Wednesday, 9 December 2015

जुने मित्र


यापूर्वी माझे खरे मित्र , खरी मैत्री , श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री , तीन मुर्खांची मैत्री यासारखे अनेक लेख वाचकांना मनापसून आवडले.

कोण आपल्या मदतीला धावून येतो , कोण आपला शब्द झेलते , कोण आपल्या अहंकाराला कुरवाळते यावरून आपण एखाद्याला चांगला अथवा वाईट ठरवतो. पण मैत्रीत या कशाचीच अपेक्षा नसते. त्यामुळेच आपल्या शाळकरी मित्रांची आपल्याला नेहमीच आठवण येते. ज्याच्या दातांमुळे ( देखण्या नव्हे आणि

विद्रूप ही नव्हे. तरीही त्याचे दात लक्षात रहावेत असेच आहेत ) कायम लक्षात राहिला त्या विनोद अच्छाला मी कधीच विसरू शकलो नाही. त्याच्या नावात अच्छा होतं आणि मित्रही. वीसएक वर्ष या नालायकाची भेट नव्हती. फोन नव्हता. माझ्या जवळ नीट सांगता येईल असा त्याचा पत्ता नव्हता. जिवंत आहे कि मेलाय हे माहित नव्हतं. आणि त्याला भेटण्याचे मला डोहाळे लागले होते. राशिनला रहातो एवढंच माहित होतं. कापड दुकान होतं , सोन्या चांदीचं दुकान आहे अशी वीस वर्षापूर्वीची ऐकीव माहिती होती. आणि तरीही IGP तल्या वीस वर्षात कधीही न भेटलेल्या मित्राच्या शोधात मी निघालो.

राशिनला गेलो. पेठेत चौकशी करत त्याच्या दुकानात पोहचलो. साला गल्ल्यावर नव्हता. त्याच्या भावाने त्याला बोलावलं. आणि मला पहातच तो कडकडून भेटला. जेवलो. चहापाणी झालं. त्याचा मुक्कामी रहाण्याचा आग्रह धुडकावून मी निघालो.

निघताना त्याला सांगितलं, " साल्या , तुझ्याकडे यायला निघालो खरा पण तु जिवंत आहेस कि नाही अशा शंका मनाला डसत होत्या. वाटलं समजा आपण घरी गेलो. विनोद कुठंय असं विचारलं आणि घरच्यांनी त्याला जाऊन चार सहा वर्ष झालेत असं सांगितलं तर करायचं काय ? असा प्रश्न पडला होता. "

यावर ओठातून दात फिस्कारत आणि मनमोकळा हसत तो म्हणाला , " हे , हे , हे असा आणि इतक्या लवकर थोडाच जाणार आहे मी. आधी मीच तुला खांदा देणार मग मी जाणार. " या गोष्टीला आज तीन वर्ष होऊन गेले. आहे कि गेलाय माहित नाही.

IGP तल्या कित्येक मित्रांना कधीच विसरलो नाही. आमच्या सिव्हील , मॅकॅनिकल असा भेद नव्हता. त्यामुळेच राजा खोसे जसा लक्षात आहे तसाच आंधळीकर,

आणि अशा मित्रांचं गेट टुगेदर झालं. अनेकांना मागच्या वीस पंचवीस वर्षात पाहिलं नव्हत. अनेकांच्या चेहऱ्याच्या आणि नावांच्या जोडया लावता येत नव्हत्या. पण भेटीत अनोळखीपणा नव्हता.

पुढे रासकरने whats aap ग्रुप सुरु केला. आणि माझ्या नावाचा त्या ग्रुपमध्ये समावेश झाला तेव्हा कॉकटेल पार्टीला गेल्याचा आनंद झाला. वीस वर्षानंतरही आम्ही एकमेकांना विसरलो नव्हतो आणि माझ्या कवितेलाही कुणी विसरले नव्हते. ग्रुपवर दिसताच कविवर्य ग्रुपवर एखादी कविता होऊन जाऊ द्या अशी फर्माईश आली.

मी काही शीघ्र कवी नाही. त्यामुळे ग्रुप काय लिहायचं हा फार मोठा प्रश्न पडला. आणि विचार करता करता ' जुने मित्र ' हि कविता आकाराला आली.

आमच्या ग्रुपसह मैत्रीच्या पवित्र नात्याला हि कविता समर्पित -

जुने मित्र            

नको नको म्हणता म्हणता
जुने मित्र भेटत गेले 
इकडून तिकडून सगळीकडून 
बघता बघता खेटत गेले …… १

हाड म्हणलं तरी सुद्धा 
साले दुर जात नाहीत 
रागाने तर माझ्याकडे 
कधीसुद्धा पहात नाहीत …… २

कळत नाही यांच्याकडे 
एवढ प्रेम येतं कुठून 
धरणामध्ये साठवलं तर 
धरणं सुद्धा जातील फुटून … ३

मी तर म्हणतो त्यांचं प्रेम
सगळीकडे पेरत जावं
आभाळाच्या छातीवरती 
त्यांचंच नाव कोरत जावं…… ४

त्यांच्यामुळेच भोवतीचे
एकटेपण आटून गेले
पंक्तीमधले दुखःसारे 
एका क्षणात उठून गेले…… ५

मी तर म्हणतो त्यांच्यासाठी 
पुढचा प्रत्येक श्वास घ्यावा 
त्यांच्या हातात सुखासह
आपण आपला हात दयावा.…. ६   

                                   - विजय शेंडगे , पुणे


4 comments:

  1. कविता कोकरे11 December 2015 at 21:03

    अतिसुंदर

    ReplyDelete
  2. Shedage ek no bhava.
    Chaan jamley kavita.

    ReplyDelete