Sunday 29 May 2016

चिमणा, चिमणी आणि कुबड्या खविस

गावाकडचं घर जुनं. माळवादाचं. वाडाच म्हणतात सगळे त्याला. दुपारची वेळ. रणरणतं ऊन. घरात मी एकटाच. घराच्या मागील बाजूस असलेली झरोकावजा खिडकी उघडी. दारही सताड उघडं. घराबाहेर निरव शांतता. किडा मुंग्या शोधत उन्हात आलेल्या आणि
पुन्हा सावलीचा आधार घेणाऱ्या चिमण्या. जग जागं असल्याची तेवढीच एकमेव जाणीव. 

माझ्या घरासमोर चिमण्यांचा खूप गजबजाट . मला सोबत त्यांचीच. सकाळी उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत. माझा संवाद त्यांच्याशीच. त्याही मला घाबरत नाहीत. बिनदिक्त घरात येतात. चिवचिवाट करत घरात धिंगाणा घालतात. माझीच चिलीपिली माझ्या भोवती किलबिलाट करीत असल्याचं सुख मी अनुभवतो. मी त्यांना हुसकावून लावत नाही. पण लटका रागावतो कधी कधी त्यांच्यावर. " किती दंगा करताय ? जरा शांत बसा. " म्हणून खडसावतो. पण शांत बसतील ती पोरं नव्हेत आणि चिवचिवाट करणार नाहीत त्या चिमण्या नव्हेत.


वाडा जवळ जवळ पन्नास फुट लांब आणि वीस फुट रुंदीचा. साठ सत्तर वर्षाचा. जर्रजर झालेला. जागोजागी दगडांच्या फटीतलं सिमेंट निघालेला. या खोबणीतच अनेक चिमण्यांचे संसार. त्यांची अंडी. त्यांची पिलं.

अशाच एका दुपारी वाड्याच्या उत्तरेकडच्या भिंतीच्या बाजूला चिमण्यांचा जीवघेणा चित्कार चालेला. जाऊन पाहतोय तो काय घराच्या माळवदावरून भिंतीवर उतरलेला आणि भिंतीवरील खोबणीत शिरलेला साप. शेपूट तेवढी दिसत होती. लांबीचा आणि जाडीचा अंदाज येत नव्हता. त्याला मारणं गरजेचं होतं. कारण चिमण्यांचे संसार उधवस्त करण्याची त्याला सवय असावी. आजही तो असाच उडता न येणाऱ्या पिलांच्या शोधात त्या खोबणीत शिरला असावा. बराच वेळ मी त्याच्यावर नजर ठेवून होतो. जवळ जवळ अर्ध्या तासाने त्याचं डोकं त्यांनं बाहेर काढलं. पिलं, आत असणारी चिमण्यांची अंडी त्यानं मटकावली असावीत.

त्यांनं डोकं बाहेर काढलं आणि इकडचा तिकडचा आदमास घेतला. जवळच माझ्यासह दबा धरून बसलेल्या तिघा चौघांची त्याला चाहूल लागली असावी. त्यानं खोबणीतून बाहेर काढलेली मान पुन्हा आत घेतली. पुन्हा अर्धा तास गेला. साप आत. बाहेरचा अदमास घेत बसलेला. आम्ही बाहेर. चिडीचिप. बाहेर काही हालचाल दिसत नाही असं पाहून आला बाहेर. आम्ही होतोच दबा धरून बसलेलो. चांगला दोन हात बाहेर आला. आणि आम्ही काठीचे तडाखे दिले. तो मेला तेव्हा आम्ही निरखून पाहिलं. चांगला तीन चार हात लांबीचा आणि मनगटा एवढा जाड होता. आम्ही त्यांचं यथासांग क्रियाकर्म करीत असल्या प्रमाणे त्याला आगीच्या स्वाधीन केलं.

या चिमण्या माझं अंगण सोडून जात नाहीत. मुक्कामालाही तिथेच वाड्याच्या दगडी भिंतीतलं सिमेंट काढून तयार केलेल्या खोबणीत. अथवा शेजारच्या बाभळीवर.

मी सकाळी उठतो. पाणी तापायला ठेवतो. दात घासून दाढी करतो. घरासमोरच्या पिढीजात दगडाजवळ अंघोळीची गरम पाण्याची बदली नेऊन ठेवतो. साबण टॉवेल घेऊन अंघोळीसाठी दगडाकडे जातो तर या बाया बदलीच्या काठावर बसून पाणी पीत असतात. पाणी गरम असलं तरी चालेल पण आम्ही पाणी प्यायला दूर जाणार नाही हिच जणू त्यांची भुमिका. त्यामुळे माणसांसारख्याच त्याही आळशी होत चालल्या आहेत असं मला वाटतं .

घरातल्या शिंकाळ्यावर, वलणीवर, विजेच्या लोंबत्या वायारवर, घराच्या खणांच्या वास्यावर. सगळीकडे त्यांचाच डाव. माझ्या डावात त्या असतात. पण त्यांच्या डावात मी नसतोच कुठे. त्या त्यांच्याच विश्वात. 

मला सगळ्या चिमण्या एकसारख्या दिसत नाहीत. त्यांच्यातले वेगळेपण मला जाणवते. इतका त्यांचा माझा गाढा परिचय. कोणत्या चिमणीचा चिमणा कोणता हेही मला माहित आहे. आणि कोणत्या चिमणीचे पोरे कोणती हेही मला माहित आहे.

आज मी बराच निवांत होतो. पलंगावर आडवा पडुन चिमण्या न्याहळीत होतो. एक चिमणा आणि चिमणी घरातल्या विजेच्या दिव्याच्या वायरीवर येऊन बसले. चिमणा थोडासा रंगात आला असावा. तो चिमणीच्या जवळ सरकायच्या. चिमणीही त्याला चिवचिवत प्रतिसाद दयायची. इकडचा तिकडचा अदमास घ्यायची. पण दोघांमधलं अंतर चार बोटं उरलेलं असेल नसेल तोच आणि चोचीला चोच भिडणार एवढ्यात ती चिमण्यापासून दूर सरकायची.

चिमणा चिवचिवत तिला पुन्हा गोडीत घ्यायचा. पुन्हा दोघे एकमेकांच्या जवळ यायचे. पुन्हा चिमणी कलकलाट करायची आणि दूर व्हायची. चांगलं अर्धा तास असं चाललं होतं. असा का होतंय मला कळत नव्हतं. मी इकडे तिकडे पाहिलं. त्यांच्या हितगुजात अडचण यावी असं काहीच दिसत नव्हतं. माझ्या अस्तित्वाची तर ते दखलच घेत नाहीत कधी. मग असं का होतं असावं ? चिमणी चिमण्याला जवळही येऊ देत नव्हती आणि उडून त्याच्यापासून दुरही जात नव्हती.

मी आणखी बारकाईनं दाराबाहेर पाहिलं. तर डिश अन्टीनाच्या लोंबत्या केबलवर एक चिमणा बसला होता. अजस्त्र माजलेल्या बैलासारखा. अवाढव्य शरीर असलेला . पिंजारलेली पिसं. अस्ताव्यस्त पंख. वखवखलेले, तांबरलेले डोळे.  आणि घरातल्या विजेच्या दिव्याच्या वायरीवर बसलेल्या प्रेमी जिवावर रोखलेली नजर. मला ' झपाटलेला ' या सिनेमातल्या कुबड्या खविसची आणि बागेत प्रेमी जीवांच्या भोवतीने घिरट्या घालणाऱ्या टूकारांची आठवण झाली.

बरच वेळ मी ते दृश्य पहात होतो. दाराबाहेर उभा असलेला कुबड्या खविस त्या दोघांवरची नजर काढून घेत नव्हता आणि चिमणा जवळ येताच चिमणी पुन्हा चिमण्यापासून दूर सरकत होती. अखेरीस चिमणीला पुढे घालुन चिमणा दूर उडून गेला आणि डिश अन्टीनाच्या लोंबत्या केबलवर बसलेला अधाशी कुबड्या खविसही पडेल चेहऱ्याने उडाला.



19 comments:

  1. Suwarna Deshmane.29 May 2016 at 19:41

    khup chhan.

    ReplyDelete
  2. Sambhaji Kharat29 May 2016 at 19:47

    sundar pratikatmak lekhan.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार संभाजी. आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिल्याचे दिसते. आता आपले नियमित वाचन आणि अभिप्राय अपेक्षित आहेत

      Delete
  3. Surekha Deshmane29 May 2016 at 20:03

    Khup Surekh Sir.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार सुरेखाजी. रिमझिम पाऊसवर आपले स्वागत. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

      Delete
  4. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार राजतजी.

      Delete
  5. hi post vachtana evdha gung zalo hoto ki gasvar thevlela chaha bhandyat aatun gelaa......ekdam chan

    ReplyDelete
    Replies
    1. दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार हेमंतजी. अशा प्रतिक्रिया मिळाल्याकी लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढतं.

      Delete
  6. शरद रणपिसे1 June 2016 at 11:47

    मला ' झपाटलेला ' या सिनेमातल्या कुबड्या खविसची आणि बागेत प्रेमी जीवांच्या भोवतीने घिरट्या घालणाऱ्या टूकारांची आठवण झाली.----------सुरेख तुलना. खूप सुंदर लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. शरदजी , आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

      Delete
  7. Khupch sundar sir.... chimaniche evdhe details pahilyanda vachle.

    ReplyDelete
    Replies
    1. वंदिताजी आपण प्रतिक्रिया दिलीत. त्याबद्दल खप मनापासून आभार. खरंतर चिमण्यांविषयी आणखी बारकाव्याने लिहिता आलं असतं. पण पोस्त अधिक मोठी झाली तर ती वाचकांना अधिक कंटाळवाणी वाटू शकते या भितीपोटी लिहिता हात आखडता घ्यावा लागतो. आपण आज पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलेली दिसते. यापुढे आपण नियमित भेट दयाल हि अपेक्षा.

      Delete
  8. Shendge Saheb,
    Khp Chan lekh, ha lekh vachun mala shalet astana cha Marathi cha ek dhada athavla, pachvi kinva sahavi la astancha asel. Chimnychahi pille ani aandi satat khanayray aek nagala sarva chinmya choch marun ghayl kartat.

    regards.
    Bapu.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार टेंगळे साहेब. अलीकडे तुमच्या नियमित प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत. त्यामुळे लिहिण्याचा हुरूप वाढतो आहे. ' चिमणी ' या विषयावर लिहिण्याचे खूप दिवसापासून मनात होते. कारण त्यांचा माझ्या अंगणातला आणि घरातला किलबिलाट हा माझा खराखुरा अनुभव. मागे https://maymrathi.blogspot.in/2015/10/blog-post.html#more या लिंकवरील माझा ' आरशाचा सोस ' हा लेख आपण वाचलात कि नाही माहित नाही. पण तेव्हापासून हे सारे लिहायचे मनात होते. आपल्याला लेख आवडला याचे समाधान खूप मोठे आहे.

      आणखी एक आपण मराठीत का लिहित नाही माहित नाही. पण http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ हि लिंक वापरून आपण मराठीत लिहू शकता.

      Delete
  9. Khup sundar lekhan

    ReplyDelete
  10. रेवती पाध्ये6 June 2016 at 11:15

    अप्रतिम !!!!!!!!!

    ReplyDelete