Saturday 20 February 2021

तमोहरा : tamohara : दोन ध्रुवावर दोघे आपण

काल सकाळी विजय शहासने या फेसबुक मित्राने इनबॉक्स मध्ये मेसेज केला. म्हणाले, "मला तुमची कादंबरी हवी आहे. काय करायला हवे?" यांची माझ्या पोस्टवर कधी कॉमेंट दिसली नाही. मित्रयादीत आहेत कि नाही याचीही मला कल्पना नव्हती.

 पण त्यांचा मेसेज पाहिल्यावर मी त्यांना, "पोस्टाने हवी असेल तर २३० रुपये गुगल पे करा." असं मी त्यांना सांगितलं.
 
तर ते म्हणाले, "तुमच्या हातून कादंबरीचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे."
 
मी म्हटलं, "कुठे राहता?"
 
तर म्हणाले, "चिंचवडला."
 
ते चिंचवडला आणि मी नांदेडसिटीत. एका ध्रुवावर रसिक आणि दुसऱ्या ध्रुवावर लेखक. त्यांच्या आवाजातून मला त्यांचं वय बरंच असावं असं जाणवलं. त्यांना इतक्या दूर येण्याची तसदी देणं मला योग्य वाटत नव्हतं. काल मी नेमकं माझ्या कासारवाडीतील घरी जायचं ठरवलं होतं. मग त्यांना, "तिथे यायला जमेल का?" असं विचारलं. तर "येतो" म्हणाले. "लोकेशन शेअर करा." म्हणाले. वेळ ठरली. त्यांनी २०० रुपये गुगल पे केले. मी माझी कामं करत करत निघालो. अर्ध्या तासात मी माझ्या घरी पोहचेन असा अंदाज आल्यावर, त्यांनाही, "तुम्ही आता चिंचवडहून निघा." असं सांगितलं. "कसे येणार आहात?" तेही विचारलं. कारण बसने येणार असतील तर बसस्टॉप पासून माझं घर १० मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. गृहस्थ वृद्ध वाटत होते आणि त्यांना तेवढी देखील चालण्याची तसदी द्यावी असं मला वाटत नव्हतं. तर ते म्हणाले, "मी बाईकवर येणार आहे." माझी चिंता मिटली.
 
मी घरी पोहचण्याच्या पूर्वी ते माझ्या घरी पोहचले होते. माझे बंधू संजय शेंडगे, अविनाश शेंडगे यांच्याशी गप्पा सुरु होत्या. गृहस्थ साठीच्या आसपास. इकडचं तिकडंच बोलणं झालं. त्यांनी अनेक वर्ष मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश हे पद भूषविल्याच ऐकून तर मी अचंबित झाली. शेवटी मी विचारलं, "तुम्हाला हि कादंबरी घ्यावी असं का वाटलं?"
 
तर म्हणाले, "तुमची कादंबरी स्त्रीविषयी आहे. फेसबुकवर कादंबरी अतिशय सुरेख असल्याचं इतरांच्या पोस्टमधून कळत होतं. मला दोन्ही मुली आहेत. दोघींचे विवाह झालेले आहेत. दोघी मोठ्या पदावर आहेत. मी वाचणार आहेच पण त्यांनाही वाचायला देणार आहे." त्यांची एक मुलगी तर कोर्टात न्यायाधीश आहे. वाचनाविषयी वडिलांच्या मनात एवढी कळकळ असेल तर मुलं नक्की वाचन करणार. आणि वाचन केल्याशिवाय कोणतीही पिढी घडत नसते.
 
दोघे दोन ध्रुवावर असले तरी ओढ असेल तर ते अंतर, अंतर वाटतच नाही. मग ते प्रेमी जीव असोत अथवा एकमेकांविषयी आदर असणारे लेखक-रसिक असोत.
 
कादंबरीसाठी संपर्क : ९४२२३५६८२३

No comments:

Post a Comment