Thursday, 19 March 2015

मी स्वप्नंच पेरत जातो

अलिकडे राजकीय लिखाणाच्या घाईगर्दीत माझी कविता काहीशी मागे पडतेय. म्हणजे कविता लिहिणं होत नाही असं नाही. पण कविता पोस्ट करणं होत नाही. मी शिक्षणानं अभियंता आहे. एका बहू देशीय कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होतो. निवृत्तीसाठी चौदा पंधरा वर्षाचा अवकाश होता. तरी मी राजीनामा दिला. गावी जाऊन शेती करू लागलो. कुटुंब पुण्यात. गावाकडे मी मात्र एकटाच.

खूप अडचणी आल्या. ऊन, पाऊस , दुष्काळ, बाजारभाव या साऱ्या गोष्टींचा अनुभव घेतला. पिढीजात शेतकरी असुनही शेतीविषयी फारशी माहिती नव्हती. पण मी मातीशी एकरूप झालो. पहिल्या पावसाबरोबर मातीतून अंकुरलो.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पाऊस वेळेवर आला नाही नाही तर मी पिकांशी बोलायचो. त्यांना गोंजारायचो. सुकू लागलेल्या पानांकडे पाहुन माझ्या डोळ्यात पाणी यायचं. तरी मी त्यांना त्यांना धीर द्यायचो. माझा नाईलाज झाल्याचं सांगायचो.

भेंडी ४० रुपये किलोनेही विकली तेव्हा लाखाचा फायदा झाला. पण पुन्हा भेडी केली तेव्हा ६ - ७ रुपये किलोने विकावी लागली आणि केलेला खर्चही परत आला नाही. मजूर मिळत नाहीत. घरचं कोणी हाताशी नाही. पण मी एकटाच झुंजत होतो. कष्टला फळ नाही असं होत नाही. या वर्षी मात्र सहा लाखाचा उस गेला. स्वप्नांना नवे अंकुर फुटताहेत हे लक्षात आलं. आणि म्हणुन परवा माझ्याही नकळत माझी 'मी स्वप्नंच पेरत जातो हि कविता आकाराला आली. अजून खुप काम बाकी आहे. इतरांनी पहात रहावी अशी शेती आकाराला आणायची आहे. ' हिंमते मर्दा तो मददे खुदा ' हा विश्वास आहे. त्यामुळेच मी खुशाल मातीशी झुंज घेणार आहे.

मी मातीशी किती एकरूप झालो असेल याची साक्ष देणाऱ्या , ' मातीचीच वात ' , ' काळ्या आईचीच पोरं ' ' होई आता थेंब ' अशा काही कविता या कालावधीत लिहिल्या गेल्या. ' टाहो ', ' विटाळ ' हे ललित लेखही गावाकडच्या वास्तव अनुभवावर आधारित आहे. ते सवडीने पोस्ट करीन. पण ' मी आणि माझा बैल ' , ' दिवाळी माझ्या बैलाची  ' , ' प्राण्यांची कामभावना ' , ' सापांचा शृंगार '  हे लेख तिथल्याच हुंकारशी नातं सांगणारे.

अनेकांना हे लेखन मनापासून आवडेल. आशा आहे कि ' मी स्वप्नंच पेरत जातो ' हि कविताही रसिकांना मनापासून आवडेल.                            

मी स्वप्नंच पेरत जातो………. 

आता मी गहू, ज्वारी पेरतच नाही मातीत
आता मी मातीत स्वप्नच पेरत जातो
घाम तर जिरतोच माझा मातीत
कधी कधी तर मीच जिरत जातो.

पहातो मातीला आतून आतून
माती एकसारखीच इथून तिथून
माणसासारखी नाही
वेगळी आतून वेगळी बाहेरून.

मी मातीत पेरलेल्या स्वप्नांना
आता अंकुर फुटू लागलाय
भोवतालच्या काळोखाचा
तोल सुटू लागलाय.

आता माझ्या स्वप्नांना

फांद्या फुटतील, कळ्या येतील
माझ्या घामाच्या स्पर्शानं
त्या कळ्यांची फुलं होतील.

फुलांच्या कुशीत आकाराला
येतील खुप फळं
आयुष्याला पडलेली
बुजविण म्हणतो बीळं.

स्वप्नाची फळं मी
घेऊन जातो बाजारात
स्वप्न पाठीशी टाकुन
येतो हलवीत हात.

शेतकऱ्याची स्वप्न सुद्धा
कुठेच विकत नाहीत
रोजचा घास मातीशिवाय
जरी पिकत नाही.

तरी मी पुन्हा पुन्हा
स्वप्नं पेरत रहातो
मातीवरती उभं राहुन
आभाळ कवेत घेतो.











6 comments:

  1. किशोर दळवी25 March 2015 at 14:10

    अप्रतिम

    ReplyDelete
    Replies
    1. किशोरजी अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete
  2. मनाच्या तळातून आलेली कविता.

    ReplyDelete
  3. मी आपला ब्लॉगला पहील्यांदाच भेट दिली.
    अप्रतीम हा एकच शब्द आपल्या ब्लॉग विषयी

    ReplyDelete
    Replies
    1. संजीव जी , आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार. त्यातही इतक्या जुन्या लिखाणावर नेमके मत व्यक्त केलेत म्हणुन धन्यवाद.

      Delete