चार महिन्यात धनंजय अनेकवेळा भेटला. पण 'अरे माझा कप्पा उघडून बघितलास कि नाही.' असं त्याने एकदाही विचारलं नाही.' त्याला माझ्यासमोरच्या सगळ्या अडचणी माहित होत्या. आणि दुसऱ्याला समजून घेणं हा त्याचा गुण आहे. मला कप्प्यातील कवितांवर फारसं बोलायचं नाही. अथवा मी त्याविषयी बोलावं अशी धनंजयला देखील अपेक्षा नसेल. चार-सहा ओळी लिहिल्या, जरा कुणीतरी कौतुकाची थाप दिली कि खिसा खुळखुळवत कवी काव्यसंग्रह काढतात. पण धनंजयने त्याची कविता परिपक्व होई दिली. आणि त्यानंतरही इतरांच्या आग्रहाखातर काव्यसंग्रह प्रकाशित केला. असं असतानाही आपली कविता नेमकी कोणत्या वळणावर उभी आहे याची जाणीव असल्याची कबुली तो त्याच्या मनोगतात देतो.
समाजातील अन्याय दूर करण्यासाठी मी लिहितो. समाजात मानवतावाद रुजावा म्हणून मी लिहितो. मी जर लिहिलं नाही तर दिन दलितांच्या अन्यायाला वाचा फुटणार नाही असंच अनेक कवींना वाटतं. तर आपण स्त्री लेखिका आहोत, कवयित्री आहोत त्यामुळे आपण स्त्री शोषण, पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीला विरोध, स्त्री पुरुष समानता याविषयीच लिहिलं पाहिजे अशी महिलांची भूमिका असते. वास्तवात या कवयित्रींची स्त्री शोषणाच्या विरोधातील भाषा केवळ कवितेपुरती. यांचं कुठे काही जळत नाही. समाजातील स्त्रीवर बलात्कार होतो तेव्हा या काहीही करणार नाहीत. रोम जळत असताना निरो फिडल वाजवत बसतो तशी या कवींची अवस्था असते. स्त्रीवर बलात्कार होतो, ती यातना भोगते आणि साहित्यक्षेत्रातील निरो, निरोयन्या त्यावर कविता लिहीत बसतात.
मी डोळ्यात मिस्किलपणे हसत बावीस पावसाळे मोजले होते तिनं मात्र डोळ्यात पाऊस आणत बावीस उन्हाळे भोगले होते
या धनंजयच्या ओळी. स्त्रीच्या भोगांची, तिच्या कष्टांची बहुतांश पुरुषांना जाणीव असतेच. स्त्री शोषण, स्त्री पुरुष समानता याविषयी लिहिणाऱ्या बहुतेक स्त्रियांचे पतीदेखील त्यांना तळहातावर झेलत असतात. कपाळावर न दिसेल अशी टिकली लावली अथवा गळ्यातलं मंगळसूत्र काढून जाडंभरडं पेंडम अडकवलं तरी यांना कोणी काही बोलत नाही. तरीही कुणीतरी कुठेतरी स्त्रीवर बलात्कार करतो, कुणीतरी दारू पिऊन स्त्रीला मारहाण करतो म्हणून आमच्या स्त्री लेखिका त्यावर खर्डेघाशी करणार. अरे पण तो बलात्कारी, दारू पिऊन आपल्या बायकोला मारहाण करणारा तुमची कविता वाचतोच कुठे?
कुठाय ती? जी संकटात तुझी सावली होते, दुःखात तुझी माउली होते हुशार असली तरी तुझ्या घरात शोभेची बाहुली होते तुम्ही सारे बंदा रुपया आणि ती स्वतःहून पावली होते
असं एकटा धनंजय म्हणत नाही. स्त्री शिवाय संसाराला अर्थ नाही. याची जाणीव बहुतांश पुरुषांना असते. परंतु स्त्री पुरुष परस्पर पोषक आहेत याची जाणीव अनेक लेकिकांच्या लेखनातून हरवत चालली आहे. अलीकडच्या लेखनामुळे मी माझी मालकीण अशीच भूमिका स्त्रियांमध्ये रुजते आहे. वास्तवात कुटुंबात कोणी कोणाचं गुलाम नसतंच. परंतु स्त्री लेखिकांच्या अततायी लेखनामुळे आपण पुरुषाचे गुलाम आहोत. आणि हि गुलामगिरी आपण झुगारून दिली पाहिजे अशी भावना नव्या पिढीत रुजते आहे. आणि ती आपल्या सामाजिक व्यवस्थेला मारकच आहे.
दाखले द्याव्यात अशा खूप जागा धनंजयच्या कप्प्यात आहेत. स्वतःशी, आपल्या कवितेशी प्रामाणिक असणारा धनंजय माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे. माझ्या मनातील एका कप्प्यात तो कायम राहील.
No comments:
Post a Comment