Tuesday 2 April 2019

धनुर्मास आणि झुंजूरक भोजन : एक संस्कार With Marathi Star Rahul Solapurkar

सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. ज्या महिन्यात तो धनु राशीत वास्तव्यास असतो त्या महिन्यास धनुर्मास म्हणतात. त्याला धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात रात्री मोठ्या असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. तो जठराग्नी शांत व्हावा म्हणून सकाळी लवकर भोजन करणे गरजेचे असते.  तळजाईवर संस्कार भारतीने धनुर्मास साजरा करायचे ठरवले होते. त्यानिमित्त वक्ते धनुर्मासाचे आणि
प्रातःकाळच्या भोजनाचे महत्व अधोरेखित करणार होते. सूर पहाटेचे हा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा असे भोजन दिले जाणार होते. धनुर्मासाचा संस्कार समाजात रुजावा हा या कार्यक्रमाचा हेतू. कार्यक्रम तळजाईवर होता. वेळ होती पहाटे साडेपाचची. गजर लावला आणि झोपी गेलो. पहाटे पावणेपाचलाच जाग आली. उठलो आवरलं. तळजाईवर पोहचलो. सव्वापाच वाजले होते. देवाचं दर्शन घेतलं. पटांगणात भला थोरला मंडप उभारलेला दिसला. संस्कार भारती आणि मावळ क्रिडा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती.

थोडासा पुढे गेलो तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिने अभिनेते राहुल सोलापूरकर एका कट्ट्यावर बसलेले होते. त्यांच्या शेजारीच प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अतुलकुमार उपाध्ये बसले होते. अक्षरधारा प्रकाशनाचे राठिवडेकर सपत्नीक उपस्थित होते. वातावरणात प्रचंड गारठा होता. खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले राहुलजी शांत बसले होते. विजेच्या वायरीत कुठेतरी दोष होता. विजेचा लपंडाव सुरु होता. खलनायकाच्या भूमिका करणारे राहुलजी शांत होते पण वीज खलनायक होऊन कार्यक्रम वेळेवर सुरु होऊ देत नव्हती. संस्कारभारतीचे कार्यकर्ते धावपळ करीत होते. कार्यक्रमाला उशीर होत होता. सहा वाजले होते. पण राहुलजींनी तोंडातून अवाक्षर काढले नाही. कार्यकर्त्यांना त्यांच्या मागे पळापळ करायला लावली नाही. आदळ आपट केली नाही. वेळेचा अपव्यय होतो आहे म्हणून त्रागा केला नाही. आम्ही पाच सहा जण कठड्यावर बसून गप्पांची मैफिल रंगवत होतो. राहुलजी पुलं पासून कलामांपर्यंत अनेक किस्से सांगत होते. नाट्यापासून संरक्षण खात्यापर्यंत कोणतेही विषय त्यांना वर्ज नव्हते.

संस्कारभारती हि संघटना समाजात संस्कार रुजावेत, भारतीय संस्कृती टिकून रहावी यासाठी काम करते. विविध स्पर्धा आयोजित करणे, व्याख्याने आयोजित करणे. अशा अनेक कार्यक्रमातून समाजात संस्कार पेरण्याचा प्रयत्न अव्याहयात सुरु असतो. नुकतेच भारत रत्न पुरस्कार प्राप्त झालेले नानाजी देशमुख, बाळासाहेब देवरस, गोळवलकर गुरुजी यांनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी काही विचार मांडला आणि त्यातून संस्कार भारतीची बीजे रोवली गेली. स्वतः राहुल सोलापूरकर यांनी पश्चिम महाराष्ट्रात तीन वर्ष अध्यक्ष या नात्याने संस्कार भारतीची पाळंमुळं रुजविण्यासाठी अविरत कष्ट केले आहेत. आज ते स्वतः, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशी महान व्यक्तिमत्व संरक्षक म्हणून संस्कारभारतीच्या पाठीशी उभी आहेत.

शेवटी एकदाची विजेची अडचण सुटली. कार्यक्रम सुरु झाला. विनायक माने यांनी प्रास्तविक केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. पंडितजींनी आपले विचार थोडक्यात आटोपले. आणि राहुल सोलापूरकर बोलायला उभे राहिले. भारदस्त आवाज आणि सहज, साधी-सोपी शैली, हलकेफुलके विनोद यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. परंतु निव्वळ रसिकांना हसवणं हा त्यांच्या व्याख्यानाचा हेतू नव्हताच. त्यांना भारतीय संस्कृतीचं, भारतीय संस्काराचं महत्व अधोरेखित करायचं होतं. मातृभाषेला मायबोली का म्हणतात हे सांगताना ते म्हणाले, " बाळ आईच्या पोटात असल्यापासून त्याला भाषेची ओळख होते. आई जी भाषा बोलते तीच त्या गर्भशयातील बाळात विकसित होत असते. म्हणून तिला मायबोली म्हणतात. "

प्रत्येकजण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतो आहे. ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी शाळांचं पेव फुटलं आहे. परंतु मराठी इतकी समृद्ध भाषा अन्य दुसरी नाही. हे अनेक जागतिक भाषा तज्ञांनी मान्य केले आहे. अनेक पाश्चात्य देश इंग्रजी भाषेचा वापर केवळ व्यापार आणि उद्योगासाठी करतात. परंतु दैनंदिन व्यवहारात मात्र त्यांच्या बोली भाषेतच होतात. आपण मात्र पाश्चात्य अनुकरण करताना आपल्या मायबोलीचा, आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आणि संस्काराचा त्याग करत चाललेलो आहोत.

पुढे बोलताना त्यांनी बाराखडी माणसाच्या शारीरिक विकासावर कशी अवलंबून आहे ते सांगितले. जन्माला आल्यानंतर ओठ, दात, टाळू यांचा विकास झालेला नसतो म्हणून सुरवातीला केवळ अ, आ , इ, ई .... असे कंठस्य उच्चार बाळाला बोलता येतात. आणि म्हणूनच मुल सर्वात आधी 'आई ' हा शब्द उच्चारते. स्तनपान करताना ओठात ताकद येते आणि मग प, फ, ब ....यासारखे ओष्ठय उच्चार जमू लागतात. म्हणून मग ' बाबा, मामा ' असे उच्चार जमतात. मग दात आकार घेतात. जीभ दाताला अडू लागते आणि मग त, थ, द,.... हे उच्चार येतात. बाळाची टाळू म्हणजेच मस्तिष्क बिंदू भरतात. जसजशी ती टाळू भरात जाते तसतसे च, छ, ज..... यासारखे कंठ तालस्य उच्चार येतात.

आपणही थोडा विचार केला तर खरेच मराठी जगातील अन्य कोणत्याही भाषेपेक्षा श्रेष्ठ आहे. हे सहज लक्षात येईल. w, wa, v, va या साऱ्यांचा उच्चार व होतो. तर वा साठी waa, vaa  दोन्ही बरोबर मानावे लागते. मराठीत तसे नाही. ' व ' ला दुसरा कोणताही पर्याय नाही. ' व ' लाच कशाला मराठीत कोणत्याही एका अक्षराला दुसरा पर्याय नाही. खरेतर मराठी, संस्कृत या जागतिक भाषा व्हायला हव्यात. ते तर दूरच परंतु आम्हाला मराठीसोबत इंग्रजी शब्द मिसळण्यात धन्यता वाटते.

संतोष कुलकर्णी हे व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संचालक. गायक वादक सगळे त्यांचे विद्यार्थी. सुगम संगीताचा कार्यक्रम सुरु झाला. इतर प्रमुख पाहुण्यांसारखे मुख्य कार्यक्रम पार पडल्यावर राहुलजी निघून गेले नाहीत. प्रेक्षकांच्या समोर बसलोत तर आपल्या धिप्पाड शरीरयष्टीमुळे मागे बसलेल्या रसिकांना अडथळा होईल म्हणून व्यासपीठाच्या एका बाजूला खुर्ची टाकून बसून राहिले. तासभर कार्यक्रम ऐकल्यावर झुंजूरक भोजन करून मार्गस्थ झाले.

संस्कार भारती एक चळवळ उभी करू पाहते आहे. काही दशकांपूर्वी अशीच दिवाळी पहाट सुरु झाली होती. तो संस्कार आता रुजला आहे. दिवाळीतले तीन चार दिवस दिवाळी पहाटचे अनेक कार्यक्रम होतात. रसिकही
भल्या पहाटे उठून स्नानादी उरकून कार्यक्रमाला हजर राहतो. धनुर्मासाचा आणि त्यानिमित्त झुंझुरक भोजनाचा हा उत्सवही समाजात रुजेल आणि घराघरातून झुंजूरक भोजन आकार घेईल. आज व्हाट्सअपवर सकाळी भरपूर नाश्ता करा. असा मेसेज येतो. तो आपण सगळ्या गावभर फिरवतो. फॉरवर्ड करतो. परंतु सकाळी पोटभर जेवण हि आमची संस्कृती आहे. तिचा आम्हाला विसर पडला आहे म्हणून अशा मेसेजचं आम्हाला अप्रूप वाटतं आहे.

No comments:

Post a Comment