Thursday, 22 May 2014

Sex of Snakes : सापांचा शृंगार

मी अनेक प्राण्यांचा समागम खूप जवळून पाहिलाय. पण सापाची नर आणि मादी एकमेकांशी ज्या ओढीनं रत होतात ती ओढ आणखी कुणातही पहिली नाही.  मी माझ्या शेतातल्या विहिरीजवळ केलेलं हे चित्रण.  लेख वाचाच पण चित्रीकरण पूर्ण पहा. कारण चार मिनिटांच्या या चित्रिकरणातले दोन मिनिटं सापांच्या जवळ पोहचून योग्य ती पोझिशन घेण्यात गेले आहेत.


साप म्हणलं तरी आपली भंबेरी उडते. एकेकाळी माझी सुद्धा उडायची. पण आता तीन वर्ष शेती करतोय. महिन्या दोन महिन्यातून साप दिसतोच. तो बऱ्याचदा माझ्या मनगटापेक्षा अधिक जाड आणि सहा - सात फुटांपेक्षा अधिक लांब असतो. मी आजपर्यंत साप कधीच मारला नाही. पण साप पहाणं आणि सापांचा शृंगार पहाणं यात काय फरक आहे हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं.

मराठी भाषेची गंमत पहा. राधेच्या आणि कृष्णाच्या शृंगाराला  ' रासक्रीडा ' म्हणतात. गाय-बैल, शेळी-बोकड यांच्यातल्या शृंगाराला ' उडणं ' म्हणतात. पण सापांच्या शृंगाराला ?

तुम्हाला हे माहित असेल पण मला कालपर्यंत माहित नव्हतं. मी मराठी भाषेचा अभ्यासक ??? नाही अभ्यासक नाही म्हणता येणार. मराठी माझी मातृभाषा आहेआणि तिची मला गोडी आहे. पण तरही सापांच्या शृंगाराला काय म्हणतात हे मला परवा पर्यंत माहित नव्हतं. माझ्या दृष्टीनं त्या दोघांचा शृंगार किंवा संभोग आणि अगदीच सरळ सरळ बोलायचं झालं तर Sex चालला होता. आठ फुटांहून अधिक लांबीचे आणि मनगटाहून अधिक जाडीचे दोन साप असे एकमेकांशी झुंजताहेत हे कळल्या नंतर तिथे बघ्यांची गर्दी झाली होती. त्यात लहान - मोठे , तरुण -प्रौढ , म्हातारे - कोतारे , स्त्री  पुरुष सारेच होते. सगळे माझ्या जवळचे म्हणजे माझेच चुलत भाऊ, पुतणे , पुतण्या , चुलत्या ( शहरी भाषेत काक्या ) , भावजया होत्या. मी अधिकाधिक जवळ जाऊन चित्रिकरण करण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात आलेली माझी साठीची चुलती म्हणाली, " बघंय, काय खेळतेत ? बया कसं असतंय त्या त्या
जीवाला !"    

तेव्हा मला कळालं सापांच्या शृंगाराला किंवा संभोगाला ' खेळ ' म्हणतात. शहरात रस्त्या रस्त्यावर गारुडी करतात तो सापांचा खेळ नसतो सापांच्या आयुष्याचा खेळ असतो. तो खेळ जीवघेणा असतो आणि हा खेळ समाधीकडे नेणारा. कारण यात असते राधा कृष्णाची रासक्रीडा. 




No comments:

Post a Comment