Wednesday, 29 May 2019

वाहतूक पोलीस कि लुटारू ?


खरंतर या विषयावर खूप लिहून झालं आहे. पण तरीही मी लिहितो आहे. हा फोटो पुण्यातल्याच एका चौकात घेतला आहे. वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस हि शाखा अस्तित्वात आली. पूर्वी चौकाचौकात हात दाखवून वाहतुकीचं नियंत्रण करणारे पोलीस दिसायचे. त्यांच्यासाठी चौकात मध्यभागी स्टँडिंग पोस्ट असायचे. आता ते कुठेच दिसत नाहीत. आणि
पोलीस सुद्धा वाहतुकीचे नियंत्रण करताना नाही दिसत. झुंडीने रस्त्यावर येणे आणि नियमांचा आधार घेऊन खंडणी वसूल करणे हेच वाहतूक पोलिसांचे प्रमुख काम असल्यासारखे वाटते. दुचाकीस्वार हे त्यांचे सर्वात आवडते. रस्त्यावर उभे रहायचे. दहा वीस दुचाकीस्वार अडवायचे. बघू लायसन. पीयूसी दाखव. हेल्मेट का नाही लावले? , कधीच कागदपत्र कुठे आहेत? प्रत्येकजण कुठल्याना कुठल्या प्रॉब्लेममध्ये सापडतोच. मग मोठ्या दंडाची भीती दाखवून शंभर, दोनशे रुपयाची चिरीमिरी उकळली जाते.

मुळात आरटीओ मधून लायसन काढणे, कोणतीही कागदपत्र मिळविणे हि इतकी कठीण बाब आहे कि पासपोर्ट आणि व्हिसा मिळवणे त्यापेक्षा कितीतरी सोपे. माझे स्वतःचे लायसन एक्स्पायर होऊन तीन वर्ष झाले. पण ते रिन्यू करायला जाण्याची माझी मुळीच इच्छा होत नाही. कारण एकदा गेल्यावर काम होईल याची शाश्वतीच नाही. माशाची प्रतीक्षा करत तळ्यात ध्यान लावून बसणाऱ्या माशाप्रमाणे नो एंट्रीच्या दुसऱ्या टोकाला उभे राहणे हे पोलिसांचे आणखी एक आवडते काम.

हेल्मेट वापराचा आग्रह हाताबाहेर ठीकच आहे ना. आणि न्यायालयीन आदेशानुसार शहराबाहेर हायवेवरच हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे. पण पोलीस मात्र संपूर्ण शहर त्यासाठी वेठीस धरणार. आता तर काय म्हणे दुचाकीसोबत हेल्मेट खरेदी करणे बंधनकारक करणार? म्हणजे हेल्मेटचा वापर नव्हे खप महत्वाचा आहे का? कारण हेल्मेट खरेदी करणारा प्रत्येकजण त्याचा वापर करेल याची काय खात्री? लोकांना नियम माहित असतात. परंतु तुम्ही शासकीय यंत्रणेला नियम शिकवायचा ( दाखवायचा ) प्रयत्न केलात तर मग तुमची शंभरी भरलीच म्हणून समजा. साहेब, साहेब करत गयावया केली तर एकवेळेस होईल तुमची सुटका. पण नियम दाखवायचा प्रयत्न केलात तर भरलेच दिवस. फास आणखी घट्ट होणार असेच समजायचे.

अनेकांना ऑफिस गाठायचं असतं. घरी लवकर पोहचायचं असतं. म्हणून कोणीही पोलिसांशी वाद घालण्याच्या फंदात पडत नाहीत. आणि पोलीस नेमका त्याच गोष्टीचा फायदा उचलतात. आम्ही विश्वास नांगरे पाटील आणि पोलीस दलातील अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या कहाण्या ऐकतो. मग जनतेची होणारी हि लूट त्यांना दिसत नाही. या लूटीला आळा घालावा असे कोणालाही वाटत नाही का?


No comments:

Post a Comment