Friday, 24 February 2017

पुन्हा जिंकलोत ............

 
कधीकाळी गावाकडे आमच्या घरात पाटीलकी होती. पण जिथं अनेक ठिकाणी राजघराण्याच्या खुणा पुसट झाल्या, सरंजामशाही लयाला गेल्या , तिथं पाटीलकीची कोणाला तमा ! ' हा ! ' गावाकडे अनेकजण आजही शेंडगे पाटील अशी हाक मारतात. पण शहरात स्थिरस्थावर झाल्यानंतर पाटीलकीची हाक केवळ गावापुरतीच उरली.

ही दोन पिढ्यापूर्वीची पुसट झालेली पाटीलकी सोडली तर
राजकारण हा आमच्या घराण्याचा वारसा नाही. पण पुण्यात आलोत. स्थिर झालोत. शिकलोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागलोत. सामाजिक जाण आली. त्यामुळे मी लेखनाकडे वळलो तर दोन नंबरचे बंधू संजय शेंडगे समाजकारणाकडे. ते घरदार विसरून अखिल भारतीय परिषदेचं काम करू लागले. राष्ट्रीय स्वयं संघात सक्रीय झाले. संघाला दोन नंबरच्या बंधूंच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी टाकण्याची इच्छा होती. पण त्यासाठी संघानं त्यांना अजन्म अविवाहित राहण्याची अट घातली. घरचे ' नाही ' म्हणाले. त्यामुळे सरांनी स्वतःच्या आशा आकांक्षांना मुरड घातली. पण स्वस्थ बसले नाहीत. ' ज्ञानराज विद्याप्रसारक मंडळ ' ही शिक्षण संस्था उभारली. त्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय सुरु करून ज्ञानदानाचे काम सुरु केले.

सर पुण्यात महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेत नौकरीला होते. पण स्वतःची संस्था मोठी करायची होती. त्यासाठी स्व नावे बँकांची कर्जे काढली. त्यांचा येणारा सगळा पगार ती कर्जे फेडण्यात मुरत गेला. पण घरातल्या प्रत्येकाने साथ दिली. आणि पाहता पाहता ज्ञानराज मोठी झाली. हजारेक विद्यार्थी ज्ञानराजमध्ये शिकू लागले. आणि बघता बघता समाजाने सरांना राजकारणाच्या बोहल्यावर उभे केले.

पण राजकारणाचा अनुभव नव्हता. राजकारणात गरजेची असलेली मुत्सद्देगिरी अंगात नव्हती. वेळ आल्यानंतर उपसावं लागणारं गुंडगिरीचं हत्यार जवळ नव्हतं. त्यामुळे दोन अनपेक्षित पराभव पत्करावे लागले. पण शेवटी जिंकलोत.

बरोबर पाच वर्षापूर्वी मी माझ्या , ' रे घना ' या ब्लॉगवर त्या संदर्भात ' होय ! अखेर जिंकलोत '  पोस्ट लिहिली होती. आमचा वार्ड महिला राखीव झाल्यामुळे बहिणीच्या हातात राजकारण सोपवलं होतं. पण सरांनी उभ्या केलेल्या राजकारणावर तिने कळस चढवला. झटून काम केली. सत्तधारी राष्ट्रवादिच्या राजकारणावर सडकून टीका केली. माध्यमांनी तिच्या कामाची दखल घेतली. पाच वर्षे संपली.

पुन्हा निवडणुका आल्या. वार्ड पुन्हा महिला राखीव झाला. पुन्हा बहिणीला उभं केलं. चव्वेचाळीस हजार मतदार संख्येचा प्रभाग. त्यातही निम्म्याहून अधिक गोरगरीब झोपडपट्टीधारक. आमचे रिकामे खिसे आणि समोर पैशाच्या बळावर मतदारांना खरेदी करू पहाणारे दंड धोपटून उभे असलेले  धनदांडगे. आमच्या हातातलं राजकारण हिसकावण्यासाठी एक झालेले स्थानिक गुंठामंत्री. पण पुन्हा जिंकलोत.

माझ्या बहिणीनं एक आदर्श नगरसेवक म्हणून पाच वर्ष काम केलं आहे . त्यासाठी तिला आण्णासाहेब मगर फौंडेशनचा आदर्श नगरसेवक हा पुरस्कारही मिळाला. त्या लौकिकावर ती कळस चढवेल ही अपेक्षा आणि विश्वास.           
                      

No comments:

Post a Comment