Friday 12 May 2017

तुझ्या चेहर्‍यामध्ये .....( In your face )


तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात.............एका अदृश्य नात्यांनं बांधले जातात..........कळत नकळत एकजीव होतात. तो तिचं सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवं असतं स्वच्छ.........मोकळं.........निरभ्र.त्या आभाळातले काळजीचे.......चिंतेचे मळभ त्याला नको असतात. ती रुसलेली, रागावलेली नको असते त्याला. तिचं हसू हेच त्याचं सर्वस्व. म्हणूनच तिला समजावू पहातो. तेव्हा तो म्हणतो -

तुझ्या चेहऱ्यामध्ये मला मोकळा आभाळ पहायचय
तुझ्या डोळ्यात चान्न, होऊन बुडून खोल न्हायचय ..............
तू माझी कोण असतेस ?-
कोणीसुद्धा नसतेस
मिटल्या डोळ्यासमोर तरी
चान्न होऊन हसतेस
अबोलीच्या वेलीसारखी
कधीकधी रुसतेस
माणसानं खरं म्हणजे 
असं कधी रुसू नये
आपल्या चेहऱ्यावरचं हसू
आपणच पुसू नये
तू अशी रुसलीस कि 
मला अगदी रहावत नाही
गाणं येतं ओठावर
तरीसुद्धा गावंत नाही
भैरवीच्या रुपात तुझ्या, ओठांवरती रहायचय
तुझ्या डोळ्यात चान्न, होऊन बुडून खोल न्हायचय....................
श्रावणातली सर जर
तुला ओंजळीत झेलता आली
कडाडणारी वीज जर
पापण्यावरती पेलता आली
झाडासारखं तरच तुला 
मातीमध्ये रुजता येईल
थेंबभर पाण्यातसुद्धा
आतून आतून भिजता येईल
तू अशी चिंब जेव्हा
भिजून भिजून जाशील
काळ्या काळ्या मातीवरचा
हिरवा अंकुर होशील
तुझं हिरवा रूप मला, डोळे भरून प्यायचय
तुझ्या डोळ्यात चान्न होऊन, बुडून खोल न्हायचय....................
छान दिसतेस अशी तू 
गालात हसतेस जेव्हा
अशीसुद्धा छान दिसतेस
ठसक्यात रुसतेस जेव्हा
एक मात्र लक्षात ठेव 
रुसवा खूप ताणू नये
दोघांमधल्या  एकांतात
त्याला कधीच आणू नये
माणसानं धुंद होऊन 
गार वारं प्यावं
श्रावणातल्या सरींचा
एक थेंब व्हावं
फुलपाखराच्या रंगाला
अंगभर ल्यावं
गुलाबाच्या फांदीला
कवेमध्ये घ्यावं
गुलाबाच्या फांदीवरल्या, फुलात तुला पहायचय
तुझ्या डोळ्यात चान्न, होऊन बुडून खोल न्हायचय............

2 comments:

  1. Khup chhan. .
    Mala ek chhan blog sapadalay as mi aata mhanu shakel.

    ReplyDelete
    Replies
    1. महेश जी, अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. काही कारणास्तव आपला अभिप्राय खूप उशिरा पाहिला. क्षमा असावी.

      Delete