Saturday, 20 February 2021

Tamohara : तमोहरा : हि माझी लावायची वेळ असते

शिर्षकातील लावायची या शब्दाचे आंबट, चिंबट, तुरट, खारट असे कुणीही कितीही शब्दाछल करू शकतील. परंतु शिर्षकातील लावणे हा शब्द प्रयोग बसणे या अर्थी आहे. आता बसण्याचेही अनेक अर्थ निघतील. पण तळीरामांना नेमका अर्थ लक्षात आला असेल.

तर

ही माझी लावायची वेळ असते म्हणजे ही आत्ताची भर दुपारची वेळ नव्हे. बसणारे सर्वसाधारण संध्याकाळीच बसतात. आणि भान हरपलेल्या मंडळींना बसायला कुठलीही वेळ चालते. परंतु शृंगाराला जसा ' मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग ' असं म्हणण्याची वेळ यावी यासाठी रात्रीचा प्रहार हवा. तसा बसण्यासाठी सुध्दा रस्त्यावरील दिवे पेटल्या नंतरची वेळ उत्तम.

अर्थात मी काही नियमित पिणारा नाही. परंतु जसे पिण्याचा अभिनय करण्यासाठी घ्यायची गरज नसते तसेच त्याविषयी लिहिण्यासाठी देखील अट्टल बेवडा असण्याची गरज नसते. विषय वेगळाच आहे.

तमोहरा या माझ्या कादंबरीने माझे जीवन अतिशय समृध्द केले. अकल्पित असे अनुभव दिले. त्यातलाच हा एक अनुभव.

तमोहरा ही माझी कादंबरी माझ्या जवळच्या दोन मित्रांनी विकत घेतली होती. दोघेही अगदी बालपणीचे मित्र. त्यातील एक नियमित ठरल्यावेळी बसणारा. एखादी कॉर्टर घशाखाली ढकलणारा.

या नियमित पिणाऱ्या मित्राला तमोहरा पोहचली. त्याने ती वाचायला घेतली. निम्मी अर्धी वाचून झाल्यावर मस्त आहे असा मला मेसेज पाठवला. चार सहा दिवसांनी दुसऱ्या मित्राने हा स्क्रीन शॉट बघ म्हणत मला. त्या दोघांमधील संभाषणाचा स्क्रीन शॉट मला पाठवला.

त्यानुसार पिणाऱ्या मित्राचे म्हणणे होते की, तमोहरा खूपच छान आहे. बारीक सामाजिक निरीक्षण आहे. छान वाटते आहे कादंबरी. अगदी खिळवून ठेवलंय. नाहीतर माझी ही वेळ लावायची असते.

एखाद्या वाचकाला दारूपेक्षा माझ्या कादंबरीत गुंतून जाणे अधिक महत्वाचे वाटले असेल तर तोच माझा खरा पुरस्कार नव्हे काय?

तमोहरा बुक गंगावर उपलब्ध आहेच. परंतु माझ्याकडे, माझ्या प्रकाशकांकडे देखील ती उल्पब्ध होईल.

संपर्क ९४२२३५६८२३

No comments:

Post a Comment