Sunday 5 June 2016

Marathi Poem : अंधाराच्या छेडून तारा


माझा प्रवास फार दूरचा कधीच नसतो. माझा प्रवास फारतर बसमधला असतो , एसटीमधला असतो अथवा ट्रेनमधला. तोही शंभर सव्वाशे किलोमीटरच्या आतला. त्यामुळे अनुभवांची शिदोरीही बेताचीच असते. पण मी जे पहातो त्याने माझे मन अनेकदा हेलावून जाते.

बसमध्ये हातवारे करून दिलखुलासपणे चाललेलं मुकबधीरांचं संभाषण आणि बोलक्यांचा अबोला पाहून खरे मुकबधीर कोण ? असा मला प्रश्न पडतो. असाच एक प्रसंग. दोन वर्षापूर्वीचा.
त्यावेळी मी त्या घटनेवर ' अंध मुलींचं नृत्य ' हा लेख लिहिला होता. पण तेवढा लेख लिहून माझ्या मनाला स्वस्थता लाभली नव्हती. मनात विचारांचे काहूर माजले होते. जन्मताच अंध असलेल्या जीवांना आपल्या डोळ्यांना दृष्टी नाही हे आई वडीलांच्या, सभोवतालच्या नातलगांच्या आधी कळत असेल. पण आपल्याला काही दिसत नाही हे कुणाला सांगता येत नसेल तेव्हा त्यांना काय वाटत असेल ? ठेचाळून पडताना किती दुख होत असेल ? सभोवताली दिसणाऱ्या अंधारच्या समुद्राची त्यांना भीती वाटत नसेल का ? यावरही मात करीन रोज नवी वाट धरीन हि उमेद त्यांच्या मनात कशी निर्माण होत असेल ? असे अनेक पश्न माझ्या मनाला हेलावून टाकत होते. 


प्रकाशाची व्याख्याच ज्यांना माहित नसते ती मंडळी अंधारात चाचपडत प्रकाशाचा वेध घेऊ पहातात. आयुष्याकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन केवढा निकोप. अन्यथा दुष्काळा कंटाळून आत्महत्या करणारे शेतकरी, संसारीक अडचणींना कंटाळून गळफास घेणारे सामान्यजन, केवळ आपलं प्रेम आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून विष प्रश्न करणारे प्रेमीजीव. काय उपयोग या साऱ्यांचा ? कुणा अंध व्यक्तीनं आत्महत्या केल्याचं अजूनतरी माझ्या ऐकिवात नाही. आणि आम्ही ! परमेश्वरानं सारं दान भरभरून दिलेलं असताना नको त्या गोष्टींसाठी स्वतःचा कडेलोट करून घेतो.

त्या अंध मुलींचं नृत्य पाहिल्यापासून दिवसभर मी त्यांच्या मानसिकतेचाच विचार करत होतो. त्यातून आकाराला आलेली हि कविता -

अंधाराच्या छेडून तारा 


जन्मलो तेव्हा आम्हा
आवाज फक्त येत होते
कळत होतं अवती भोवती
सारे गाणे गात होते.

दिसत मात्र काहीच नव्हतं
कोण कोण कसं गातंय
कुणीतरी म्हणत होतं
बघा कसं टकमक पहातंय !

डोळ्यासमोर मात्र आमच्या
फक्त काळा अंधार होता
खुळखुळणाऱ्या खुळखुळ्यालात
भविष्याचा गंधार होता.

कुजबुजणाऱ्या आवाजातून
कळलं आम्ही अंध होतो
कुपीमध्ये कोंडलेला
दरवळणारा गंध होतो

चुकचुकणारे सारे गेले
आमच्यापासून दूर दूर
आम्ही मात्र अळवू लागलो
जगण्यासाठी नवा सूर

डोळ्यासमोर असतो काळोख
तरी आम्ही श्वास घेतो
अंधारात चाचपडताना
बघता बघता प्रकाश होतो.

वसंत ऋतू माहित नसतो
तरी हिरवी पाने होतो
अंधाराच्या छेडून तारा
प्रकाशाचे गाणे होतो.

बस्स ! आणखी काय लिहू ? आयुष्यातल्या अंधाराला सामोरं जात पत्येक क्षण नव्या उमेदीने जगणाऱ्या समस्त अंधांना समर्पित.

 

6 comments:

  1. बहुत बढीया विजयजी.

    ReplyDelete
  2. श्रेयस पठारे6 June 2016 at 07:58

    खूप अर्थपूर्ण कविता.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार श्रेयसजी.

      Delete
  3. अप्रतिम लिहिता हो।
    जिते राहो लिहिते राहो।

    ReplyDelete
    Replies
    1. काही अशा अनोळखी , निनावी प्रतिक्रिया का येतात माहित नाही. काही असो पण आलेली प्रत्येक प्रतिक्रिया लिहिण्याचं बळ देते, लेखणीत प्राण फुंकते हे मात्र निश्चित. पुन्हा एकदा आभार.

      Delete