Wednesday 6 May 2015

म्हातारीच्या मागे धावावसं वाटतंय

गोष्ट जुनी आहे. 
माझी कंपनी शहराबाहेर होती. सातारा रोडला . शिरवळच्या जवळ. पुण्यात पोहचवायला ऑफिसची बस होती. नेहमीप्रमाणे ऑफिस सुटलं. बसमध्ये बसलो. तासाभराचा प्रवास संपवुन शहरात पोहचलो. माझा थांबा आला. शहरातल्या सर्वात मोठ्या चौकात बस थांबली. अंगातला आळस, मरगळ घेऊन खाली उतरलो. सरावानं चौक क्रॉस करू लागलो.
चौक म्हजे असा काही गर्दीचा कि
बारा वर्षातून एकदा भरणारा कुंभमेळा बरा. आमच्या या चौकात बारा महिने चोवीस तास कुंभमेळा. वाऱ्यासारखी आपल्या देहाच्या चोहोबाजूनं वाहनं सुसाट धावत असतात. कोण्या एका वाहनाच्या चाकाखाली सटवाईनं आपलं मरण लिहून ठेवलंय हे माहित नसतं.
पण हे सारं इतकं सवयीचं झालंय कि मागे शंभर कुत्री धावली तरी हत्तीनं निमूट आपला रस्ता चालावा इतक्या सवयीनं मी रस्ता ओलांडत असतो.
रस्ता ओलांडत असताना मी चौकातील रस्त्याच्या मधोमध पोहचलो. आणि मला म्हातारी दिसली. पांढऱ्या शुभ्र केसांची. मध्ये तपकिरी रंगाचं पोट घेऊन मिरवणारी. वाऱ्याशी हितगुज करणारी. तसा पौढ होतो. पस्तिशीच्या आसपास. पण तरीही मला त्या म्हातारीच्या मागे धावावसं वाटलं. 
मी कोणत्या म्हातारीविषयी बोलतोय ते लक्षात आलंय ना ? मला माहिती आहे. तुम्हीही असेच कधी काळी त्या म्हातारीच्या मागे धावलाय. धावताना ठेचकाळलात. धडपडलात. पडलात. उठुन पुन्हा तिच्यामागे धावलात. इवल्याश्या मिठीत तिला कैद करण्याचा प्रयत्न केलात. पण तुम्ही शेर ती सव्वाशेर. ती तुम्हाला हुलकावणी देते. वाऱ्यावरती हिंदोळा घेत आणखी उनाच जाते. पण तुम्ही थकत नाही. तिची पाठ सोडत नाही. तिचा पिच्छा पुरवता. एका बेसावध क्षणी तिला मुठीत घेता. 
आता आलं का लक्षात मी कोणत्या म्हातारी विषयी बोलतोय ते. होय त्याच त्याच, शेवरीच्या शेंगेमधून बाहेर पडणाऱ्या आणि हवेवर पंख पसरून उडत रहाणाऱ्या म्हातारीविषयी बोलतोय मी. तपकिरी डोक्यावर पांढऱ्या शुभ्र केसांचा पुंजका घेऊन हवेवर स्वर झालेल्या म्हातारीविषयी बोलतोय मी.  .  
कितीतरी वर्षांनतर माझ्या डोळ्यात लहानपणीची चमक उमटली. अवतीभोवतीच्या गर्दीचा विसर पडला. वाटलं धावावं आणि तिला अलगद तळहातावर उतरवून घ्यावं. पण नाही तसं करू शकलो. लाज वाटली लोकं काय म्हणतील याची. भरचौकात नसतो एकांतात असतो तर मी तिची पाठ सोडली नसती. तिला अलगद मुठीत घेतलं असतं. तिच्या केसावरून अलगद बोटं फिरवली असती. आणि ओठांच्या फुंकरीने तिला पुन्हा हवेवरती उडवून दिली असती. 
ती माझ्या समोरून खुशाल हवेत तरंगत गेली. अगदी दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्याकडे पहात राहिलो. 
मी तिच्या मागे धावलो नाही. तिला ओंजळीत कैद करून घेवू शकलो नाही. तरीही माझ्या ओठात एक हसू आणि मनात एक उत्साह घेऊन होता. कारण आज या वयात आणि धावपळीच्या मला तिच्या मागे धावावसं वाटलं होतं. आपलं लहानपण अजुनही शाबुत आहे या विचाराने मी सुखावलो होतो. 
सगळी मरगळ निघून गेली होती. शीण हलका झाला होता. ' नन्हे मुन्ने बच्चे ……' गुणगुणत,  शीळ घालत पुढे निघालो होतो.


4 comments:

  1. Chan lekh..

    ReplyDelete
  2. Replies
    1. रुपालीजी आपण माझ्या ब्लॉगला पहिल्यांदाच भेट दिलेली दिसते. रिमझिम पाऊसवर आपले मनापासून स्वागत. यापुढे आपण नियमित भेट देऊन योग्य अभिप्राय दयाल हि अपेक्षा.

      Delete