२३ आणि २४ मार्च हे दोन दिवस म्हणजे पुणेकर साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरली. हे दोन दिवस SM जोशी हॉलला सांस्कृतिक नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वास्तूने दोन दिवस रसिकांची मांदियाळी अनुभवली. लेकुरवाळा विठू होऊन कलाकारांना,
रसिकांना अंगाखांद्यावर खेळवले. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कवींचे, साहित्यिकांचे, कलाकारांचे, गायकांचे, गझलकारांचे कौतुक केले कि हि अवघी वास्तू मोहरून जायची. रसिकांच्या सोबत टाळ्यांचा कडकडाट करायची. निमित्त होते प्रेरणा आर्ट फाउंडेशनने आयोजिक केलेल्या ' कवितेचे दोन दिवस ' या दोन दिवसीय संमेलनाचे.
२३ तारखेला दुपारी ३.३० वाजता दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. कविवर्य अशोक नायगावकर यांना संमेलनाध्यक्षपद बहाल करण्यात आले. प्रसिद्ध भाष्यकार रामदासजी फुटाणे, मा. उल्हासजी पवार, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मा. कैसर खालिद, मसापचे कार्याध्यक्ष मा. प्रा. मिलिंद जोशी, एबीपी माझाचे प्रमुख संपादक राजीव खांडेकर या मान्यवरांनी प्रमुख पाहुणे हे पद भूषविले होते. प्रेरणा फाऊंडेशनचे अध्यक्ष आणिक कांबळे आणि सचिव ज्योत्स्ना चांडगुडे या ही व्यासपीठावर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन केल्यानंतर सर्व पाहुण्यांनी आपापले स्थान ग्रहण केले. त्यानंतर आयपीएस अधिकारी आणि उर्दू साहित्यिक कैसर खालिद यांना काव्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच बरोबर शिल्पा देशपांडे, रेश्मा कारखानीस, संदीप अवचट, सुचेता जोशी-अभ्यंकर यांना काव्यमय पुरस्कार प्रदान करण्यात आला. निरजा आपटे आणि कवि उद्धव कानडे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.
उदघाटनाच्या मनोगताची सुरवात राजीव खांडेकर यांनी केली. पुणेकरांच्या समोर कसे बोलायला हवे, हास्याची फटाके कसे फोडायला हवेत याचा परिपाठ घालून देत वेळेच भान ठेवत राजीव खांडेकर बोलत होते. त्यानंतर मिलिंद जोशी यांनीही सभागृहातला हास्याचा खळखळाट कमी होऊ दिला नाही. ‘गावाकडची चूल हरवली आहे पण तिचा शोध शहराच्या अवतीभवतीने लागू लागला आहे. गावाकडे जाऊन रमण्यापेक्षा शहराच्या हमरस्त्यावर असणाऱ्या ढाब्यातून मिळणाऱ्या चुलीवरच्या मटणात, चुलीवरच्या भाकरीत माणसे गावाकडचा जिव्हाळा शोधू लागली आहेत. या चुलीची एवढी क्रेझ वाढली आहे कि परवा एक कवी भेटला तो म्हणाला चुलीवरच्या भाकरीप्रमाणे माझ्या कविता या चुलीवरच्या कविता आहेत.’ ‘चुलीवरच्या कविता’ संकल्पनेवर सभागृहात हास्याची लकेर उमटली. तोच धागा पकडून रामदास फुटाणे म्हणाले, 'कुणाच्या चुलीवरच्या कविता असतात तर कुणाच्या मुलीवरच्या कविता असतात.' रामदास फुटाणे यांच्या या शाब्दिक कोटीनंतर सभागृहात पुन्हा हास्याचा कडकडाट झाला.
कैसर खालिद यांनी हिंदी भाषेतून पुरस्काराला उत्तर देताना सांगितले कि, 'जे काही लिहाल ते आतून यायला हवे. फार वेगळे न लिहिता आपल्या अवतीभोवती जे दिसते तेच लिहा.' अध्यक्षीय भाषणात संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर यांनी आणखी हास्यरंग भरले. पण हे संमेलन प्रत्येक वर्षी व्हायला हवे आणि त्यासाठी मी शक्य ती सगळी मदत करीन असे आश्वासनही दिले. त्याआधी सकाळच्या सत्रात चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उदघाटक होते सुप्रसिद्ध चित्रकार मा. मिलिंद फडके. चित्रकार माधुरी गयावळ, कल्याणी भोगले, राजेंद्र जगताप यांच्या चित्रांचा त्या चित्रप्रदर्शनात समावेश होता. चित्रप्रदर्शनाचे उदघाटन झाल्यावर 'बहर' हे निमंत्रित कवींचे संमेलन पार पडले. दीपक जोशी हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. मसापच्या कार्याध्यक्षा सुनिताराजे पवार प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या होत्या. कवी वि.सु.चव्हाण देखील व्यासपीठावर उपस्थित होते. निमंत्रितांचे संमेलन देखील उत्साहात पार पडले.
संमेलनाचे उद्घाटन आणि प्रमुख पाहुण्याची भाषणे पार पडल्यावर संध्याकाळच्या सत्रात मराठी-उर्दू मुशायरा रंगला. अध्यक्षस्थानी होते आयपीएस अधिकारी, काव्यगौरव पुरस्कार प्राप्त उर्दू साहित्यिक कैसर खालिद. या मुशायऱ्यात राजेंद्र शहा, प्रमोद खराडे, शिल्पा देशपांडे, संदीप अवचट, सुचेता जोशी हे मराठी गझलकार आणि झाकीर खान झाकीर, उमर सिद्दीकी हे उर्दू शायर सहभागी झाले होते. अनिल कांबळे आणि रेश्मा कारखानीस यांनी संवादक म्हणून काम पाहिले. मराठीच्या व्यासपीठावर रंगलेल्या या द्वैभाषिक मुशायऱ्यामुळे भाषिक मर्यादा गाळून पडल्या. आणि पुणेकरांनी त्याला मनमुराद दाद दिली.
रात्री ९ वाजता सुरु झालेला ‘साज’ पुणे प्रस्तुत ‘गालिब से फैज तक....एक झलक’ हा कार्यक्रम सुरू झाला. अभिजात उर्दू गझलांचा प्रवास या कार्यकमातून उलगडत गेला. हा कार्यक्र्म देखील रंगतदार झाला. रात्र पेंगुळली नाही. तिने जांभया दिल्या नाहीत. पहिल्या दिवसाचं रंगतदार पर्व संपल्यावर रात्र शब्दांना कुशीत घेवून झोपी गेली.
झुंजुमुंजू झाल्या. दिशा उजळल्या. पाखरांचा चिवचिवाट सुरू झाला. पण आज त्यांच्या चोचीतून ‘चिवचिव’ बाहेर पडली नाही. आज पाखरांच्या चोचीतून देखील कवितेची पखरण झाली. सकाळी आठ साडेआठ पासूनच SM जोशी सभागृहाचा परिसर गजबजू लागला. दुसर्या दिवसाची सुरवात संगीतमय कार्यक्रमाने झाली. कवितेचं पान हा तो कार्यक्र्म. त्यात सहभागी झाले होते मधुराणी प्रभूलकर, कौशल इनामदार, वैभव जोशी आणि अमृता सहस्त्रबुद्धे. या कायर्क्माणे रसिकांना मोहित केले. या कार्यक्रमाचे सुर कवेत घेवूनच पुढचा ‘एक बूंद चाँद’ हा कार्यक्र्म सुरू झाला. कवी गुलजार यांच्या कवितांवर आधारित या गीतांचे गायक होते मकरंद पाटणकर आणि प्रीती पेठकर. निवेदक होते मंगेश वाघमारे. दुपारी दोनला आपले सुर मागे ठेवून हे सत्र संपल. दुपारचं भोजन झालं. पण रसिक पुणेकर आळसले नाहीत. १ ते ४ च्या वामकुक्षीसाठी घरी गेले नाहीत. ते तिथे इकडे तिकडे घुटमळलं. चार वाजता प्रेक्षागृहात हजर झालं. निमंत्रितांचे काव्यसंमेलन रंगणार होते. अध्यक्षस्थानी होते संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर. सहभागी कवी होते रामदास फुटणे, धनंजय तडवळकर, माधुरी चव्हाण-जोशी, डॉ. रामकली पावसकर, कविता क्षीरसागर, सुनीती लिमये, शर्मिला रानडे. जोत्स्ना चांडगुडे आणि अनिल कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
व्यासपीठावर अशोक नायगावकर आणि रामदास फुटाणे मध्यभागी स्थानापन्न होते. त्यांच्या दोन्ही बाजूला तीन तीन कवयत्री स्थानापन्न होत्या. तो धागा पकडून रामदास फुटाणे म्हणाले,' आमच्या दोन्ही बाजूला कविता आहेत आणि मधले आम्ही दोघे धडे आहोत.' तेव्हा प्रेक्षागृहात हास्याचे कारंजे उडाले. कविता सादर करण्यासाठी अशोक नायगावकर डेक्सकडे निघाले. तेव्हा संयोजक धावत आले आणि त्यांनी नायगावकर यांच्या समोर माईक स्टॅन्ड दिला. रामदास फुटाणे यांनी तीही संधी साधली, म्हणाले, ' द्या द्या, त्याला स्टॅन्ड द्या. कारण कविता म्हणताना त्याला दोन्ही हात मोकळे लागतात. हातवारे केल्याशिवाय त्याला कविता म्हणताच येत नाही. आम्ही एकत्र कार्यक्रम करतो तेव्हा मला त्याच्याजवळ बसायची भीती वाटते. कधी फटका बसेल याचा काहीही नेम नसतो.' तेव्हा सभागृह पुन्हा हास्यरसाने भरून गेले. अशोक नायगावकर यांची मुळाक्षरांची कवितेला रसिकांनी मांनापासून दाद दिली. रामदास फुटणे याची कविता स्त्री पुरुष समानता अधोरेखित करतानाच संस्कृती रक्षणाचे महत्व देखील विशद करत होती.
आता संमेलन शेवटच्या सत्राकडे आले
होते. संध्याकाळी सहा वाजता ‘अभंगरंग’ हा संतकाव्यावर आधारित संगीतमय कार्यक्रम सुरु झाला. गायक होते पंडित संजीव अभ्यंकर आणि सावनी शेंडे. आणि प्रत्येक अभंगावर निरूपण करत होते डॉ. रामचंद्र देखणे. अडीच तीन तास, रसिक भक्तिरसात न्हाऊन निघाले. प्रत्येकाचे हात टाळ-चिपळ्या झाले होते. शेवटचा भैरवी रागातील अभंग तर इतका रंगला कि संपूर्ण प्रेक्षागृह उभं राहिलं टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. दोन्ही गायक गायचे थांबले तरी. टाळ्या सुरूच होत्या. त्या टाळ्या नव्हत्या तो होता विठूनामाचा गजर. दोन दिवसाची अशी भावपूर्ण सांगता झाली. पण पुढल्या वर्षी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देत. आश्वासन घेत.
सुरेख शब्दांकन. पुन:श्च सगळा कार्यक्रम डोळ्यासमोर तरळून गेला
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
Deleteसुरेख आणि सविस्तर वृत्तांत.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
Deleteखूप छान अभिनंदन माधुरी
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
Delete