Thursday, 29 December 2016

नोटबंदी : त्रास कुणाला ? जाच कुणाला ? ( ban of currncy : Who is troubled? Check out who? )


आपली सामाजिक मानसिकता अशी आहे कि आपण जिंकलो यापेक्षा आपल्याला दुसरा हरला याचा अधिक आनंद होतो. आणि म्हणूनच मोदींची पन्नास दिवसांची मुदत संपत आलेली असताना आज दैनिक सामनानं ' नोटबंदीचा निर्णय फसला ' असं सांगत आनंद व्यक्त केला. तर
' मी पन्नास दिवस संपण्याची वाट पहातोय ' असं सांगत शरद पवारांनी दंड थोपटले. जनतेला नोटबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आव्हान केले.  नोटबंदीच्या निर्णयानंतर एकाही राजकीय पक्षाने मोदींची पाठराखण केल्याचे दिसले नाही. कारण मोदींचा पराभव म्हणजे आम्हाला संधी हि एकच आशा विरोधकांच्या\ मनात रुंजी घालत होती.

८ नोव्हेबरला मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला आणि देशात गेली पन्नास दिवस केवळ त्या एकाच विषयाची चर्चा सुरु झाली. खरंतर हा सर्वात्तम निर्णय. देशहित डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला निर्णय. सामान्य माणसाला त्रास झाला खरा. मीही सामान्यच. मलाही त्रास झाला. गेल्या पन्नास दिवसात मला माझ्या बँकेतून अवघे सहा हजार मिळाले आहेत. वेगवेगळ्या एटीम मधून मी दहा ते बारा हजार रुपये काढले आहेत आणि माझा गेल्या दोन महिन्यातला खर्च आहे दोन लाखाहून अधिक. मग कसे दिले मी बाकीचे पैसे. अर्थात चेकने. त्रास झाला. रांगेत दोन दोन तास उभं रहावं लागलं. अनेकदा माझा नंबर आला आणि एटीम मधले पैसे संपले. माझा वेळ गेला. यापेक्षा अधिक माझं नुकसान झालं नाही.

पण विरोधकांनी मात्र जग डोक्यावर घेतलं. आपणच जनतेचे खरे कैवारी असल्याच्या अविर्भावात कंबरेवर हात ठेवले.  मिडीयाने बँकेच्या रांगेत कितीजण मरण पावले याची गणतीच सुरु केली. त्याचं खापरं मोदींच्या डोक्यावर फोडलं. पण त्याच काळात रोड अपघातात किती गेले, कॅन्सरनं किती दगावले याची गणती कोणी केली नाही. बँकेच्या रांगेत यापूर्वी सुद्धा अनेकांना मरण आले असेल पण त्याची आकडेवारी मिडियाकडे उपलब्ध नाही. खरे तर विरोधकांनी आणि मिडीयाने सुद्धा या निर्णयाचे समर्थनच करायला हवे होते. पण आम्हीच किंगमेकर असल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या मिडीयाला जनतेच्या हितापेक्षा टिआरपी मध्ये जास्त रस आहे आणि मोदींच्या विरोधात रान पेटवायला कोणताच चांगला मुद्दा मिळत नसल्याने विरोधक ' साप, साप ' , म्हणत भुई बडवत राहिले आहेत.

अगदी सुरवातीपासून पहा. विरोधकांचे विरोधाचे मुद्दे कोणते होते -

१ ) मोदी परदेश वाऱ्या करतात.
२ ) स्मृती इराणी यांची पदवी
३ ) मोदींनी परदेश दौऱ्यात ड्रम वाजवला.
४ ) मोदींचा सुट

नोटबंदीच्या निर्णयाला विरोध करावा कि करू नये हा पेच विरोधकांना अजूनपर्यंत सोडवता आलेला नाही. काँग्रेसने कंबर कसली आहे खरी पण इतर विरोधी पक्ष स्वतःला काँग्रेसच्या दावणीला बांधून घ्यायला तयार नाही. कारण आपण काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला तर कदाचित भ्रष्टाचारी या आपल्या पदवीवर शिक्कामोर्तब होईल हि भिती एका बाजूला आहेच तर मोदींना विरोध नाही केला तर मोदी आणखी कठोर निर्णय घेतील आणि आपला पाय अधिक खोलात जाईल असा राक्षस दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे काय तर धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. अशी विरोधकांची अवस्था झाली.  

नोटबंदी नंतर अनेक बँक अधिकारी आणि कर्मचारी नव्या नोटांचा काळाबाजार करताना पकडले गेले. हे एकमेव उदाहरण आमची अर्थव्यवस्था किती किडलेली आहे याचा एक अत्यंत घृणास्पद उदाहरण आहे. आम्हाला त्रास झाला तो अशा अधिकाऱ्यांमुळे. आम्हाला त्रास झाला तो नोटबंदीचा निर्णय नीट न समजावून घेणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे. आम्हाला त्रास झाला तो आमची दिशाभूल करू पहाणाऱ्या राजकीय नेत्यांमुळे. आम्हाला त्रास झाला तो एवढ्या पवित्र, प्रामाणिक आणि देशहिताच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी संसद बंद पाडून देशहिताला खीळ घालणाऱ्या विरोधकांमुळे.

त्यामुळेच कोणी काही म्हणो पण मोदींनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा काही स्वार्थापोटी घेतला नव्हता. आणि म्हणूनच मी त्याचं समर्थनच करीन. कारण या निर्णयाचा सामान्य माणसाला त्रास झाला तरी जाच नक्कीच होणार नाही याची आम्हाला खात्री आहे.



6 comments:

  1. खूप दिवसांनी लेख ... खरा नोटबंदी चा त्रास झाला तो बँक कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट्राचारामुळे .. खरे तर त्यांना देश द्रोह च लावला पाहिजे. . मोदीने चांगले काम केले होते पण बँक कर्मचाऱ्यांच्या मुले कृत्रिम नोटा टंचाई निर्माण झाली आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सुजित जी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. उत्तर देण्यास दिरंगाई झाली त्याबद्दल क्षमा.

      Delete
  2. Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. उत्तर देण्यास दिरंगाई झाली त्याबद्दल क्षमा. मित्रा.

      Delete
  3. 35%नोकऱ्या गेल्या ....शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही....छोटे उद्योग बंद पडले....लोकांचे रोजगार बुडाले....देशात चालणारे व्यवहार बंद पडल्याने revenue 50%ने कमी झाला..नोकरी आणि revenue %अजून वाढणार ...अजून 4-5 महिने परिस्थिती सामान्य नाही होणार.... हे झाले तोटे.....फायदे काय झाले???????

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्याची तुम्ही कोणतीही आकडेवारी दिलेली नाहीत. मोघम उत्तराचा काय उपयोग? तरीही अभिप्रायाबद्दल धन्यवाद. उत्तरेस दिरंगाई झाल्याबद्दल क्षमस्व.

      Delete