Wednesday 25 May 2016

marathi Poem : येगं येगं सरू


मला आठवतय लहानपणी आम्ही सर्व नातवंड रात्री आजी भोवती गोळा व्हायचो. आजी एखादी गोष्ट सांगायची. आणि गोष्ट संपली कि , " चला झोपा बरं आता सगळे. " पण कसलं काय ! आमची खुसपूस चालूच असायची. मग आजी आणखी एक हत्यार बाहेर काढायची. म्हणायची ,
" आता जो बोलेल तो गाढव बरं का !" मग मात्र आमच्या गोटात चांगलीच शांतता व्हायची. पण रात्रीच्या चांदण्यात अशी शांतता कोणाला हवी असणार ? कोणी तरी काही तरी निमित्त काढून बोलायचं. आणि आजी म्हणायची , " आता शामा गाढव बरं का !" बघता बघता सगळेच जण काहीतरी बोलायचे आणि गाढव व्हायचे. कोणीतरी , " अरे , आजी बोल्ली. आता आजीच गाढव बरं का ! " असं म्हणायचे.

लहानपणीच जगच निराळं. भांडी कुंडी खेळताना कुणी तरी कुणाचा तरी नवरा व्हायचं. कुणी मुलं व्हायचं. मग बायको झालेली ती खोटा खोटा स्वयंपाक करायची , नवऱ्याचा डबा भरायची , मुलांना खोटं खोटं भरवायची, मुलं झालेली ती पिटुकली जेवल्याचा खोटा खोटा अभिनय करायची आणि वर खोटी खोटी ढेकर सुद्धा द्यायची. 

पंचमीला मुली बायकांबरोबर मुली फेर धरायच्या. त्यांच्या बरोबर गाणी म्हणायच्या. मी जेव्हा कविता लिहू लागलो तेव्हा हि गाणी कोणी लिहिली असतील असा मला फार मोठा प्रश्न पडायचा. आणि आजकालचे कवी अशी गाणी का लिहित नाहीत असा मला प्रश्न पडायचा. यातून मला आपण असं एखादं गाणं लिहावं असं वाटलं. पण विषय कोणता हा प्रश्न पडला. 

आणि मग तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल  ठेवणाऱ्या, खोट्या संसाराचा खेळ खेळणाऱ्या लहानुल्या माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. आणि वाटलं खेळता खेळता या मुली खरंच लग्नाचं स्वप्नं पहात असतील का ? एखादी तर म्हणते सुद्धा , " मी नाही करणार बाई लग्न. " ती असं का म्हणत असावी ? ज्या मुली लग्नाचं स्वप्न पहात असतील त्यांचं स्वप्नं कसं असेल ? अशा विचारांच्या झिम्म्यातून हि कविता आकाराला आली. एक दोन दिवस नव्हे चांगली महिनाभर मी हि कविता लिहित होतो. आठ ध वर्षापूर्वी लिहिलेल्या या गाण्याचं शेवटचं कडवं आत्ता या क्षणी लिहिलं आहे.  

विचार करताना मनात आलं मिळून झिम्मा खेळणाऱ्या , दळण दळणाऱ्या , कैऱ्या चोरणाऱ्या , चोरलेल्या कैऱ्या ओचीत भरणाऱ्या , एकत्र पाण्याला जाणाऱ्या आणि पाण्याला गेल्यानंतर त्या पाण्यातल्या मासोळीला पहाणाऱ्या त्यांच्या लग्नाचं स्वप्नं मासोळीच्या स्वप्नासारखंच तर नसेल ना ? 

                येगं येगं सरू


पहिली : येगं येगं सरू , झिम्मा खेळू मिळुन दोघी गं
              येगं येगं सरू , दळण दळू मिळुन दोघी गं

              येगं येगं सरू , कयऱ्या चोरू मिळुन दोघी गं
              येगं येगं सरू , ओचीत भरू मिळुन दोघी गं

              येगं येगं सरू , पाण्याला जाऊ मिळुन दोघी गं
              येगं येगं सरू ,मासोळी होऊ मिळुन दोघी गं

मासोळीच स्वप्नं काय असेल ? तिलाही वाटत असेल ना आपणही कधीतरी पाण्याबाहेर जावं , मोकळा श्वास घ्यावा. पण मासोळीला ते कधीच शक्य नसतं. तिचं लग्नं न करण्याचं स्वप्नंही या मासोळीच्या स्वप्नासारखंच तर नाही ना ? मासोळीला जसं पाण्यातून बाहेर येणं कधीच शक्य नाही तसाच तिलाही सप्तपदीच्या संस्कारातून. आणि मग सप्तपदीच्या संस्कारात अडकून पडण्यातच सुख आहे याची जाणीव होऊन ती आपल्या लग्नाचं चित्रं कशा रीतीने रंगवत असेल ? अशा विचारातून आकाराला आलेल्या या ओळी -

               पाण्याला जाऊ , मासोळी होऊ
               मासोळी होऊ , सपान पाहू
               सपनात राजा , वरातीचा बाज्या
               वरातीचं घोडं , नाचतय व्दॉड
               साखरपुडा, नी हिरवा चुडा
               हळद अंगा , हिरव्या रंगा
               लेवून घेऊ , नवऱ्या होऊ

नवऱ्या होऊ , नवरा पाहू , चोरून आपण दोघी
नवऱ्याच्या मागे सरूबाई जाऊ , मिळुन आपण दोघी

पण त्यातलीच कोणी तरी तिनं लग्न करू नये म्हणून तिला एका बाईच्या संसाराची चित्तर कथा सांगते. कशी असते ती चित्तर कथा. तर अशी -

दुसरी : एक होती नार , तिला पोरं होती चार
            चार पोरांच्या तऱ्हा हजार
            काळी बेंद्री , नाकाला धार
            कायला कार नी भुईला भार
            पोरांनी केला जीव बेजार

तिच्या सुरात सूर मिसळताना आणि लग्न केला तर काय वाट्याला येतं हे सांगताना तिची आणखी एक मैत्रीण सांगते -

तिसरी : नको नको सरू , लगीन करू
             होतील पोरं खंडीभर
             रांधा वाढा उष्टी काढा
             संसार म्हणजे कान्हेरीचा काढा
             कन्हेरीचा काढा प्यायाचा नाही
             बोहल्यावर उभं राहायाचं नाही.

निसर्ग नियम कधी कुणाला चुकत नाही. त्यामुळेच एवढ सांगूनही घडायच्या त्या सगळ्या गोष्टी घडतात आणि सप्तपदीच्या फेऱ्यात अडकते. पण असं नको नको म्हणताना सप्तपदीच्या फेऱ्यात अडकणं तिला हवसं वाटतं. तिच्या नेमक्या भावना कशा असाव्यात हे सांगताना हि पोस्ट लिहित असताना आज शेवटच्या क्षणी हे अखेरचं कडवं आकाराला आहे. ते कडवं असं. 

निवेदक : तरी सरू वयात येते
                न्हाती होते , धुती होते
                हळद येते, येतो चुडा
                संसाराचा रंगतो विडा
                त्याच्या मिठीत फुलात जाते
                विसरून जाते साऱ्या पिडा
                गुणगुणताना म्हणते कशी
                संसार म्हणजे चांदणसडा. 

कविता आवडली आणि पटली असेल तर तुमचे अभिप्राय नक्कीच मिळतील. 


2 comments:

  1. वसुंधरा पांडे5 June 2016 at 11:37

    हि गाणी लिहिताना आपण एखादी चाल दिली असेल तर कृपा करून त्याची चाल अपलोड करा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार वसुंधराजी. प्रयत्न करून पाहीन. पण माझा आवाज फारसा चांगला नाही त्यामुळे धाडस होत नाही.

      Delete