आठ दहा दिवसापुर्वी मी गावी निघालो होतो. शेतावर. पुण्यातून दौंडपर्यंत रेल्वेने. तिथुंपुढे मिळेल त्या वहानाने. हि माझी प्रवासाची सामान्य रीत. चहावाला हा लेख अशाच एका अनुभवावर लिहिला होता. रसिकांना फार आवडला होता. परवाही मला अशीच एक मुलगी भेटली.
आपण स्त्री पुरुष समानतेच्या कितीही वल्गना केल्या तरी त्यातल्या विरोधाचा आणि असमानतेचा प्रत्यय पदोपदी येत असतो. प्रवासात एखादया सुंदर स्त्री जवळ जागा मिळाली अथवा आपल्या शेजारच्या रिकाम्या जागेवर एखादी सुंदर स्त्री येउन बसली तर मनात आनंदाचे तरंग उमटणार नाही असा पुरुष विरळाच. तर स्त्री शेजारी पुरुष बसला तर अंग चोरुन बसणार नाही अशी स्त्री सापडणं सुद्धा कठीणच.
मी अगदीच तरुण नसलो तरी सुंदर स्त्री दिसल्यानंतर मनात भावनांचे तरंग उमटणार नाहीत इतका मावळतीकडेही झुकलेलो नाही. पण भावनांचे तरंग म्हणजे काय ? सुंदर स्त्री पाहिल्यानंतर माझ्या मनात लगेच विषय जागा होतो का ? सुंदर तरुणी समोर आली कि माझ्या मनात लगेच वासना आकाराला येते का ? जाता येता एखादी रूपवती समोर आली कि मी लगेच तिच्या प्रेमात पडतो का ? नाही. असं काही होत नाही. मग तरंग उमटतात म्हणजे नेमकं काय होतं ?
मी पुना स्टेशनला रेल्वेत चढलो. बसायला जागा नव्हतीच. खांद्यावरची ब्याग एका बाजुला अडकवली. चष्मा डोळ्यावर चढवला. उभ्यानच वर्तमानपत्र उघडलं. आणि वेगवेगळ्या बातम्या नजरेखालून घालू लागलो. इतका वेळ माझं लक्ष गेलं नाही. पण ती माझ्या वर्तमानपत्रात डोकं घालत होती. म्हणुन मी तिला न्याहळलं. माझ्या शेजारी एक मुलगी होती. साधारण बावीस चोवीसची. सुंदर. गोड. सहाजिकच तिच्याशी बोलावं असं वाटलं. म्हणुन -
" कुठे जायचंय ? " असं म्हणत मी सुरवात केली.
" सोलापुरला." तिनं आढेवेढे न घेता हळुवार उत्तर दिलं.
मी पुन्हा वर्तमान पत्रात रमलो.
" तुम्हीपण सोलापुरलाच चाललात का ? " तिचा प्रश्न.
" नाही. दौंडला. "
" दौंडला रहाता का ? "
" नाही." म्हणत मी तिला सविस्तर माहिती पुरवली. आणि दौंडला माझे मामा असतात हेही सांगितलं.
" माझेही नातेवाईक असतात दौंडला. पण खुप लांबचे. त्यांचं नातं नाही सांगता यायचं मला. " तिनंही दौंडशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला.
मग मीही तिची सविस्तर चौकशी केली. तिनंही सहजपणे सारं सांगितलं.
तिला काहीतरी लिहायचं होतं. माझ्या खिशाला असलेल्या पेनकडे पहात तिनं विचारलं,
" पेन घेऊ. "
" पेन घेऊ. "
"घे ना बाबा." म्हणत मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
तिला अजिबात संकोचल्यासारखं वाटलं नाही. तिनं कोणताही आप - परभाव न दाखवता माझ्या खिशाचा पेन काढून घेतला. पण माझा मलाच प्रश्न पडला, ' तिच्या जागी एखादा तरुण असता तर मी त्याच्या डोक्यावरून असा हात फिरवला असता ? ' नक्कीच नसता फिरवला. मग तिच्या डोक्यावरून हात फिरवावा असं का वाटलं मला ? केवळ ती एक स्त्री होती म्हणून ? कि आणखी काही भावना होती माझ्या मनात ?
ती माझी बहीण नव्हती. म्हणजेच त्या स्पर्शाला बहीण - भावाच्या नात्याचा ओलावा नव्हता आपल्या मुलीच्या स्नेहाच्या भावनेतुन मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला असं म्हणावं तर ती माझी मुलगगी वाटावी इतका मी पोक्त नव्हतो. तिचा माझा कोणताही पूर्वपरिचय नव्हता. नातं नव्हतं ……. परिचय नव्हता……ओळख नव्हती……. मैत्री नव्हती. आणि तरीही मी तिला स्पर्श केला होता. मी तिला का स्पर्श केला ते नाही सांगता येत. पण एक गोष्ट खात्रीने सांगतो तिच्या डोक्यावरून हात फिरवताना माझ्या मनात स्त्री लंपटपणा अजिबात नव्हता. स्त्री स्पर्शाविषयी वाटावी तशी हुरहूर नव्हती. त्या स्पर्शात वासना नव्हती. मग का फिरवला असेल मी तिच्या डोक्यावरून असा हात ?
तो स्पर्श म्हणजे एका तरुणीच्या निरागसतेला केलेला सलाम होता. तो स्पर्श म्हणजे तिच्या मानसिक निर्मळतेला मी दिलेली दाद होती. तिच्याविषयी एक वेगळा स्नेह माझ्या मनात होता. त्या स्नेहाला नात्याचं लेबल नव्हतं. भावनांच्या मर्यादा नव्हत्या. प्रेमाची झालर नव्हती. स्त्री-पुरुष ओढीची किनार नव्हती. पण तरीही मी तिला स्पर्श केला होता.
पुढे फेरीवाला आला. तिनं वेफर्स घेतले. पुडा फोडला. आधी माझ्या समोर धरला. मीही, " नको, नको." म्हणण्याचा फार्स केला नाही. उगाच आढे वेढे घेण्याचा आव आणला नाही. मी वेफर्सची एक चकती घेतली. प्रवास सुरू होता. ट्रेन डोलत होती. ट्रेनच्या हिंदोळ्याबरोबर अधूनमधुन तिचा मला अथवा माझा तिला स्पर्श होत होता. पण ती अंग चोरून घेत नव्हती. आणि माझ्या मनात विकार आकाराला येत नव्हते. बहुदा आमच्यातल्या स्त्री पुरुष भिन्नतेच्या मर्यादा गळून पडल्या होत्या.
" चल. बाय." म्हणत तिचा निरोप घेतला.
तीही हात हलवत , " बाय." म्हणाली.
गाडी थांबली. मी मागे वळून न पहाता रस्त्याला लागलो. मनात आलं स्त्री पुरुष एकमेकांशी इतक्या सहजतेने वागले तर किती छान होईल !
Lekh awadla. Wastwwadi lekhan.
ReplyDeleteनयनाजी अभिप्रायाबद्दल आभार.
Deleteखुपच चांगला विचार आहे,प्रतेकने असाच विचार करून वागले तर वाईट गोष्टी घडणार नाहीत
ReplyDeleteधनंजयजी अभिप्रायाबद्दल आभार. प्रत्येकानं असं वागावं हि अपेक्षा ठीक आहे. पण ते शक्य नाही हे वास्तव आहे. हाताची पाची बोटे कुठे सारखी असतात. पण माझ्या लेखामुळे १०० जणांच्या विचारसरणीत फरक पडला तरी लेख सार्थकी लागला असे समजेन.
Deletekhup chhan wichar.
ReplyDeleteआभार मित्रा.
Deleteखुपच वास्तववादी लिखाण!
ReplyDeleteआभार दत्ताजी.
Delete