Friday, 4 July 2014

Love Letter : आईनस्टाइनचा सिद्धांत आणि प्रेमपत्र


तुझं पत्र वाचलं.

तू लिहिलंस, " किती दिवस झाले पत्र पाठवलं नाही " मी खुप दिवसात तुला पत्र पाठवलं नाही म्हणजेच मला तुझा राग आला असावा अशी शंकाही येतेय तुला. आणि ती तू पत्रात बोलूनही दाखवली आहेस.

वेडूबाई, राग वगैरे असं काही नाही. आणि त्याहीपेक्षा खरं सांगू पुरुषांना रागावताच येत नाही.


शनिवारी रविवारी गावी शेतावर गेलो होतो. दोन चार दिवस नेटला स्पीडच नव्हता. मध्ये तुला पाठवलेली अर्धवट भाषांतर झालेली मेल आठवतेय ना.

आज सारं काही व्यवस्थित चाललय.

मेल पाहिलेली होतीच पण माझ्या पत्राला ( मेलला ) तुझं उत्तर आलेलं नव्हतं. माझ्या पत्राला तुझं उत्तर नं येता मीच कसं तुला पत्रभांडासारखा ( बोलभांड याप्रमाणे पत्रभांड ) पत्रावर पत्र लिहित राहू. आणि त्यातूनही आपली पत्र म्हणजे ' मुळं नसलेली झाडं ' ( मायना नसलेली) रुजणार कशी ? अगं हा आयुष्याचा डोंगर चढायचा म्हणजे आपल्या पत्राला दोन्ही बाजूनी इंजिन ( मायना ) हवाच ना. बरं तू लिहितेस तेही अगदी त्रोटक.

" हा, ह्या गोळ्या........ ह्या सकाळी दोन घ्या, ह्या दुपारी दोन  घ्या आणि हि गोळी रात्री जेवल्यानंतर घ्या. " असं एखाद्या कंपाउंडरनं रोग्याला सांगावं तसं काहीसं वाटत तुझं पत्र वाचताना. ( इथं कंपाउंडर " तू " आहे बरं का ! )

" विसरू नकात हं !" असं तू लाडे लाडे सांगितलं असतं तर काही बिघडलं असतं का ? पण नाही !!! तू असं लाडेलाडे मुळीच सांगणार नाही. तू तसं केलंस तर हा रोगी लवकर बरं होणार नाही का ?

आजचं पत्र मात्र त्याला अपवाद हं !

आजचं तुझं पत्र वाचताना मात्र तू माझ्या पत्राची मनापासून वाट पहातेस हे मनापासून पटलं. ( ' वाक्यात दोनदा नकार आला कि होकार ' या व्याकरणाच्या नियमाप्रमाणे आत्ताच्या वाक्यात दोनदा ' मनापासून ' शब्द आलाय म्हणून त्याचा उलटा अर्थ काढू नये. )

तू लिहिणार नसलीस तरी मी मात्र आजपासून आपल्या पत्राला मायना लिहणार बरं का !!!!

आधी " प्रिय ".............. आणि शेवटी " तुझाच "

रागावू बिगवू नकोस हं !!!

चल, जाऊ दे रागावलीस तर रागावलीस. करून करून काय करशील ? पत्रच फाडून टाकशील ना ? टाक फाडून.

अरे पण...... हे तर ईपत्र. हे कसं फाडता येईल तुला.

काय म्हणलीस ?

येतंय, येतंय............ऐकायला मला. " डिलीट करून टाकीन " असंच म्हणालीस ना.

टाक, टाक डिलीट करून. जाऊन जाऊन जाईल कुठं ते ? trash बॉक्स मध्येच ना ! मला महिती आहे तिथून ते तू पुन्हा रीलोड करून घेशील आणि पुन्हा पुन्हा वाचून आपल्याच मनाशी हसत बसशील.

काय म्हणलीस पुन्हा ? मला तुझ्या मनातलाही ऐकायला येतंय म्हणून काही अगदी मनातल्या मनातही हळू बोलू नये माणसानं. बोल, बोल, कितीही हळू बोल. अगं जिथं तुझ्या मनाची स्पंदनंही ऎकायला येतात मला तिथ तू कितीही हळू बोललीस तरी ऐकू आल्याशिवाय रहाणार आहे का ?

" सांग, बरं मी काय म्हटलं ते " असंच म्हणालीस ना आत्ता ?

" आत्ता नाही रे, त्याच्या आधी काय म्हणाले ते सांग " असंच म्हणालींस ना.

" बस कर ना, कळलं मला तुला माझ्या मनातलाही ऎकायला येतंय ते. आता सगळ्यात आधी काय म्हणाले ते सांग." हे पण ऐकलय. आता सुरुवातीला तू काय म्हणालीस ते सांगतो, " तू म्हणाली होतीस, मी trash बॉक्स मधूनही डिलीट करून टाकीन ते पत्र. बरोबर कि नाही ?"

" बरोबर." असंच म्हणालींस ना आत्ता.

" टाक. टाक trash बॉक्स मधूनही डिलीट करून. काय फरक पडणार आहे त्यामुळे. अगं, आपली पत्र म्हणजे एनर्जी ( energy - उर्जा ) असतात. आणि विज्ञान तर शिकलीस आहेस तू ."

आईनस्टाइनचा " low of Consevetion of energy " माहितीच असेल तुला -

" उर्जा जशी निर्माण करता येत नाही तशीच ती नाहीशीही करता येत नाही. फार तर फार ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरीत करता येते."

त्यामुळेच तू trash बॉक्समधून डिलीट करून टाकलेल्या माझ्या पत्राचं होऊन होऊन काय होईल ? ते तुलाच पुन्हा वाचावसं वाटेल. आता सांग, काय करायचं ठरवलंय माझ्या पत्राचं.

" पुन्हा पुन्हा वाचायचं. " असंच म्हणालीस ना ?

मग, येतंय ना मला तुझ्या मनातलं ऎकायला ?

6 comments:

  1. Replies
    1. समिधा, तू माझ्या पोस्ट गुगल प्लसवर नेहमीच लोड करतेस. पण आज प्रथमतः च तू माझ्या पोस्टला स्वतंत्रपणे प्रतिक्रिया लिहिलीस. तू शिक्षिका आहेस म्हणूनच तुझी प्रतिक्रिया अधिक सविस्तर आणि समीक्षणात्मक असावी ही अपेक्षा. तुला, 'श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?' ही पोस्ट आवडेल ही अपेक्षा.

      Delete
  2. chan olkhta manatl bryach post wachlya tumcha mast lihita

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Jyoti. keep reading. your comments are pleasure for me.

      Delete
  3. Khup chan.
    Manatlya bhavnancha surekh sangam tumchya likhanatun anubhvyas milato....!!!

    ReplyDelete
    Replies
    1. निलजी, आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. आपण एकाच दिवशी माझे बरेच लेखन वाचल्याचे दिसते. आपण माझ्या ब्लॉगला असेच नियमित भेट दयाल आपले योग्य अभिप्राय नोंदवल हि अपेक्षा.

      Delete