाटत होतं. पण माझ्या या भ्रमाच्या भोपळ्यास टाचणीप्रमाणे टोचावी अशी पाटी महिन्यापूर्वी माझ्या नजरेस पडली.

झालं असं. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत माझी बहिण शिवसेनेची उमेदवार होती. आमच्या प्रभागात एकूण बावीस उमेदवार रिंगणात होते. घरोघरी भेट देण्यावर प्रत्येकाचा भर. प्रत्येकानं निवडणूक काळात कमीत कमी तीन वेळा प्रत्येक घराचा उंबरठा झीजावण्याचं ठरवलेलं आम्हीही त्यातलेच. गणपतीत वर्गणी मागणाऱ्या मंडळानपेक्षाही या काळात नागरिकांना अधिक त्रास होत असावा हे कुणाच्या काय पण आमच्याही गावी नव्हतं. पण एका दारावर लावलेली हि पाटी आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पाडून गेली. ती हि पुणेरी पाटी -
सुदैवानं ते घर आमची पाठराखण करणारं आहे  हे माहित असल्यामुळे दार ठोठावताना आम्हाला फारसा संकोच वाटला नाही. आणि दार उघडल्यानंतर आमचं हसून स्वागत झाल्यामुळे आम्हाला हायसंही वाटलं.

चहापाणी आणि क्षेमकुशल झाल्यानंतर आम्ही तेथून बाहेर पडलोत. पण प्रत्येक मतदार इतका जागरूक झाला तर आमच्या देशात पुन्हा सोन्याचा धूर निघण्यास कितीसा वेळ लागेल. असा विचार आमच्या मनात घोंगावत राहिला.

No comments:

Post a Comment