Wednesday, 21 June 2017

उद्धव ठाकरेंचं गळचेपी राजकारणबाळासाहेब गेले आणि शिवसेनेला घरघर लागली. शिवसेनेच्या लोकसभेच्या यशात ' मोदी लाट ' हा प्रमुख घटक होता हे उद्धव ठाकरेंनी कधीच मान्य केलं नाही. आणि बेडकाचा बैल झाल्याप्रमाणे वागू लागले. नसलेली शिंग तो कुणावरही उगारू लागले. बाळासाहेब किंगमेकर होते. उद्धव ठाकरेही
स्वतःला किंग मेकर समजू लागले. महाराष्ट्रातल राजकारण नीट साधेना आणि देशाच्या राजकारणाची सूत्र हलविण्याची स्वप्नं बघू लागले. मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसताना आपल्या कनातीच्या दोऱ्या आपणच कापू लागले.

विधानसभेला भाजपसारख्या सगळ्या प्रकारचे चढ उतार पाहिलेल्या राष्ट्रीय पक्षाला दुय्यम वागणूक देऊ लागले. पंतप्रधान असो वा अन्य कुणी ' मी सर्वश्रेष्ठ ' अशा थाटात ते वावरू लागले. ' मातोश्री ' ही देशाची राजधानी असल्याप्रमाणे ' मी माझ्या सिंहासनावरून पायउतार होणार नाही. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मातोश्रीवर ' या अशा वल्गना करू लागले. महाराष्ट्रातली सत्ता स्वबळावर मिळविण्याची वल्गना करत विधानसभेला पंचवीस वर्षाची युती तोडून मित्रपक्षाशी काडीमोड घेतली. ' स्वबळावर सत्ता मिळविणाऱ्या उद्धवरावांना जेमतेम ६३ जागा जिंकता आल्या. तर भाजप ४६ वरून १२२ वर पोहचली. तरीही उद्धव ठाकरेंची टांग उपर.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत तर उद्धवराव भाजपच्या लायकीपर्यंत पोहचले. पुन्हा स्वबळावर सत्ता मिळविण्याची स्वप्नं पाहिली. पण गेली २५ वर्ष मुंबईत सत्तेत असूनही शिवसेनेला भाजपपेक्षा इनमिन दोन जागा जास्त मिळविता आल्या. खरंतर हा उद्धव ठाकरेंचा फार मोठा पराभव होता. पण तरीही , " मला विजयाचा आनंद घेऊ द्या. " म्हणत आपण फार मोठा तीर मारला आहे अशा अविर्भावात वावरत राहिले.

समोरच्याला आपल्या पायावर लोळण घ्यायला लावणे हा खरा उद्धव ठाकरेंचा स्वभाव. त्यामुळेच राष्ट्र्पदी पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे नेहमीच भाजपच्या विरोधी भूमिका घेत राहिले. भाजपनं सुचविलेला उमेदवार नाकारून भलतीच नावं पुढे करू लागले. त्यांचे कोणतेही डावपेच कामास येणार नव्हते. पण मी मातोश्रीवरून देशाच्या राजकारणाची सूत्रे हलवू शकतो असा आभास त्यांना निर्माण करायचा होता. रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे येताच ' भाजप जातीच राजकारण करते आहे. ' असं उद्धव ठाकरे म्हणू लागले. पण मोहन भागवत यांचं नाव पुढे करताना ' आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत. ' आणि ' स्वामिनाथन यांचं नाव पुढे करताना आम्हाला शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे. ' हे भासविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत नव्हते का ?

रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे येताच आपल्याला त्यांची उमेदवारी मान्य नसल्याचे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी दुसर्या दिवशी पक्षाची मिटिंग घेतल्याचे नाटक केले आणि भाजपने सुचविलेल्या उमेदवाराला पाठींबा दर्शविला.

मला एक कळत नाही हा माणूस आणखी किती वेळा तोंडावर पडणार आहे. देशातील जनतेला अच्छेदिन आज नं उद्या येतीलच पण शिवसेनेचे बुरे दिन मला फार जवळ आलेले दिसत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं अन्यथा लवकरच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे झालेला दिसेल यात शंका नाही. तसं होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. उद्धव ठाकरेंचं काही जाणार नाही. तळागाळातला  शिवसैनिक निराधार होईल.                     

         

No comments:

Post a Comment