Friday, 28 February 2020

खरंच कोणी बांधला ताजमहाल? - भाग १






परवाच 'ताजमहाल' हा 'तेजो महालय' असल्याची एक पोस्ट वाचण्यात आली. त्यानुसार थोडा शोध घेतला. जे हाती आलं तेच सत्य आहे असं मी मुळीच  म्हणणार नाही. परंतु आजवर जो इतिहास आम्ही शिकलो त्याविषयी मनात शंका निर्माण होते. मुळात इंग्रज राजवटीत आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेसच्या सत्ताकाळात पुढील पिढीच्या मनावर काय बिंबवायचे हे ठरवून
अभ्यासक्रमाची रचना केली गेली. अकबर हा हिंदू प्रेमी आणि हिंदू धार्जिणा मुस्लिम सम्राट होता असे शिकवण्यात आले. अकबर बिरबलाच्या गोष्टी पेरण्यात आल्या. हिंदू बिरबल, मुस्लिम अकबराच्या दरबारी सेवक दाखविण्यात आला. त्या गोष्टी आम्ही स्वीकाराव्यात म्हणून अकबर काहीसा वेंधळा तर बिरबल चतुर दाखविण्यात आला. त्या गोष्टी शिकवताना बिरबल चतुर होता हे आम्ही आमच्या मुलांच्या मनावर बिंबविण्यात धन्यता मानत असलो तरी तो एका मुघल सम्राटाचा ताबेदार होता हेही आम्ही आमच्या मुलांच्या मनावर बिंबवतो आहोत याचा आम्हाला विसर पडला. 

मुळात इंग्रज राजवटीत आणि स्वातंत्र्यातोत्तर काळानंतरच्या साठ वर्षाच्या कांग्रेस राजवटीत  त्यांनी त्यांना हवा त्या रीतीने इतिहास रंगवली. ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा त्यांना हवा तसा प्रभाव समाजावर पाडण्यासाठी प्रयत्न केला. अनेक इंग्रज अधिकारी कसे दयाळू अंतःकरणाचे होते. आणि भारतीय जनतेला स्वातंत्र्य मिळायला हवे याचा त्यांनी कसा सहानुभूतीने विचार केला हे सांगितले गेले. त्याचवेळी सांगताना भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचा स्वातंत्र्यलढा कसा कुचकामी होता हेही पटवून देण्याचा प्रयत्न झाला. तसेच काही इंग्रज अधिकाऱ्यांनी सहानुभूती दाखविली नसती तर भारतीयांना कधीही स्वातंत्र्य मिळाले नसते हे सांगण्याचा हेतू त्या इतिहास लेखनात आणि त्यासाठी रचलेल्या अभ्यासक्रमात होता. 

आजही ते घडते आहे. एखाद्या राज्यातले सरकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील पाठाचा अभ्यासक्रमात समावेश करतो. तर सावरकरांच्या विचारांना विरोध करणारे सरकार सत्तेत आले कि तो पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात येतो. का होते असे? कारण एकच असावे कोणाला तरी या जगावर असलेला हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव संपवायचा आहे.   

काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर रचलेली एक कविता सादर केली. उपस्थितांनी टाळ्या पिटल्या. पण कविता म्हणून ती कविता अत्यंत सुमार होती. परंतु त्यांनी ती कविता सादर करून आजच्या नेत्यांना सुद्धा अशी भाटगिरी करावीशी वाटते हे दाखवून दिले. आज देशात लोकशाही असूनही तुम्हाला तुमचा स्वार्थ साधायचा असेल तर तुमच्याहून मोठ्या नेत्याचे गुणगान करावेच लागते. मग त्यावेळच्या राजा महाराजांनी आपापल्या पदरी बाळगलेल्या लेखकांना, शाहिरांना, कवींना आपल्या राजाची स्तुती कवने लिहिणे भागच होते ना. त्यामुळे वास्तव बाजूला ठेवून राजाचे व्यक्तिमत्व मोठे करण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून झाला असण्याची शक्यता कशी नाकारता येईल. पुढील पन्नास, शंभर वर्षांनी आज ऐतिहासिक मालिकांमधून दाखविलेला इतिहास हाच खरा इतिहास असे मानले जाईल. मग तो इतिहास खरा मानायचा का

आणखी एक उदाहरण सांगतो. रणजित देसाई यांनी श्रीमान योगी लिहिताना, "मी यात आख्यायिका, दंतकथा असे सारेच घेणार आहे." असे नरहर कुरंदकर यांना सांगितले होते. तेव्हा इतिहासतज्ञ नरहर कुरंदकर यांनी, "आपण वास्तवाचे भान ठेवून लेखन करावे." असे सांगितले होते. परंतु तसे झाले नाही. रणजित देसाई यांनी वाचकांना काय आवडेल याचे भान ठेवूनच लिहिले आहे आणि जिथे गरजेचे वाटले तिथे इतिहास बाजूला ठेवला. गुंडाळून ठेवला.     

३ भागातील भाग १ 


विजय शेंडगे, पुणे    

2 comments:

  1. Tumchya kadun nakkich kahitari Navin vachnas milel..tumche lekhan udatt aste...subhecha

    ReplyDelete