Wednesday, 29 April 2015

जय हो IGP

नगर शहराच्या बाहेर अत्यंत एकांतात डोंगराच्या खबदाडीत एक हॉटेल होतं. साई रिसोर्ट. त्या हॉटेलच्या पार्किंग झोनमध्ये एकामागुन एक तीस चाळीस कार लागल्या. कारमधून उतरलेला शंभरच्या आसपास माणसांचा घोळका हॉटेलच्या लॉनवर जमा झाला. त्यातला एक तरुण पुढं आला आणि त्यानं ' जय हो IGP ' अशी घोषणा दिली. आणि माझ्या डोळ्यासमोर इसीस ( ISIS ) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया उभ्या राहिल्या. मला प्रश्न पडला IGP हे कशाचं संक्षिप्त रूप ?
पण माझं अज्ञान कोणाजवळ प्रगत करण्यापुर्वीच IGP हे आमच्या इंदिरा गांधी पॉलीटेक्निक या डिप्लोमा कॉलेजचं संक्षिप्त रूप आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि धीरगंभीर, भारदार आवाजात जय हो IGP अशी घोषणा करणाऱ्या सुरेंद्र काकडेचा मला अभिमान वाटला.

हे लिखाण आहे आमच्या कॉलेजच्या स्नेहमेळाव्याचं चित्रण करणारं. हे सारं लिखाण एका भागात संपणार नाही. कमीत कमी दोन भाग नक्की लिहावे लागतील. या लिखाणाला थोडसं मर्यादित स्वरूप आल्यामुळे वाचकांना हे लेख वाचावेसे वाटणार नाही. वाचकहो तरीही हे लेख पुर्ण वाचा. कारण हा काही केवळ एका कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचा वृतांत नाही. हि यशोगाथा आहे कमी गुण असल्यामुळे आघाडीच्या आणि मान्यता प्राप्त शासकीय कॉलेजांनी नाकारलेल्या तरुणांची. हि यशोगाथा आहे माणसात नसलेल्या गावाबाहेर वसलेल्या कॉलेजात शिक्षण घेतलेल्या मुलांची. हि यशोगाथा आहे अपयशाच्या खुणा पुसुन यशाला कवेत घेणाऱ्या तरुणांची. हि यशोगाथा आहे मावळतीच्या खुणांना झुगारून पुन्हा तरुण होणाऱ्या माणसांची.

थोड्या थिडक्या चक्क अठ्ठावीस वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटत होतो.

मी पुण्यातच होतो. आठ दहा दिवसापुर्वी मला किशोर लवंगरेचा फोन आला.  " विजु , अरे आपलं गेटटुगेदर आहे. येणार आहेस का ? "  

" कुठे ? " मी.

" नगरला. "

" कोणी अरेंज केलंय ? "

" माहित नाही. पण बहुदा नगर ग्रुपने. "

" तू जाणार आहेस ? "

" हो. "

" ठिक आहे. मी पण येईन. "

" कधी आहे गेटटुगेदर ? "

" २५ तारखेला. "

त्यानंतर दोनतीन दिवसात मी नगरपासुन जवळ असलेल्या माझ्या शेतावर गेलो.  आठ दहा दिवस हा हा म्हणता संपले. २४ ला मी पुन्हा किशोरला फोन केला. तो येत असल्याची खात्री करून घेतली. त्याच्याकडूनच संध्याकाळी पाचला जमण्याच ठरलं आहे हे कळालं. मी आणखी एक दोघांना फोन केला. ते यांर असल्याचंही कळालं. त्यातल्याच एकाला मी मला नगरमध्ये कलेक्ट करायला सांगितलं.

शनिवार उजाडला. शेतावरील गड्याला सूचना देऊन मी दुपारी बारालाच गावात एसटीच्या थांब्यावर आलो. तास दीड तास गावातच घालवला. पुण्यातली मंडळी निघाली असल्याची खात्री केली. मी नगरच्या एसटीत बसलो. नगर उतरलो. पुण्यातून येणारा राजू वर्मा मला कलेक्ट करणार होता. पण त्याला नगरला पोहचायला तासभर लागणार होता. बसथांब्यावरच टाईमपास केला. राजु वर्मा पोहचला. होंडाची कार. काळ्या रंगाची. सोबत गोटया. मी मागच्या सिटवर बसलो. राज्याचा अक्षरशा फुटबॉल झालेला. डोळ्यावर काळा गॉगल.

" विज्या बोर झाला असशील ना. किती सिगारेट संपवल्या. " गोटया. 

" नाही रे कमी केल्यात. ओढायची का ? " म्हणत मी गोट्याक्डे सिगारेट दिली.

" राज्या तु तर डॉन दिसतो आहेस. "

" डॉनच आहे विज्या आपण. "

मग काय गप्पांना रंग आला. काय चाललंय , कोणाची मुलं काय करतात,  वैगेरे चर्चा सुरु झाल्या. हॉटेल औरंगाबाद रोडला वांबोरी फाट्याला होतं. आम्हाला निश्चित ठावठीकाणा माहित नव्हता. त्यामुळे  मध्येच आयोजकांना फोन करत आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो. शहरापासुन दहाएक किलोमीटरवर वांबोरी फाटा दिसला. मागून येणाऱ्या गाड्यांसाठी आम्ही तिथे थांबलो. आणि फाट्यावरच फेक्स लागला होता. 
                                                                                 
                                                                                    ………….     ( पुन्हा भेटू पुढल्या भागात )    

                                                     

                                                                                                             ( पुन्हा भेटू पुढल्या भागात )  

4 comments:

  1. पुरुषोत्तम देसाई29 April 2015 at 20:54

    पुढच्या लेखाची वाट पहावी सुरवात. उत्तम.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार पुरुषोत्तमजी.

      Delete
    2. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद विलासराव जी.

      Delete