Gramin Kawita, marathi kwita, ग्रामीण कविता
अलिकडे जो उठतो तो शहराकडे धाव घेतो. शिक्षण असो वा नसो पण शहरात जायचं. पडेल ते काम करायचं. मिळेल तेवढा पगार घ्यायचा. जमेल तसं जगायचं. पण शहरात जायचं. आठ तास काम........सोळा तास आराम. शिवाय छान - छोकी. मौज - मजा, हिंडण - फिरणं, झकपक रहाणं, नुसती एैष. ज्याची त्याची भुमिका
एवढीच. त्यामुळे प्रत्येकजण शेतीकडे पाठ फिरवू लागलाय. जो उठतो तो शहराकडे पळतोय.
तरुणांना कष्ट नकोत. कमी श्रमात आधी पैसा हवाय. त्यामुळे ते शेतीकडे पाठ फिरवताहेत. पण तरुण शेतीकडे पाठ फिरवतात त्याला तेवढा एकमेव कारण नाही.
\शेतीत प्रचंड अनिश्चितता आहे. पाऊस हातात नाही. बाजार भाव हातात नाही. पिकांवरील रोगराई हातात नाही.
शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतकऱ्यांचेच आहेत. त्यांच्या अडचणी सोडवणारे कुणीच नाही. विरोधो पक्ष फक्त भांडवल करणार शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे. उदयापासून कांदा ५० रुपये किलो आणि मेथीची गड्डी १५ रुपयाला मिळू लागली तर हे विरोधकच महागाई वाढली म्हणुन बोंब ठोकणार. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे असा सूर धरायचा आणि शेतकऱ्याला भाव मिळाला तर महागाई वाढली अशी बोंब ठोकायची.
बँक शेतकऱ्याला कर्ज देत नाही. वीज महामंडळ शेतकऱ्याला पुरेशी वीज देत नाही. सरकार शेतमालाला पुरेसा भाव देत नाही. वाहतूकदार शेतकऱ्यांची अडवणूक करणार , अडते शेतकऱ्याला वेठीस धरणार , छोटे विक्रेते शेतकर्याचे नाक दाबणार. कोण करणार शेती ? कशासाठी करणार शेती ?
पण तरुण तरुण पिढी परिस्थितीला तोंड देण्याऐवजी परिस्थितीकडे पाठ फिरवतेय ते मला पटत नाही. त्यांनी खरंतर या या सगळ्या व्यवस्थे विरोधात लढा उभारायला हवा. जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं संघटीत व्हायला हवं.
पण तसं होत नाही. तरुण संकटाकडे पाठ फिरवतात. परिस्थितीपासून pl काढतात. शहराकडे पळतात. गावच्या गाव ओस पडू लागली आहेत. शहरात बकालपणा आणि झोपडपट्टी वाढू लागली आहे.
आज मी गेली पाच वर्ष गावी आहे. पुण्यातली चांगल्या पगाराची, चांगल्या पदावरची , बहुदेशीय कंपनीतली नौकरी सोडून गावी गेलो. अनेक अडचणी जवळून पाहिल्या. कधी पाऊस नसतो. कधी पाणी नसतं. कधी पाणी असत पण लाईट नसते. पिक चांगलं आलं तर भाव नसतो. भाव असला तर महामारी यावी तसा एखादा रोग येतो आणि चांगलं पिक हातातून जातं. कपाळाला हात लावायची वेळ येते. पण मी हार मानली नाही. परिस्थितीशी झगडतोय. एक दिवस तिच्यावर मत करीन हा विश्वास आहे.
मी गावाकडचा बकालपणा अनुभवला आहे आणि शहरातलाही. पण गावाकडे जो आनंद आहे तो शहरात नाही हेही अनुभवलं आहे. मान्य आहे ग्रामीण भागातल्या माणसाची मने आता अधिक कोती झाली आहेत. त्याला नात्यांचं भान नाही. परस्परांविषयी प्रेम नाही. गोड बोलेल पण मनाचं थांग लागू देणार नाही. जे ओठावर असेल तेच मनात असेल याचा भरवसा नाही. त्याला दुसऱ्याविषयी आदर नाही. स्वार्थाच्या पलिकडे त्याचा विचार नाही आणि स्वतःच्या पलिकडे त्याची धाव नाही. दुसऱ्याच चांगलं व्हावं अशी त्याची भावना नाही. तो चार बोटं बांधासाठी भांडत रहाणार. एखाद्याच्या विहिरीला अथवा बोरला पाणी लागलं कि दुसरा लगेच त्याच्या शेजारी विहीर अथवा बोर धरणार. त्याचं पाणी कमी झालं आणि ते याच्या बोरमधे आलं कि हा खुष. त्याला वीज हवी असते पण विजेचं बिल भरावं असं त्याला कधीच वाटत नाही. त्याला पाणी हवं असत. त्यासाठी पैसे द्याची त्याची इच्छा नसते. फुकट जे जे मिळेल ते ते त्याला हवं असत. त्याला नदीकडेची अथवा ओढ्याकडेची शेती हवी असते. त्याला ओढ्याच पाणी हवं असतंच पण त्याला ओढ्यात अतिक्रमण करून तिथं आपला हक्कही प्रस्थापित करायचा असतो. त्यामुळेच शहरातले ओढे नामशेष झाले तर गावाकडचे अरुंद.
शेतकऱ्यालाच फसवणारे आणि परस्परांना खड्ड्यात घालणारे शेतकरी मी फार जवळून पाहिले आहेत. पाच वर्षात एकविचाराने वागणारे शेतकरी मी फार अभावाने पाहिले आहेत.
मग असं असतानाही मी गावाकडे आनंद आहे असं का म्हणतोय ? गावाकडे आनंद आहे तो नवनिर्माणाचा. मातीच्या कुशीतून तरारणारे कोंब पहिले कि मनाला अंकुर फुटतात. उभ्या पिकाने सळसळणारी माती पाहिली कि मनाला फार आनंद होतो.
शहरात करतो काय आपण ? एक तर काळ्याचे पांढरे करतो अथवा जमतील तशा पाट्या टाकतो. नवनिर्माण करणारे शहरातही असतात पण ते मोजके. बाकीचे करतात ते काम.
असो. ज्यांना शेतीच नाही त्यांचा प्रश्नच नाही. त्यांना शिकण्याशिवाय अथवा पडेल ते काम करण्याशिवाय पर्यायाच नाही. पण ज्यांना शेती आहे त्यांनी मात्र शेतीकडे पाठ फिरवू नये. शिकावं खूप शिकावं आधुनिक पद्धतीने शेती करावी. संघटीत व्हावं. शेतकऱ्याचं कंबरडं मोडू पहाणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात उभं रहावं. परिस्थितीपासुन पळून जाण्याऐवजी परिस्थितीला तोंड द्यावं असं वाटतं.
त्यासाठी हि कविता.
थोडं स्पष्टीकरण रसिक वाचकांसाठी.
' वीजं नाही मोटारीला, मोटं धरावी म्हणतो,
कष्ट सोसवेना आता, बैल गोठ्यात कण्हतो. '
या ओळी कशा आल्या ? आणि मला नेमके काय म्हणायचं आहे ?........
बऱ्याचदा वीज नाही म्हणून आणि त्यामुळे पिकाला पाणी देता आलं नाही म्हणून जळून जाणारी पिकं मी पाहिली आहेत. वीज नसताना मोट धरून पिकाला पाणी देणं हा पर्याय असतो हाती. पण मोट आता विस्मृतीत गेली आहे. मोटेच पाणी सामावून घेणारे थारोळे आता विहीरीवर उरले नाहीत. आणि ज्यावर मोटेचे बैल चालतात ती सारणही कुठे उरली नाही. ज्याप्रमाणे आधुनिकीकरणा मुळे माणसाची कष्टाची सवय मोडली आहे त्याचप्रमाणे मोट ओढायची सवय मोडल्यामुळे आता मोट ओढणे बैलाला नकोसे वाटते आहे.म्हणून मोट ओढायची वेळ आली आहे असे दिसताच , ' कष्ट सोसवेना आता ' गोठ्यातला बैल म्हणतो आहे.
त्याच वेळी गोठ्यात कहणणारा हा बैल शेतीतल्या कष्टाकडे पाठ फिरवुन शहरातल्या गोठयात स्थिरावू पहाणाऱ्या ग्रामीण तरुणाईचे प्रतिक आहे.
काळ्या आईचं हे वारं, पोरं अंगावं घीईना,
काळ्या आईचीच पोरं, काळ्या आईला पीईना.
इथे काळ्या आईचं वारं असं का म्हणतोय मी ? एखादा आपल्याला जवळ येऊ देत नाही तेव्हा वापरला जाणारा ' जरा वारं लागू देत नाही ' हा वाक्प्रचार प्रत्येकाला माहित असेल. पण इथलं वारं ते नाही.
अंगात येणं म्हणजे काय हे अनेकांना माहित असेल. ग्रामीण भागात अनेकांच्या अंगात देव आणि देवी येतात. हि देव अंगात येण्याचा जो भाग असतो त्याला देवाचं वारं म्हणतात. हे वारं घेणाऱ्याच्या अंगात देव येतो. अर्थात प्रत्येकालाच देवाचं वारं अंगावर घेता येतं असं नाही. जो ज्या देवाचं वारं अंगावर घेतो त्यानं त्या देवाची नियमित सेवा करायची असते.
काळी आई हि देव आहे. आणि तिचं वारं तरुणांनी अंगावर घ्यावं. आणि शहराकडे धाव घेण्याऐवजी काळ्या आईची सेवा करावी असे मला म्हणायचे आहे.
काळ्या आईचीच पोरं
वीज नाही मोटारीला, मोटं धरावी म्हणतो,
कष्ट सोसवेना आता, बैल गोठ्यात कण्हतो.
काळ्या आईची मी कशी, सांग भरावी रं वटी,
पावसाचं पोट बघ, पारं लागलंया पाठी.
काळ्या आईचं हे वारं, पोरं अंगावं घीईना,
काळ्या आईचीच पोरं, काळ्या आईला पीईना.
पोरं जाता शहरामंदी, रानं होतं रं म्हातारं,
सोन्यासारख्या मातीचं, पारं होतं रं पोतेरं.
थोरा मोठयांना विकती, पिकणारी काळी माय,
दावणीची कसायाला, आणि विकती रं गाय.
का दावू रे पोरांनो, काळ्या आईलाच पाठ,
गावाकडची रे सारे, चला पुन्हा धरा वाट
पुढल्या वरसाला सारं, मनासारखं होईल,
म्रीग होउनिया विठु, आणि वक्ताला येईल.
lekh aani kavita donhi manala khup bhavli. gramin bhagat jenvha jato theva tethil manasatil badal pahun vishann hoto. tyachech varnan tumchya lekhaat ahe. kay karave ya sthila?
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार रविंद्रजी. हि स्थिती बदलणे फार अवघड आहे. या माणसांसमोर ज्ञानेश्वरी धरा अथवा गीता.यांच्या वृत्तीत बदल होणार नाही.
Delete