Monday 6 April 2015

शिणल्यावरती मात्र सख्या रे .........

परवा असाच विचार करत बसलो होतो. आयुष्य जुनं कधी होतं ? तिचा सहवास अथवा त्याचा स्पर्श नकोसा का वाटू लागतो ? सेक्स हि एकच भावना माणसाला जोडून ठेवते का ? सेक्समधलं नाविन्य संपलं कि आपल्या
जोडीदाराचा आपल्याला विट येतो का ? पण नाविन्य म्हणजे काय ? आयुष्यात जेव्हा कधी पहिल्यांदा गोड चव जिभेवर रेंगाळते त्याक्षणापासून ती हवीशी वाटू लागते. साखर तीच असते तिच्या गोडीतही कधी फारसा फरक नसतो. तरीही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला साखरेचा वीट येत नाही.

तेच मिठाचं. पहिल्या क्षणापासून ते शेवटापर्यंत मिठाची चव एकच. खारट. पण कशाला रोज रोज तीच चव म्हणुन एखादे दिवशी आपण जेवणात मीठ टाकायचं थांबवत नाही.

' आंबट ' हा शब्द उच्चारला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. इतकी ती चव आपल्या परिचयाची झाली आहे. झाडाला लागलेल्या चिंचा आणि कैऱ्या पाहुन कुणा स्त्रीला मोह होत नाही !  प्रत्येकवेळी तीच तर चव असते ना चिंचेची आणि कैरीची. मग का होतो मोह ?

तेच तिखटाचं. तिखट खाल्लं कि नाकातून पाणी येतं. कानाच्या पाळ्या लाल होतात. तरीही अनेकांना रस्सा झणझणीतच हवा असतो. का ? तेज , कोल्हापुरी हे शब्द पावलो पावली आपल्या कानावर पडतात.  

पण आयुष्याच्या सरत्या वाटेवर आपल्याच प्रिय व्यक्तीचा सहवास आपल्याला नकोसा वाटतो. का होतं असं ? कारण तिच्या केसांना एक गंध असतो आणि त्याच्या घामाला एक दर्प असतो याचा सरत्या दिवसात आपल्याला विसर पडतो. काया पुलकित होणं, अंगावर रोमांच उभे रहाणं, अंग मोहरनं हे सारे शब्दप्रयोग आपल्या ओळखीचे असतात. प्रत्यक्ष जीवनात किती जणांना त्याचा अनुभव येतो ? त्याचा स्पर्श झाल्यानतर खरंच तिची काय मोहरते का ? खरंच तिच्या अंगावर रोमांच उभे रहातात का ? शंभरातल्या एकानं तरी असला मोहर ओंजळीत घेतलेला असतो का ?

ती कितीदा गुणगुणते घरात आणि तो किती वेळा किशोरकुमार होतो ? ती कितीदा खळखळून हसते आणि तो कितीदा तिचं हसू ओठांनी टिपून घेतो ? तो ऑफिसातून घरी येतो तेव्हा ती एकतर दिवसभराचे हिशोब त्याला सांगते नाहीतर शरीराच्या कुरबुरी. तोही आपण त्या गावचे नाही अशा अविर्भावात बातम्यांमध्ये अथवा वर्तमानपत्रात रमतो. आणि मग आयुष्य जड होऊ लागतं. पण आपण आपल्या आयुष्यातला अल्लडपणा,अवखळपणा, खटयाळ वृत्ती, आपल्यातला मिस्किलपणा कधी हरवूच दिला नाही तर ? तर आयुष्य कधीच बेचव होणार नाही.

सेक्स हि गरज असते …… भुक असते …… कि भावना असते ? माझ्या मते ती भावना असते. वाईट वाटणे हि भावना झाली तर त्यामुळे रडुन अश्रूंना वाट करून देणे हि क्रिया झाली. राग हि भावना झाली तर रागापोटी आदळआपट करणे हि त्या त्या रागाचे शमन होण्यासाठी करण्यात आलेली क्रिया झाली. तसंच सेक्स हि भावना झाली. आणि त्या भावनेच्या निर्मितीनंतर पती - पत्नीचं मिलन हि त्या भावनेचा निचरा होण्यासाठी करण्यात आलेली क्रिया झाली.

पण रात्री घरातली सगळी आवराआवर झाल्यानंतर ती जेव्हा बिछान्यावर अंग टाकते आणि त्याचा हात उशाला घेते तो कशासाठी ?

उशी नसते का घरात ?

असते ना !

मग त्याचाच हात का हवा असतो उशाला ?

सेक्स असतो का त्या स्पर्शात ?

मुळीच नाही.

पण त्या स्पर्शात दिवसभराचा शीण हलका करण्याची ताकद असते एवढं मात्र नक्की.

आयुष्य बेचव वाटू लागलेल्या सगळ्यांसाठी हि कविता………………….                   

अल्लड  व्हावे
अवखळ व्हावे
खटयाळ व्हावे
तुझ्यासवे.

तुझ्यासवे मी
वणवण करता
कुशीत घ्यावे
स्वप्नं नवे.

वैशाखाच्या
वणव्यानंतर
श्रावण अवघा
चिंब हवा.

प्रेमाच्या अन
मम तृष्णेला
अळवावरचा
थेंब हवा.

तुझ्याचसाठी
पुन्हा पुन्हा मी
साज करावा
नवा नवा.

या साजाला
मात्र सख्या रे
स्पर्श केवळ
तुझा हवा.

स्मरते सारे
अजून मागचे
आठवणींचा
डोळ्यात थवा.

शिणल्यावरती
मात्र सख्या रे
हात उशाला
तुझा हवा.


   

4 comments:

  1. wah...........!!!!
    khup chan lihle ahe.

    ReplyDelete
    Replies
    1. नीलजी अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार.

      Delete
  2. छान कविता! आता हीच कविता ’त्याच्या’ नजरेतून लिहून पहा....एक नवीन पैलू सापडेल कदाचित तुम्हाला ...अन आम्हालाही.....
    पण खरेच छोट्या गोष्टींतला आनंद आणि नाविन्य शोधायला सुद्धा एक मानसिकता लागते जी बरेच जण वाढत्या वयाबरोबर हरवून बसतात.

    ReplyDelete
    Replies
    1. आंबट - गोड अभिप्रायाबद्दल खुप आभार. खरंतर कोणतीही कविता मी कधीही जाणीवपुर्वक लिहित नाही. त्या कवितेची मनाच्या कोपर्यात कुठेतरी एक ठिणगी उडते. आणि त्या ठिणगीचा वणवा होत संपूर्ण कविता आकाराला येते. असो तरीही आपण दिलेले शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करीन. इतक्या साध्या गोष्टीला शिवधनुष्य म्हणण्याचे कारण असे कि स्त्रियांच्या भावने इतक्या पुरुषांच्या भावना तरल नसतात. हळूवार नसतात. पण प्रयत्न करीन.

      Delete