Tuesday, 2 April 2019

असा 'मनोहर' होणे नाही No Politician will born like Manohar Parrikar

अलिकडे देशात कोणतीही घटना घडली कि सोशल मिडिया मुळे ती काही क्षणात वाऱ्यासारखी सर्वोमुखी होते. मी काल एका कवी संमेलनात होतो. कवींच्या कविता ऐकता ऐकता सहज फेसबुक ओपन केले तर. मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या अनेक पोस्ट दिसल्या. खरे काय हे जाऊन घेण्यासाठी गुगल केलं. तर condition of Manohar Parrikar is extremely critical असेच दिसले. घरी पोहचलो. टीव्ही बंद होता. ' मनोहर पर्रीकरांचं काय झालं माहित आहे का तुला ? असं पत्नीला विचारलं तर 'गेले’ असं तिने जड स्वरात सांगितलं. घाई घाईने टिव्ही लावला. तर
सगळीकडे तेच. पर्रीकरांच्या जुन्या आठवणी, त्यांचे स्कुटरवरचे फोटो. शोकाकुल जनसागर. जाम disperse झालो. जेवण्याची इच्छा राहिलेलीच नव्हती. त्वरेने फेसबुकवर श्रद्धांजलीपर पोस्ट लिहिली. कसा बसा जेवलो. पण असा नेता पुन्हा होऊ शकतो का? हा प्रश्न स्वस्थ बसू देईना.

त्यांचा जन्म आणि कारकीर्द याविषयी सांगावे असे मीडियातून खूप काही सांगून झाले आहे. तरीही १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्याच्या म्हापशा गावातील त्यांचा जन्म. गोव्याच्या लोयोला हायस्कूल या शाळेतलं शिक्षण. इंजिनिअरिंगच आणि IIT च मुंबईतील शिक्षण. या बाबींची दखल घ्यायलाच हवी. IIT शिक्षण घेऊनही त्यांचं मन नौकरीत, व्यवसायात रमल नाही. संघाच्या संस्कारामुळे असेल अथवा त्यांचा समाजसेवकाचा पिंड असल्यामुळे असेल उच्च्शिक्षित असूनही ते समाजसेवेत आणि राजकारणात रमले. स्वच्छ दृष्टिकोन ठेवून राजकारण केले. भाजपला राज्यात उर्जितावस्था प्राप्त करून दिली. आणि वयाच्या पन्नाशीत गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळेच वयाच्या पन्नाशीत मुख्यमंत्री होणारे जे काही फार थोडे नेते आहेत त्यात मनोहर पर्रीकर यांचं नाव आग्रक्रमाने घ्यावं लागेल. माणूस साधा म्हणजे किती साधा असावा. त्यांच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा पाहिला तेव्हा. सूटबूट टाळून साध्या पॅन्ट शर्ट मध्ये वावरणाऱ्या पर्रीकरांना पाहताना अचंबित व्हायला झाले. सेलिब्रेटीची सर्व कवच कुंडल काढून ठेवून सामान्य माणसाप्रमाणे त्यांना समाजात वावरताना पाहिलं कि उर अभिमानाने भरून येतो. त्यांचं स्कुटरवरून फिरणं असो, सायकलवरून फेरफटका मारणं असो. हॉटेलात सामान्य नागरिकांप्रमाणे सहकुटुंब भोजन घेणं असो. सगळ्याच गोष्टी आदर्शवादाचे मापदंड म्हणून देशातल्या प्रत्येक नागरिकाने स्वीकारायला हवेतच पण प्रत्येक नेत्याने नक्कीच स्विकारायला हवेत.     

मनोहर पर्रीकर राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री होण्यापूर्वी काँग्रेसच्या राजवटीतील खाण माफियांनी गोवा अक्षरशः पोखरून काढला होता. अशावेळी मनोहर प्रर्रीकरांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आणि खाण माफियांना वेसण घातली. मुख्यमंत्री असूनही स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहणारे पर्रीकर कुठे आणि पदावर नसल्यामुळे सरकारी बंगला खाली करायला भाग पाडले म्हणून त्या बंगल्याची नासधूस करणारे अखिलेश यादव कुठे? स्वतःची संपत्ती वाढावी, पुढच्या पिढ्यांची राजकीय कारकीर्द सुरक्षित व्हावी म्हणून कित्येक नेते जीवाचा आटापिटा करतात. परंतु मनोहर पर्रीकर यांनी मात्र त्यांच्या मुलांना बोट धरून राजकारणात आणण्याचा अट्टहास केला नाही. मुलांना मुलांच्या मार्गाने जाऊ दिले. राजकारणात या म्हणून पायघड्या घातल्या नाहीत. त्यामुळेच मनोहर पर्रीकर हे खऱ्या अर्थाने जनसेवक म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व होते असे म्हणावे लागेल. सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहिलेल्या पर्रीकरांना तर अनेकांनी पाहिलं आहे. आमच्याकडचा साधा आमदार देखील संरक्षणासाठी दिलेला पोलीस सोबत घेऊन फिरत असतो. पण पर्रीकर मात्र बऱ्याचदा संरक्षणाशिवाय वावरत असत.

मनोहर पर्रीकर दिल्लीत आले आणि संरक्षण मंत्री झाले तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो. कारण अवघे दोन खासदार असलेल्या राज्यातला एक नेता दिल्लीत येतो. आणि दिल्लीतील नेतृत्व संरक्षण पदासारखं अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली जाते. त्यावेळी तर मला पर्रीकर यांच्याविषयी प्रचंड आदर वाटला. पण त्याच बरोबर भाजपमधील शिस्त सुद्धा दिसून आली. कारण अन्य कोणत्या पक्षात दोन खासदार असणाऱ्या राज्यातील नेत्याला देशाचे संरक्षणपद मिळाले असे मला वाटत नाही. त्यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. आणि ती त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली. केवळ पेलली असे नव्हे तर वन रँक वन पेन्शन सारखे वर्षानुवर्षे धूळखात पडलेले निर्णय हातावेगळे केले. त्यांच्या कारकालात झालेला सर्जिकल स्ट्राईक संपूर्ण जगाने पाहिला आणि त्याची नोंद करून ठेवली. त्यांच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीय सैन्याचा जागितक स्तरावर एक दबदबा निर्माण झाला. मिलटरी आणि सिव्हिल सीमांवरील अनेक प्रश्न त्यांनी निकालात काढले.

एक सामान्य माणूस म्हणून मी जेव्हा मनोहर पर्रीकर आणि इतर नेते यांची तुलना करतो तेव्हा प्रत्येक नेत्याने जर पर्रीकरांचा आदर्श घेतला तर सामान्य माणसाचे जगणे किती सुसह्य होईल याची जाणीव होते. कॅन्सरसारख्या आजाराने त्रस्त असतानाही नाकातल्या नळ्यांसह हजर राहणारा, अर्थसंकल्प सादर  करणारा मुख्यमंत्री पुन्हा कधी दिसेल. दिसेल असा लढवय्येपणा अन्य कुणाच्या ठायी. हे सगळं मला आठवत होतं आणि माझ्या मनात पुढील कविता आकार घेत होती.
                                                           असा 'मनोहर' होणे नाही

गंज जयाला लागू शकतो, असे कुठेही सोने नाही
सोन्याहून शुद्ध असावा, असा 'मनोहर' होणे नाही

कधी ज्याच्या पुढे कुणाला, शक्य जाहले जाणे नाही
श्वासामध्ये देश हो ज्याच्या, असा 'मनोहर' होणे नाही

कर्तव्याच्या पुढे वाटले ज्याला मोठे नाणे नाही
सलाम वाटेल ज्यास करावा, असा 'मनोहर' होणे नाही

घोडा पुढे हो आर्दशाचा, शक्य तयाच्या नेणे नाही
मानवरूपी देव जणू तो, असा 'मनोहर' होणे नाही

कशी हालली झाडावरची, आज जराही पाने नाही
अश्रू ढाळीत कोकीळ बोले, असा 'मनोहर' होणे नाही

2 comments:

  1. खरेच महान विभुती होते मनोहरजी...

    ReplyDelete
    Replies
    1. परंतु आपल्या जनतेला महान व्यक्तींच्या मागे धावण्यापेक्षा स्वार्थाच्या मागे धावण्यात अधिक रस वाटतो.

      Delete