Saturday 14 January 2017

तरीसुद्धा जगत असतो ( love poem : Still living )

तरुणाईच्या उंबरठ्यावरचं आयुष्य खूप सुंदर असत......... पंखात बळ भरून आभाळा गवसणी घालावीशी वाटते ....... आपल्याला ठेच लागू शकते याचा विचार न करता वाटेवरच्या दगडाला दूर उडवून द्यावसं वाटतं........खोल पाण्यात डुबकी घेऊन एका दमात तळ गाठवासा वाटतो............जे जे नवं असेल, अज्ञात असेल ते सारं जाणुन घ्यावसं वाटत...........अवती भवती घोंगावनाऱ्या भ्रमरांची तमा न बाळगता
कळीला फुल व्हावसं वाटतं.

तिचं आयुष्यात येणं म्हणजे तर वाळवंटात चांदण्यांची पखरण झाली असेच वाटते आपल्याला...... ती आयुष्यात येते तेव्हा आळवारच्या थेंबाला तळहातावर घ्यावेसं वाटतं ......... तिच्यासोबतच्या प्रत्येक क्षणाला मनमुराद प्यावसं वाटतं..........डोळे झाकून आयुष्य डोंगरकड्याच्या कड्याला न्यावंसं वाटतं.........सारा भवताल विसरलेले आपण ........आपले राहिलेलेच नसतो......... खुपसे तिचे ........खुपसे स्वप्नांचे झालेले असतो.

पण प्रेम म्हणजे फुलपाखरू असतं...........ते सहजासहजी हाती येत नाही ....... आणि धुसमुळेपणा केला तर ........ तर प्रेम गतप्राण झाल्याशिवाय शिवाय रहात नाही. आणि आपलं प्रेम गतप्राण व्हावं असं कुणालाच वाटतं.............म्हणूनच वेळ आलीच तर आपण आपलं प्रेम विसरण्याचा तिच्यापासून दूर होण्याचा विचार करतो पण तिला इजा पोहचू देत नाही.

ती दूर जाते आयुष्यातून तेव्हा आपण पहात रहातो दूर जाणार्या तिच्या पाउलखुणा ......... ती वळून यावी म्हणून पुन्हा एकदा तिला हवंसं फुल होतो.......तिच्या वाटेवर डोळे पसरून तिची वाट पहातो.........तिच्यासाठी पुन्हा पुन्हा तिला हवासा सूर होतो.

पण वेळच अशी आलेली असते कि या कशाकशाचा उपयोग होतो नाही. आणि तिला दूर जाताना तिला पाहण एवढंच आपल्या हाती उरतं. अशी तिची वाट पहात राहण्यालाही आपली हरकत नसते. कारण तिच्याशिवाय अर्थच नसतो आपल्या आयुष्याला. तरीसुद्धा आपण श्वास घेत असतो....... रोज उगवणारा सूर्य पहात असतो कारण ..........कारण एकच.......... आशावाद असतो......... ती पुन्हा आयुष्यात येईल याचा.    

            
वाटेवरती डोळे पसरून
तुझी वाट पहात आहे
आयुष्यातला प्रत्येक राग
तुझ्याचसाठी गात आहे.

तुझ्याविना आयुष्याला
तसा काही अर्थ नसतो
तुझ्याविना कोकिळेचा
सुरसुद्धा व्यर्थ असतो.

तुझ्याविना वसंतातला
बहरसुद्धा नको नको
तुझ्याविना श्रावणातली
सरसुद्धा नको नको

तुझ्याविना श्वास नको
तुझ्याविना भास नको
तुझ्याविना अवती भवती
चांदण्यांची रास नको

तुझ्याविना जगणे म्हणजे
पाण्याविना धरण असते.
तुझ्याविना जगणे म्हणजे
धगधगणारे सरण असते.

तरीसुद्धा जगत असतो
उद्या सर येईल म्हणून
तुझे माझे मिळून आपले
एक घर होईल म्हणून.

No comments:

Post a Comment