Monday, 31 October 2016

का उगा मी झुरतो ( love poem : Why am I brood )

मराठी प्रेम कविता , प्रेम कविता , love poem


आपण तिच्यावर खूप प्रेम करत असतो.
आपल्या मनातल्या सगळ्या भावनांचा पसारा आपण तिच्या पुढ्यात मांडतो.
पण ती .......
ती मात्र मी त्या गावीची नाही.
आपला तिचा काही संबंध नाही अशा थाटात आपल्या भावना नजरे आड करते.



खरंतर तिच्या शिवाय अर्थच नसतो आपल्या जगण्याला. पण तिला मात्र काही देणेघेणे नसते आपल्या भावनांशी. तिला भेटाव ....... तिचा हात हातात घेऊन तिच्याशी तास न तास बोलावं ............आपल्या स्पर्शानं तिच्या अंगभर रोमांच उभे रहावेत.......... तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेताना तिच्या मनातून प्रेमाचा दरवळ यावा. या आणि एवढ्याच आपल्या भावना.

पण तिला मात्र सामाजिक चाकोरीची भीती. आपण जीवाची कितीहि आटापिटा केला तरी ती काही आपल्या भावना स्समजून घेणार नाही असे दिसते. अशा कल्पनेतून आकाराला आलेली हि कविता -  

कविता लिहिताना ती किती विचार पूर्वक लिहावी लागते त्याविषयी थोडसं.

हे जगणे कसले वेडे
मी जन्माआधी मरतो
तुझ्याच वेडापायी
मी समंध होऊन फिरतो
या ओळी आधी -

तुझ्याच वेडापायी
मी समंध होऊन फिरतो.
हे जगणे कसले वेडे
मी जन्माआधी मरतो

या क्रमाने होत्या. पण नंतर विचार करताना समंध होणे मरणा नंतरची अवस्था आहे हे लक्षात आले. आणि ओळींचा क्रम बदलला.      

का उगा मी झुरतो

का उगा मी झुरतो
मी प्रीत तुझ्यावर करतो
जुळून येण्याआधी
खोल मनातून विरतो

तू नको नको म्हणताना 
मी तुला व्यापुनी उरतो 
पण सुरु व्हायच्या आधी 
डाव गडे मी हरतो 

मला कळेना का मी 
या प्रीत पखाली भरतो
जे होणे नाही त्याची 
का आस उगा मी धरतो. 

हे जगणे कसले वेडे 
मी जन्माआधी मरतो
तुझ्याच वेडापायी 
मी समंध होऊन फिरतो 

नकोस पाहू माझ्या 
डोळ्यात जराही वेडे 
डोळ्यामधुनी नाही 
मी शब्दामधुनी झरतो. 




No comments:

Post a Comment