Thursday, 31 December 2015

का द्यायच्या शुभेच्छा ?

गेली पंधरा दिवस मी whatsaap सह फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर ' हिंदू नववर्ष चैत्री पाडव्यापासून सुरु होते त्यामुळे एक जानेवारीला परस्परांना शुभेच्छा देऊ नका ' अशा स्वरूपाच्या पोस्ट पहातोय. अर्थात त्यामुळे मी आजतागायत शुभेच्छा दिल्या नाहीत असे नाही. वेळच नव्हता. या महिन्यातली हि माझी अवघी दुसरी पोस्ट. पण आज लिहायचं असं ठरवलं.


मीही हिंदूच. कट्टर म्हणावा असा. पण मी कट्टर हिंदू आहे म्हणजे मुस्लिम , इसाई  वा अन्य धर्मियांचा द्वेष करतो असं नव्हे. माझं हिंदुत्व फक्त माझ्या आचरा विचारा पुरतं. माझ्या संस्कार - संस्कृती पुरतं. 
    
हिंदूंना अशा प्रकारचं आव्हान करणाऱ्या पोस्ट कुणाच्या डोक्यातून जन्म घेतात माहित नाही. पण अशा प्रकारे आव्हान करणारी मंडळी उद्यापासून नविन वर्षाची दिनदर्शिका भिंतीवर टांगतील. १ जानेवारी पासुन ३१ डिसेंबर पर्यंत दिवस मोजतील. कृष्णपक्ष , शुक्लपक्ष अस न म्हणता आठवडे मोजतील. तिथ न पहाता तारीख पहातील. मग कशासाठी हा अट्टहास ? १ जानेवारीला शुभेच्छा दिल्याने का आम्ही बाटतो ? 

काही जण Happy New Year असं न म्हणता जाणीवपूर्वक नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणतात. का असं ? आमच्या हिंदुत्वाचा पुरावा आमच्या भाषेत आहे कि आमच्या संस्कारात ? आमच्या बोलीत आहे आमच्या संस्कृतीत ? आमच्या रक्तात आहे कि आमच्या आचरा विचारात ? आमच्या कृतीत आहे कि आमच्या पेहरावात ? 

या देशात असहिष्णुता वाढली आहे असं म्हणत अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. परवा परवा असहिष्णुता आहे पण पुरस्कार परत करणे हा मार्ग नव्हे असं म्हणत. युम पठाण या जेष्ठ लेखकांनी सुद्धा असहिष्णुता हाच या देश समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. पण परवा मी मुस्लिम भाजीवाल्याकडून भाजी घेतली. दहा हिंदूंच्या गराड्यात बसुन तो भाजी विकत होता. आणि मी एक हिंदू त्याच्याकडून भाजी घेत होतो. तेव्हा मला प्रश्न पडला कुठे आहे असहिष्णुता ?

आज एका वर्तमान पत्रात एक फोटो पाहिला. आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन निघालेल्या दोन मुस्लिम माऊल्यांचा. त्यांच्या मुलांनी शाळेत वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला होता. एकीने तिच्या मुलाला हनुमानाच्या वेशभूषेत सजवले होते तर एकीने तिच्या मुलीला पार्वतीच्या वेषात सुशोभित केले होते. आपल्या मुलांना अशा रितीने हिंदू देवतांच्या पात्रात रंगवताना त्यांच्या मनात कुठेही शंकेची पाल चुकचुकलेली नव्हती. आणि त्यांनी त्यांच्या मुलांना अशा रितीने हिंदू देवतांच्या वेशभूषेने सुशोभित केले म्हणुन त्यांच्यावर कोणी दगड फेक करत नव्हते. मग या देशात असहिष्णुता आहे कुठे ? खरंच सांगतो मित्रांनो. असहिष्णुता या देशात नाही. आमच्या राजकीय विरोधकांच्या मेंदूत आहे. 

इतिहासात मुसलमानांनी हिंदूंना दगा दिल्याचे उदाहरणे कमी सापडतील. पण हिंदूंनीच हिंदूंचा केसाने गळा कापल्याची उदाहरणे मात्र पावलो पावली सापडतील. 

त्यामुळेच असल्या हिंदुत्वाच आव्हान करणाऱ्या पोस्टला कुणी बळी पडू नये. कारण शुभेच्छांची गरज प्रत्येकाला असते. १ जानेवारीलाच नव्हे रोज असते. त्या इंग्रजीतून असाव्यात कि मराठीतून, हिंदीतून असाव्यात कि उर्दूतून , बंगालीतून असाव्यात कि पारशीतून याला काहीच महत्व नाही. महत्व आहे त्या शब्दामागच्या शुभेच्छांना.

So -                 


No comments:

Post a Comment