आज मूड एकदम मस्त आहे. का ? कुणास ठाऊक ! पण, खूप दिवसानंतर मनाची हि प्रसन्नता मी अनुभवतो आहे. मूड चांगला म्हणजे किती चांगला असावा ! अगदीच पंख असल्याप्रमाणे मी हवेत उडत असल्याचा भास मला होत होता. किंवा ती पहिल्यांदा आपल्या आयुष्यात आल्यानंतर मनाचं मोरपीस व्हावं ना तसं आज वाटत होतं .
संध्याकाळी चहा घेतला. संध्याकाळी म्हणजे
बायकोनं सहा वाजता माझ्या टेबलावर ठेवलेला चहा मी नेहमीप्रमाणे चांगला तासभर थंड होऊन दिला. तोवर त्यावर चॉकलेटी साय आलेली होती . मग तो तासभर थंड झालेला चहा मी पुढे अर्धा तास घोटाघोटाने मिटक्या मारीत ……. जिभेवर घोळवत पीत राहिलो.
ब्रेकसाठी खाली गेलो. सोसायटीच्या पार्किगमध्ये.……. वातावरण मस्त.……. पावसाळी.……. मनाला भुरळ घालणारं. थंडगार पण न बोचणारी हवा. आभाळात काळसर ढगांचे पुंजके. आणि त्यातूनच हसत माझ्याकडे पहाणारी एक लुकलुकणारी चांदणी. कुणास ठाऊक कशा ……… पण माझ्या ओठांवर ओळी आल्या …….
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे
तुझ्याचसाठी घालीत आलो
चांदण्यांचे सडे
या मुखड्यानंतर पुढच्या कडव्यानंही मनात आकार घेतला. आणि मी अत्यंत उल्हासानं जिना चढून वर आलो. तर सौचा प्रश्न , " सिरीयल पहायची होती म्हणून एवढ्या घाईन आलात ना."
" छे , गं ! " मी पटकन तिचं म्हणणं झटकल.
मला कुठल्याच मालिकेचं फारसं कौतुक नाही हे तिलाही माहित आहे. पण बायकांची वाचाळता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्या सतत काही ना काही बोलू पहातात. .
माझ्या चेहऱ्यावरचा उस्ताह बायकोला दिसत होता. पण ती तिच्या सिरियलमध्ये हरवुन गेली होती. मी माझ्या लेखणीच्या टेबलाकडे वळालो. कागद समोर घेतला. पेन काढलं. पार्किंग मध्ये मनात घोळवलेल्या ओळी कागदावर उतरवल्या. तेवढ्यात तिच्या सिरियलमध्ये जाहिराती शिंकू लागल्या. मी म्हणालो, " ऐक." माझ्या प्रत्येक कवितेची तिचं पहिली श्रोता असते. सहन करते बिचारी. तिनं टिव्हीची बोलती बंद केली. आणि मी फार उस्ताहान तिला कविता ऐकवू लागलो.…
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे
तुझ्याचसाठी घालीत आलो
चांदण्यांचे सडे
तुझ्याचसाठी झालो मी गे
रिमझिमणाऱ्या धारा
तुझ्याचसाठी हळूच झालो
भिरभिरणारा वारा
तुझ्याविना गे जातील माझ्या
आयुष्याला तडे
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे
अशी कविता ऐकवली कि ती जरा संशयानेच माझ्याकडे पहाते. आज तिच्या नजरेत संशय नव्हता पण मिस्कीलपण होता. कविता तिलाही मनापासून आवडली होती. पण टिव्हीवरच्या जाहिराती संपल्या होत्या. तिनं टिव्हीचा गळा मोकळा केला आणि पुन्हा सिरियलमध्ये हरवुन गेली.
माझ्या मनावरची त्या कवितेची नशा मात्र उतरली नव्हती. ती मला उतरूही द्यायची नव्हती. त्याच नशेत मला कविता पूर्ण करायची होती. मी पुन्हा शब्दांची जुळवाजुळव करू लागलो. कविता आकारात गेली. कडव्या मागून कडवी तयार झाली. अखंड कविता आकाराला आली. अगदी मला हवी असते तशी.
आज पूर्ण कविता इथं देणार नाही. पहिल्यापासून संपूर्ण कविता पुढच्या पोस्टमध्ये देईन. कारण आज मला थोडं कवितेच्या निर्मिती विषयी लिहायचं आहे.
कविता म्हणजे नेमकं काय ? माझ्या मते कविता म्हणजे एक ठिणगी असते लेखकाच्या मनात पडलेली . तिला प्रत्येकवेळी काही कारण असत असं नाही. मन प्रसन्न असतानाही कविता आकाराला येते आणि मन उद्विग्न असतानाही. दोन्हीही अवस्थेत प्रेम कविता लिहिली जाऊ शकते. फक्त त्यांचा बाज वेगळा असतो. दोन्ही अवस्थेत निसर्ग कविता लिहिली जाऊ शकते फक्त त्यांचा आत्मा वेगळा असतो. दोन्ही अवस्थेत ग्रामीण कविता लिहिली जाऊ शकते फक्त त्यांचं बीज वेगळं असत.
कविता लिहिणं खुप सोपं असत का हो ? मला वाटतं नक्कीच नाही. कविता लिहिणं फार अवघड असत. किती अवघड असत कविता लिहिणं ? कोषातून फुलपाखरू आकाराला येणा जेवढं अवघड असत तेवढंच कविता लिहिणं अवघड असत …… आईच्या गर्भातून बाळाचा जन्म होणं जेवढं अवघड असत तेवढंच कविता लिहिणं अवघड असत…… गच्च काळोखातून वाट शोधणं जेवढं अवघड असत तेवढंच कविता लिहिणं अवघड असत……. भर सागरात शीड फाटलेल्या नाखवाला किनारा शोधणं जेवढं अवघड असत तेवढं कविता लिहिणं अवघड असत.
पण कविता निर्मितीच्या या सगळ्या प्रसव वेदना आणि कविता आकाराला आल्यानंतर होणार आनंद जर कोणाला विचारायचा असेल तर बाळाला नुकत्याच जन्म देणाऱ्या आईला विचारा. कविता निर्मितीनंतरचा आनंद कोणाला विचारायचा असेल वासराला जन्म दिल्यानंतर पान्हा फुटणाऱ्या गाईला विचारा. होय ! मीही आज तेवढ्याच आनंदात आहे.
हि कविता लिहिताना एका कडव्यात -
' मनोमनी मी कितीदा केली
पंढरीची वारी. '
अशी ओळ आहे. इथं मनोमनीच का ? त्यातही प्रत्येक ओळीत ' तुझ्याचसाठी ' हा शब्द आला आहे. इथे मात्र तो आला नाही. थोडसं चुकल्यासारखं वाटत होतं. पण इलाज नव्हता. कविता पूर्ण करायची होती आणि आणखी प्रसव वेदना सोसायची माझी तयारी नव्हती.
हि कविता लिहिताना तिचा शेवट -
तुझ्यासोबती गिरवीन मी गे
संसाराचे धडे
हातामध्ये हात जराशी
हळूच दे ना गडे
असा करणार होतो. पण कवितेचा शेवट वेगळाच केलाय. तो कसा आहे आणि कवितेचा शेवट तसा का केला ? याविषयी पुढच्या पोस्टमध्ये.
अप्रतिम सर. कविता म्हणजे काय ? आणि कविता लिहिणं किती कठीण असत ? हे अत्यंत सुंदर शब्दात सांगितलत तुम्ही.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल आभार मित्रा. चार पाच दिवस गावी गेलो होतो. त्यामुळे उत्तर देण्यास उशीर झाला.
Deleteखूप सुंदर सर.
ReplyDeleteकिशोरजी अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
Deleteशब्दांची सुरेख जुळवाजुळव!
ReplyDeleteमित्रा अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. पण आपणास हि शब्दांची नुसती जुळवाजुळव वाटली असेल तर ते माझे दुर्दैव आहे.
Deleteकविता शब्दांची नुसती जुळवाजुळव नसून मनातल्या भावनांची मांडणी आहे आणि ही कविता त्यातलाच एक उल्लेखनीय नमुना :)
ReplyDeleteमनापासून आभार मित्रा.
Delete