Sunday, 19 April 2015

मला भेटलेला नाच्या

नटरंग सिनेमा कुणाला आठवत नाही. पोटापाण्यासाठी आणि कलेच्या नादात तमाशाचा फड उभारणाऱ्या गुणाची हि कहाणी. कलेच्या नादात नाच्या होणाऱ्या गुणाची कहाणी. सुडापोटी बलात्कार सोसणाऱ्या नाच्याची कहाणी. मलाही एक नाच्या भेटला. पण नाच्याच. त्यात नटरंग मधला गुणा नव्हता. त्या नाच्याची हि वास्तविकता.



मागच्या महिन्यात गावाकडची जत्रा होती. कुणीतरी मला सांगितलं निरंकार उपवास धर म्हणुन मी उपवास धरलेला. चहा सोडा पाणीसुद्धा प्यायलो नव्हतो. देवाला नैवेद्य दाखवुन बारा वाजता उपवास सोडायचा होता. जत्रेसाठी पुण्याहून घरची मंडळी येणार होती. नैवेद्य त्यांच्याकडे होता. त्यांना यायला उशीर होणार होता. अडीच तीन वाजणार होते. भुकेन माझी आतडी पिळवटून निघाली होती. तहानेमुळे घसा कोरडा पडला होता. सहाजिकच मी देवाला नारळ फोडुन आणि देवाचं दर्शन घेऊन उपवास सोडायचं ठरवलं. तसं गाडीतून येणाऱ्या बायकोशी बोलणं झालं.

मी नारळ घेऊन देवाला गेलो. देवाला नारळ फोडला. देवाचं दर्शन घेतलं. पुज्याऱ्यानं नारळपाणी आणि मीठ तळावर ठेवलं. काही मंत्र म्हटले आणि तळहातावरच्या मीठासह ते नारळपाणी प्राशन करण्याचा मला आदेश दिला. आता मी अन्न ग्रहण करू शकणार होतो. पण काय खाणार ? घरचे अजुनही दोन एक तास पोहचणार नव्हतेंल तर प्रचंड भूक लागलेली.

शेवटी जत्रेतल्या एका तंबूवजा हॉटेलात गेलो. भजीपाव सांगितला. शेजारच्या एका टेबलावर एक पेताड बसलेला. काही तरी बरळत होता. माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. पण मी त्याला झटकून टाकत होतो.

माझ्या समोरच्या टेबलावर एक इसम बसलेला. अंगात चट्ट्यापट्टयाचा पायजमा. वर कळकट रंगीत बनेल. मानेपर्यंत वाढलेले केस. भादरलेल्या मिशा. थोडेसे नको वाटावेत असे हावभाव. मला वाटलं तो त्या हॉटेलचा आचारी असावा. तो दुसऱ्या बाकड्यावर बसलेला दारुडा त्याच्याशी काही बोलत होता. पण लक्ष माझ्याकडे. मधेच माझ्याकडे हसून पहायचा. ते हसु मी टाळायचो. तरीही त्यांनं माझ्याशी संवाद साधला -  " कुठले साहेब तुम्ही ? "

" इथलाच. " मी आपलं उत्तर द्यायचं म्हणून दिलं.

" पण तुम्ही इथले वाटत नाही. " आता मला त्याच्या बोलण्यातला आणि हावभावातला बायकीपणा जाणवला.

मग मी माझ्याविषयीची माहिती पुरवली. मी एकटा कसा शेती करतो. कुटूंब पुण्याला का रहाते. वैगेरे वैगेरे.

" मग तुम्हाला शेतीला माणूस लागत असल की ? " आता तो गृहस्थ माझ्याशेजारी येऊन बसला.

" हो हवाय ना. " माझं जेवढ्यास तेवढं उत्तर.

" मग मी देतो तुम्हाला एक माणुस. मला नाय जमायचं एखादं जोडपं देतो. आमच्या गावाकडं मिळतील.

हा आपल्या शेतीसाठी माणूस देणार आहे म्हणाल्यावर सहाजिकच म्लात्याची गरज वाटू लागली. आता या माणसाला टाळून चालणार नाही म्हणून मी त्याची चौकशी केली. तेव्हा कळालं कि तो गावात जत्रेसाठी आलेल्या तमाशाच्या फडाबरोबर आलेला होता. तरुणपणी तमाशात नाच्याच, मावशीचं , सोंगाड्याचं काम करायचा. पण आता वय झाल्यामुळे त्याला रंगमंचावर जागा उरली नाही. आता तो फडाचा आचारी म्हणून काम पहातो.

" जवानीत आपला लय वट व्हता साहेब. आता चार सहा  वर्ष झाली समद्यांना रांधून घालतो. पण हातातला नाजुकपणा काही गेला नाही. बघा ना माझं मनगट किती नरम हाय." म्हणत त्यानं त्याचा उजवा हात माझ्यासमोर धरला.

" असू दे, असू दे." म्हणत मी त्याला टाळलं

माझं भजी पाव खाऊन झालं होतं. चहा आला होता. मी चहात रमलो होतो. पोटातली भुक शमली होती. आता इथून काढता पाय घ्यायला हवा हे माझ्या लक्षात आलं. मी उठण्याच्या तयारीत आहे हे पहाताच तो नाच्या म्हणाला, " तुमची शेती जवळच असल ना ? "

" हो. "

" मग असं करा. मला आत्ता तुमची शेती दाखवा साहेब. सांजच्याला फडावर या मी लगेच तुम्हाला माणूस देतो. "

" अरे आत्ता नको. मी संध्याकाळी येतो. " मी त्याला टाळण्याच्या हेतूने म्हणालो.

" सांजच्याला मला न्हाई जमायचं साहेब. आता तासभरच टाईम हाय माझ्याकडे. आत्ता बाया अंघोळीवरून यत्यान. मला समदयासाठी तांदुळ ताकाव लागलं. परत तंबू ठोकाव लागल. त्यामुळं यवढाच तासभर हाय माझ्याकडं. उद्या सकाळी हजेरी झाली कि निघालो आमी. त्यापरीस आत्ता मला तुमची शेती दावा. सांच्याला तुम्ही तमाशाला आलात कि मी तुम्हाला जोड दावतो. पटली तर ठिवा न्हायतर ऱ्हायलं."

" अरे पण तुझ्याकडे कसा असणार शेती करणारा माणुस ? तुझ्या तमाशातला माणूस शेतात नेऊन मला माझ्या शेतीचा तमाशा नाही करायचा." मी.

" का साहेब गरीबाची चेष्टा करताय साहेब. तमाशातला माणूस शेतीत चालणार नाही हे का कळना व्ह्य मला. अहो , माझ्या पुतण्या हाय. फिरतोय माझ्यासोबत काम शोधत. तुम्ही बरे दिसला म्हणून विचारलं. माझ्यावर विश्वास नसल तर जाऊ दया राहू दया. " तो काहीसा रागवला होता.

" ठीक आहे चल. पण येताना तुला चालत यावं लागेल. मी सोडवायला येणार नाही. " मी असं म्हटल्यावर तो माझ्यासोबत येणार नाही असे मला वाटले.

पण त्यानं येताना चालत येण्याची तयारी दाखवली. मी गाडी सुरु केली. तो मागे बसला. त्याच्या पुतण्याच गुणगान तो सांगत होता. निम्मा रस्ता संपला होता. " साहेब कुठय तुमचं शेत ? "

" ते काय समोर तो ओढा दिसतोय ना त्याच्या पलिकडे. ओढ्याला लागुन. "

एवढ्या लांबुन आपल्याला चालत यावं लागेल असं वाटून त्यानं विचारलं असावं असं मला वाटलं.

" बरं ,मला वळीखलं ना साहेब ? " तो लाडात येत म्हणाला.

" म्हणजे ? " मी

" न्हायी, म्हंजी मला वळीखलं असल ना तुमी."

" अरे मी कसा ओळखणार तुला. ना तुझं नाव मला माहित ना गाव. तुला मी कसा ओळखणार ?"

" तसं न्हायी म्हणत मी साहेब. पण तुमी वळखलं असलं मला. " आता मला त्याच्या बोलण्याचा सूर कळाला होता. आवाजातला लाडिकपणा कानाला टोचत होता.


" ये तसलं काही जमणार नाही हा. तुझा हात बाईसारखा आहे म्हणुन मी तुला जवळ घेईन असं वाटलं का काय तुला. त्यासाठी आला असशील तर उतर इथंच. " मी गाडी थांबवली. तो गाडीवरून उतरला. मी मागे वळूनही पाहिलं नाही. तडक घर गाठलं.


पण माझ्या डोळ्यासमोर नटरंग मधला नाच्या उभा रहात होता. आणि या नाच्याने नटरंगमधल्या नाच्याच्या प्रतिमेला झाकून टाकलं होतं. मी साहित्य, सिनेमा आणि वास्तव यातला फरक अनुभवत होतो.                                    

        

                                                                                              

                  

8 comments:

  1. केशव पवार20 April 2015 at 21:08

    खुप सुरेख आणि वास्तव लेखन.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर.
    पण आजकाल आपण राजकीय लेख लिहित नाही आहात.

    ReplyDelete
    Replies
    1. आकाशजी अभिप्रायाबद्दल आभार. राजकीय लेखन करणे हा माझा हेतू कधीच नसतो. अवतीभोवती जे जे दिसेल त्यावर अधिकाधिक सकसपणे लिहिण्याचा मी प्रयत्न करतो. काही विचार मांडवा हि त्यामागे भावना असते. तरीही नुकतेच लिहिलेले , ' हरलं कोण ? राणे कि शिवसेना ', ' ओवेसी, उद्धव आणि शिवसैनिक ' हे लेख आपण पहिले नसतील तर नक्की पहा. आपले मतही मांडा. बबनराव पाचपुते : दुसरा नारायण राणे ' या लेखाचे लिखाण चालू आहे. तासाभरात पोस्ट करीन .

      Delete
  3. Replies
    1. प्रताप तू पहिल्यांदाच ब्लॉगला भेट दिलेली दिसते. तुझा अभिप्राय मिळाला. आभार. आता नियमित वाचत रहा. तू पोस्ट केलेली कॉमेंट मी अप्रूव्ह केल्याशिवाय तुला दिसू शकत नाही.त्यामुळे एकदाच कॉमेंट पोस्ट करावी ती मला मिळालेली असते. .

      Delete
  4. Nice write up. But Be careful with these people. You never know..............

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल आभार. आपला अभिप्राय मनोधैर्य वाढवितो. आपण म्हणता तसे नक्कीच काळजी घेईन. अशा अनुभवातून खूप शिकायला मिळते. मागे असाच अनुभव आला होता. त्याविषयी ' ते गे तर नसावेत ' या शिर्षकाखाली लेख लिहायचा होता पण राहून गेले.

      Delete