Wednesday 29 May 2019

सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद

मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण  गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '


महिना झाला या भेटीला. काव्यसंग्रह वाचून हातावेगळा करणं  तसं एका बैठकीचं काम. पण मला सखी सांगाती केवळ वाचायचा नव्हता. अभ्यासायचा होता. आज थोडा उद्या थोडा करतात महिना लागला. समांतर इतर लेखन वाचन चालू होतेच. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेले माझे मोदी मिशन सुरु होत. पण आता थोडी उसंत मिळाली आणि लिहायला बसलो.

समीक्षा करायची या अनुषंगाने कोणताही काव्यसंग्रह वाचताना मी पेन्सिल घेऊन बसतो. जे जे चांगले तेथे खुणा करतो. परंतु सखी सांगाती वाचताना सगळीकडे खुनांचा कराव्या लागल्या. आणि पाहता पाहता मला सखी सांगाती मनापासून भावला. हा संग्रह म्हणजे थांबवायला हवं म्हणून थांबवलेलं एक अखंड काव्य आहे. हा संग्रह म्हणजे पती पत्नीमधला संवाद आहे. भले हा संवाद गोविंद काळे आणि त्यांच्या पत्नीमधला वैयक्तित संवाद असेल. पण तो विश्व रूप धारण करतो. पती पत्नी मधला संवाद कसा असावा याचा एक आदर्श आपल्या समोर ठेवतो.

हा काव्यसंग्रह लिहिताना आणि विवाहापूर्वीच्या भावनांचं चित्रण करताना प्रिय आणि प्रिये असा परस्परांचा उल्लेख करण्याचं भान कवीला आहे. तर विवाह झाल्यावर मात्र काव्यसंग्रहाचे नायक आणि नायिका परस्परांचा सखे आणि धनी असा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्यात रुजलेली संस्कृतीची पाळंमुळं दिसून येतात. लग्न म्हंजे काय तर थोर मोठ्यांनी दोघांना एका समईत टाकणं, एकानं तेल तर एकानं वात होणं आणि भवतालाला प्रेमाचा, आपुलकीचा प्रकाश देणं अशी विवाहाची व्याख्या त्यांनी काव्यसंग्रहाच्या सुरवातीलाच केली आहे.

बायकोनं रबरासारखं असायला हवं असं गोविंद काळे सांगतात. म्हणजे ते पुरुष सत्ताक समाजवेस्थेचा पुरस्कार करतात असं नव्हे. एका ठिकाणी ते त्यांच्या पत्नीची माफीही मागतात. कारण त्यांनी तिच्या स्वप्नात त्यांचे रंग भरण्याचा गुन्हा केला असे कवीला वाटते. पण त्यांची पत्नी मात्र समाधानी आहे.

कधी ऐरण झालीस
घाव चुकला झेलण्या
सदा हसत राहिली
मनी आनंद पेरण्या.

या ओळींमधून कवीने आपल्या पत्नीबाबत मनात असलेल्या भावना अत्यंत उत्तम रीतीने व्यक्त केल्या आहेत. एकमेकांना साथ दिल्यामुळे आपण नीटपणे मार्ग काढू शकलो. संकटांची वादळे झेलत पैलतीर गाठू शकलोत याची जाणीव दोघांनाही आहे.

कधी तुमी आग हुताव तर कधी मी
कधी तुमी पाणी हुताव तर कधी मी

संसारात दोघांनी एकाच वेळी आग होऊन चालत नाही. एकजण  आग होत असेल तर दुसऱ्यानं पाणी व्हायलाच पाहिजे. असा संदेश हि ग्रामीण भाषा बोलणारी काहीशी आडाणी वाटणारी नायिका सांगते तेव्हा घटस्फोट घेणाऱ्या शिकल्या सावरलेल्या जोडप्यांना हे शहाणपण का नाही सुचत असा फार मोठा प्रश्न पडतो. स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते पण पुरुष सुद्धा क्षणाचा नवरा आणि अनंत काळचा बाप असतो याची जाणीव नायिकेला आहे. स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला अनेक नात्यांचे पदर असतात हे जगमान्य आहे. पण पुरुषाच्या व्यक्तिमत्वालाही बाप, भाऊ, मित्र, गुरु अशा अनेक नात्याचे पदर असतात याची नायिकेला जाणीव आहे.

भाषेचं वेगळेपण. हे या काव्यसंग्रहाचं आणखी एक वेगळेपण. ग्रामीण भाषेतले कितीतरी वेगळे शब्द, वाक्यप्रचार, म्हणी प्रत्येक पानावर भेटतात. एक गोष्ट मात्र कवीच्या लक्षात का आली नाही ते मला कळले नाही. काव्यसंग्रहाची नायिका फारशी शिक्षित नसावी. ग्रामीण भागातली असल्यामुळे तिच्या भाषेचा बंध ग्रामीण असावा. परंतु सुशिक्षित, उच्च पदावर कार्यरत असलेल्या कवीच्या आयुष्यात नायिका आल्यावर कालानुरूप तिच्या भाषेत नक्की फरक पडला असेल. तो बदल कवीने टिपला असता तर अधिक उचित झाले असते. परंतु त्यामुळे कविच्या भावनेला बाधा पोहचत नाही आणि म्हणूनच काव्यसंग्रह अत्यंत वाचनीय होतो.

गोविंद काळे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

विजय शेंडगे, पुणे 

No comments:

Post a Comment